गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

एका आवडलेल्या मुलाखतीचे सार (अमितजी )

       एका आवडलेल्या मुलाखतीचे सार (अमितजी )
दुःख का वजन किलो में होता ,लोहे जैसा अच्छा खासा ,
सुखको सोने जैसा तोला जाता ,ग्रॅम -तोला -मासा ,
ए मानव मत दे महत्व वजन को ,भारसे तू ना डरना -झुकना ,
सुख रूपी सोनेकी कीमत ,सिखलाती संकट में भी जीना ,
किसीने फरमाया है इक शेर ,जैसे गागर में सागर का समा जाना --
खूब कमाओ पैसे -हिरे -मोती .... 
याद रहे कफन में कभी ज़ेब नही होती ....

. अल्बम आयुष्याचा

.           अल्बम आयुष्याचा 
फूल ओवूनि गजरा ,एकेक फोटो लेवूनि अल्बम ,कडी जोडुनि साखळी ,
बीज रुजवितो ,रोप वाढवितो ,आतुरतेने ,फुला फळांची वाट पाहती माळी ,
एक अल्बम उषःकाल सम ,बालपणीच्या स्मृती उजाळी ,
दुसरा मध्यान्हाचा ,डोंगर -दऱ्या ,चढ -उतार असुनि निसर्गाने सुंदर फुले फुलविली ,
झऱ्यांची खळखळ ,पक्ष्यांची किलबिल ,फुलांच्या सहवासात फुलपाखरू झाली चिमुकली अळी ,
संधीकाली वाटे सुखी -समाधानी ,काल कसा सरला माझे मलाच ना कळी ,
उगवती ते मावळती ची चित्रफीत छविंचा खजिना ,प्रत्येक आठवण आगळी -वेगळी ,
ब्लॅक &व्हाईट ते कलर अल्बम ते सी. डी . जणू नवरत्नांनी भरलेली झोळी .......

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

जागतिकीकरण

           जागतिकीकरण 
जागतिकीकरणाच्या जमान्यात एखाद्या घटनेचे जगभर उमटतात पडसाद ,
निरोगी स्पर्धा जन्माला आली ,उत्तम गोष्टींना मिळू लागली दाद ,
विचार करून करावे लागते जॉब हॉपिंग ,सतत चालू असते तेजी -मंदी ,
धावत्याच्या मागे लागून  चालत नाही ,जायला नको हातची संधी ,
प्रत्येक क्षेत्रात असते शहाणपण ,परिस्थिती प्रमाणे बदलत राहण्यात ,
नुसता प्रश्न उगाळण्या पेक्षा हुशारी असते ,उत्तर शोधण्यात ,
सामाजिक -आर्थिक -राजकीय रुंदावल्या दिशा ,विश्वची माझे घर झाले ,हे ठेवूया लक्षात . 

मंगलमय निर्मिती

           मंगलमय निर्मिती 
परमेश्वराने  केली विचारपूर्वक समतोल -मंगलमय निर्मिती ,
जग -जीवन सुरळीत पुढे जाण्यासाठी पुरुष अन प्रकृती ,
पुरुषा जवळ थोडी अधिक ,शारीरिक शक्ती अन आन -बान ,
नसे मनाची शक्ती अन लवचिकता ,प्रकृती समान ,
तुलना कशाला ?ना कुणी मोठे ना कुणी लहान ,
शक्ती मिळाली करण्यासी संरक्षणाचे कार्य महान ,
प्रकृती पेलते मनोबलाने जननीचे अन प्रेमाने पालनाचे आव्हान ,
प्रत्येकाने जपावे अपापले अमूल्य असे वरदान .

