मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

योगायोग

                              योगायोग 
काही वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने अमरावतीला जायचा योग आला . परतीच्या प्रवासाआधी एक दिवस मोकळा होता . माझी रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरगढ़ला जायची खूप इच्छा होती ,चौकशी करता समजले अमरावतीहून माहूरगढ़ला एस . टी . ने सकाळी निघून संध्याकाळी परत येणे सहज शक्य आहे . त्याप्रमाणे बसने सकाळी माहूरगढला जायला निघाले . काही तासाने बस एका स्टॅण्डवर दहा मिनिटासाठी थांबली म्हणून मी हातातील छोटी बॅग घेऊन स्वच्छतागृहात जाण्यासाठी खाली उतरले ,परत येते तो माझी बस मला सुटलेली दिसली . हाका मारल्या ,थांबवण्यासाठी हात केला पण बस काही थांबली नाही . मी चिंतेत पडले ,आता काय करायचे ,परत अमरावतीला जायचे का माहूरच्या पुढील बस ची चौकशी करायची ?नशिबाने बस मध्ये माझे काही सामान राहिले नव्हते . एकच दिवसाचा प्रवास असल्याने हातातील पर्समध्येच पैसे ,मोबाईल, फोन डायरी ,रेणुकादेवीला तांबूल प्रिय म्हणून ओल्या कपड्यात गुंडाळून आणलेली घरच्या बागेतील मघईची पाने इत्यादी साहित्य होते . बस बस ओररडल्याने बाजूला दोन -चार माणसे जमली होती ,त्यातील एक साधू वेशातील माणूस पुढे आला आणि म्हणाला बस चुकली त्यात देवाचा काही संकेत असेल असे समजा आणि इतक्या दूरवर आलात तर माहूरला जाऊन या . अर्ध्या तासाने माहूरसाठी एक जलद बस आहे ,पुन्हा तिकीट काढावे लागेल पण रेणुकादेवी सोबत दत्तशिखर ,अत्री -अनसुया शिखरचेही दर्शन घ्या . सोबत त्याने माहूर बसस्टँड ते शिखरावर कसे जायचे ,शेयर रिक्षावाले  किती पैसे घेतात ,अश्या सर्व सूचना अवघ्या चार -पाच मिनिटात दिल्या . मी चौकशी खिडकी वर पुढील बस ची खात्री करून घेतली आणि खंडित झालेल्या माहूरगढच्या प्रवासाची पुन्हा सुरुवात केली . पुढील संपूर्ण प्रवास निर्विघ्न, आनंद देणारा ,समाधानकारक झाला. बस स्टॅण्डवर भेटलेली साधुवेशातील ,वृत्तीनेही साधु असलेली व्यक्ती आजही माझ्या स्मृतीपटलावर आहे . तेथे त्या साधूचे भेटणे एक योगायोगच ,त्या मार्गदर्शकाला माझा शतशः प्रणाम . 
                                  आसावरी जोशी ,कर्वेनगर ,पुणे ४११०५२ 

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

पक्षी उडाला आकाशी

        पक्षी उडाला आकाशी
आयुष्याच्या वाटेवर कोण केंव्हा कुठे कसा भेटेल ,माहित नसते आपणासी ,
अचानक एक चिमुकला पक्षी येऊन बसला माझ्या चिंतामणी च्या दाराशी ,
काय झाले होते कुणास ठाऊक ,इच्छा असून त्राण नव्हता चिमुकल्याचा पंखांपाशी ,
वारा घातला ,दाणा -पाणी दिले ,उमेद दिसली त्याच्या अन आमच्या उराशी ,
कुणी म्हणे पोपट ,कुणी काय ,गुगल गुरु म्हणाले नाही नाही हातर आहे कॉपरस्मिथ -छोटा बसंत-तांबट पक्षी ,
वाईटालाही लागते निमित्त ,चांगल्यालाही लागते निमित्त ,पण पिल्लू मात्र प्रामाणिक होते त्याच्या जगण्या साठीच्या अथक  प्रयत्नांशी ,
नशीबही होते बलवत्तर ,अध्यात्मिक अर्थाने नव्हे ,पण शब्दशः काहीच तासात पक्षी उडाला (उडूलागला ) आकाशी ,
जल -थल—नभचर जीव असुदे कुणीही ,प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ,प्रेमच असते ,एका जिवाचे दुसऱ्या जिवाशी ,
पावलोपावली येतात अनुभव ,आपसुकच नतमस्तक होते ,परमपित्याच्या चरणापाशी .