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

अमूल्य काम

            अमूल्य काम 
रांधा -वाढा -उष्टेकाढा ,सर्वांचे हवे -नको बघा ,खरेतर एक मल्टीटास्किंग एंगेजमेंट ,
क्रिएटिव्हिटी ,प्रॉडक्शन ,कॉस्टकटिंग ,मार्केटिंग ,एकहाती केलेली चौफेर मॅनेजमेन्ट ,
नोकरीपेक्षा उत्तमच असते ,रिझल्ट ओरिएण्टेड सेल्फ एम्पलॉयमेन्ट ,
पार्टनरशिप असो वा प्रोप्रायटरी हवे चांगले फॅमिली अन पब्लिक रिलेशन ,
तिला ना लिव्ह -इन्सेन्टिव्ह -बोनस ना पगार ना पेन्शन ,पण मिळते फुकटचे प्रमोशन ,
तिची कामे "अमूल्य "असतात त्याचे कसेबरे करणार व्हॅल्यूएशन ,
मनाला बरेवाटते जर केलेल्या कामाचे थोडेसे मिळाले ऍप्रिसिएशन ,
ज्या घरात तिची नसते किंमत त्यांना वाटते ही तर अ -मूल्य उठाठेव ,
त्या "कर्मयोगिनी "ची कुटुंबाचे सुख हीच ,कधीही न बुडणारी अमूल्य ठेव ,
म्हणून तर तिला मानतात ,गृहलक्ष्मी -अन्नपूर्णा -देव ...... 

ताप

        ताप 
चूक झाल्यावर सुधारण्या च्या इच्छे शिवाय व्यर्थ असे पश्चाताप ,
सुनियोजित कर्तृत्वा विणा व्यर्थ असे करत बसणे पूर्वताप ,
एक जाळिती मृतास ,एक मृत्यूपूर्वीच जिवास ,चिंता चिता समान ,
निष्काम कर्मयोग तप महान ,कर्माचे फळ एक न मागताही मिळणारे दान . 

प्रेरणा स्रोत

                  प्रेरणा स्रोत 
नितळ कोमल गुलाबाला काटेरी फांद्यांचे संरक्षणच वाटते ,
लाजाळूचे रोपटे सहज स्पर्शाने मिटते ,पण मागचे विसरुन लवकर पूर्वपदावर येते ,
दलदलीत जन्मून कमलपत्र स्वच्छ असते अन पुष्प गुणांमुळे देवांना प्रिय असते ,
प्राजक्ताचे फूल इतरांच्या आनंदा साठी जन्मल्या जन्मल्या झाडाशी नाळ तोडते ,
वटवृक्षाची पारंबी वादळात ही आनंदाने झुलते ,पुन्हा मूळरूपात जाऊन झाडाचा आधार देते ,
प्रवास सफल कराया नौका लाटांचा मार अन हेलकावे सोसते ,
कुणाकडून काय शिकावे हे ज्याच्या त्याच्या हातात असते ....... 

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

वयाचा दाखला

             वयाचा दाखला 
काळ्या -कुरळ्या केसांमध्ये ,पाहुण्या केसांचा झाला प्रवेश ,
जणू काळ्या -सावळ्या ढगांमध्ये ,चंदेरी विजेची चमचमणारी रेष ,
माथ्यावर जमीन दिसू लागली ,गळून गळून झाले विरळ ,डोक्यावरील दाट केस ,
रंगवून -रंगवून आणावा लागतो ,तरुणपणाचा नाटकी आवेश ,
तरुणपणी चतुर्भुज झालो ,आता प्रौढत्वात झाले डोळे चार ,
वाचनाची आवड आहे ,सवडही आहे ,पण मोती आल्याने वाचवत नाही फार ,
पायात आपले बूटच बरे ,नको हिली चपलांचा सोपस्कार ,
बाहेर पडताना कित्तीवेळा तपासायचे !गॅस -फोन -किल्ली अन कपाटाचे दार ,
जागरण ही सोसत नाही ,गाढ झोपही लागत नाही ,कूस बदलायची वारंवार ,
उश्याखाली ,हाताशी लागते ,लवंग -वेलदोडा ,क्रीम -औषधे ,खडीसाखरेचे खडे चार ,
चालत नाही चणे -दाणे ,चकली -कडबोळी ,फोड कैरीची अन आंबट -चिंबट -गारेगार ,
असून मोत्याच्या पंगती सारखे सुंदर दात ,कसे काय कळते !तेतर आणलेत उसन -उधार ,
जमिनी वरून उठताना कळते ,गुढगे कंबर सांध्यांना ,पेलवत नाही आपलाच भार ,
वयाचा दाखला लागत नाही सोबत , ताई -काकू -आज्जी संबोधने लागू लागली क्रमवार ,
आयुष्याची वर्षे वाढविली विज्ञानाने ,प्रतवारी वाढवितो अध्यात्मिक अन पारमार्थिक संस्कार ,
पूर्व अन पुनर्जन्म कुणी पाहिला !आज मध्ये जगून करूया ,स्वतः सोबत इतरांचा ही उद्धार . 

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

. .झोपडी प्रमुख.

.        .झोपडी प्रमुख 
पहाटे उठून कामाला लागतो ,रात झाली ,आतातरी पाठ टेक जमिनीला ,
हातावरचं पोट त्याचं , म्हणे एकदातरी चार घास सुखाचे मिळुदे मला ,
संप -सुट्ट्या परवडत नाहीत ,मुलाबाळांना काय देईल खायला ,
आजार त्याला मानवत नाहित ,जंतूंना जागाच नाही त्याच्या झोपडीत रहायला ,
चोर तेथे येतच नाहीत ,परवडत नाही चोरीचा माल वाहुन न्यायला ,
झोपडी कसली !भंगार मधील फळ्या -पत्र्यांची भिंत ,छत म्हणायचे टेकू लावलेल्या ताडपत्रीला ,
तीन विटा ,चार भांडी शिजवायला ,जागा मुबलक उभे आडवे झोपायला ,रात्रभर एकमेकांच्या सोबतीला ,
शेवट मात्र श्रीमंतीत झाला ,कोरे पांघरूण पांघरायला   ,शिडी मिळे ,सोबतीला ,स्वर्गाच्या पायऱ्या चढायला ,
रामनामाच्या गजरात ,माणसे जमली गुलाल फुले उधळायला ,अंगा -खांद्यावर मिरवायला . 

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

उन्हाळी कामे

              उन्हाळी कामे 
उन्हाळा आला कि पूर्वी असे वर्षाचे वाळवण निवडणं साठवण ,
मग झाली सुरु महिन्याची निवडक यादी ,कारण वेळ अन जागेची अडचण ,
धान्याची जागा घेतली तयार पिठे -पावडरीने ,नको ठेवाया दळणाची आठवण ,
पोळ्यावाल्या ,कामवाल्यांची तंत्र सांभाळा ,त्यापेक्षा बरे रेडी टू ईट जेवण ,
काळा प्रमाणे बदलायलाच हवे पण ,ध्यानी असावे आरोग्याचे समीकरण !

कालाय तस्मै नमः

          कालाय तस्मै नमः 
आमच्या लहानपणी सणला अन सुट्टीत जमायचे मामा -मावशी ,आत्या -काकी ,
सहज होत शेयरिंग ,आत्तेभावाला मामीच्या भावाची मुलगी ,वाटत नसे परकी ,
कधी सासरचे तर कधी माहेरच्या माणसांचे होत असे घरीच गेटटुगेदर ,
आता हॉल सोडायची घाई ,म्हणून गप्पा -जेवण उरकायचे भरभर ,
नातवंडांच्या पीढीला ,कुणा काका -मावशी आहेत तर आत्या -मामा नाही याचे वाटे कोडे ,
पुढे एकेकट्या मुलांना "शेअरिंग इज अ गुड थिंग "शिकवतात हेही नसे थोडे ,
पूर्वी कागदाच्या चौकोनात मिळालेली फोडणीची पोळी अन घासभर साबुदाणा खिचडी ,
आता ए . सी . हॉटेल च्या भरलेल्या महागड्या थाळीला नाही येत त्याची गोडी . 

हुशार विद्यार्थी

                  हुशार विद्यार्थी 
देवाने प्रत्येकाला दिले कमी -जास्त बुद्धीचे भांडार ,
कष्ट ,चिकाटी ,जिद्द ,सातत्य अन सकारात्मक विचार ,
आप्तांचा पाठिंबा योग्य मार्गदर्शन ,विश्रांती ,आहार ,विहार ,
नको अंधानुकरण ,अंगीकृत गुणांचा करे विकास तोच खरा हुशार. 

. चकवा

.                चकवा 
पायाखालच्या वाटेवर का लागावा चकवा !
चालतच राहतो आपण ,जरी आला थकवा ,
दोन मनांच्या वादातून नाकळे जावे कोणत्या पंथी ,
महाभागी अर्जुनालाच लाभतो श्रीकृष्णा सम सारथी .

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

सदाफुली का एकदाफुली

         सदाफुली  का एकदाफुली 
एक्सपायरी डेट नसली तरी वस्तू चांगली का वाईट आई तुला कसे ग समजते 
काही गोष्टींचे ज्ञान -वरदान आईला तिच्या आई कडून मिळते ,
एका बीजातून दुसरे ,दुसऱ्यातून तिसरे तिसऱ्यातून चौथे जन्माला येते ,
एका जिवापासून दुसऱ्याची उत्पत्ती ,अगदी नैसर्गिक असते ,
स्वार्था साठी बीजातील ती शक्ती संपविणे ,प्रगत शास्त्राला कसेकाय जमते ,
जेनेटिकली मॉडिफाय केल्याने बीज भारी दिसते पण त्यातील स्वत्वच संपते ,
'अब पछतानेसे क्या होत है जब चिडिया चुक गई खेत 'मग अशीवेळ येते .

परमानंदी मिलन

                     परमानंदी मिलन 
शिवधनुष्य पेलेल पुरुषोत्तमच ,विश्वास होता वैदेहीला ,
अनंत आकाशाशी मीलनाची ओढ जणू धरतीला ,
शिवधनुष्याने केले क्षितिजाचे काम ,निमित्त झाले अंतरीच्या मीलनाला ,
जीवांना तोशिवणारी खळखळणारी सरिता होते शांत सामावताना सागराला ,
उभयतांच्या जगण्यासी मिळे अर्थ ,जेंव्हा भेटते प्रकृती पुरुषाला ,माया परब्रह्माला ,
सीतारामाचे सम्पूर्ण जीवन ,आदर्श पाठ जणू शिवाची ओढ असणाऱ्या प्रत्येक जिवाला .

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

वाल्याचा वाल्मिकी

   वाल्याचा वाल्मिकी 
मरा -मरा -मरा चा जप ऐकून राम झाला प्रसन्न ,
वाल्याचा वाल्मिकी होण्यास उपयोगी पडले कर्मपुण्य ,
पापाचेही तसेच असते ,नसे काही वेगळे भिन्न ,
कुकर्माचे भागीदार शेवटी होतातच ना खिन्न ,
निष्काम भावनेने करावे सत्कर्म ,तो ओळखतो सकलांचे अंतर्मन . 

भोग -उपभोग

         भोग -उपभोग 
कलियुगी समस्त सुखे भोगताना दिसतो दुर्जन ,
तुलनेने कमी सुख उपभोगतो सज्जन ,
कमी कष्टात आनंद देत असेल अनैतिक असत्यवाट ,
तेथे आनंदावर सतत असतं भिती चे सावट दाट ,
अंतिम विजय ,टिकाऊ आनंद देते सत्याची सरळ वाट ,
देवाघरी देर असेल अंधेर नाही ,नसावा दिखाऊ पोकळ थाटमाट .

झरे अस्तित्वाचे

.         झरे अस्तित्वाचे 
सूर शब्द भाव श्रवणीयता संगीतात ,
स्वाद सात्विकता प्रेम तृप्ती भोजनात ,
रूप रंग गंध बीज परोपकार फुलात ,फळात 
निष्ठा समर्पण प्रेम श्रद्धा भक्ती पूजनात ,
रेषा रंग अभिव्यक्ती निर्मिती चित्रात ,
ओहोटी भरती ,पोळे मोती ,खडक रेती अथांग सागरात ,
रेखीव सुबंध सुंदर सुबकता शिल्पात ,
कलात्मक वास्तव ,कथा अभिनय ,करमणूक ,संदेश सिनेमात ,
ऊन सावली ,चढ उतार ,रात्र दिवस असणारच दीर्घ जीवन प्रवासात . 

सहभोजन

                         सहभोजन 
धावपळीच्या आयुष्यात एका धाग्यात बांधते ,एकत्र येऊन केलेले जेवणं ,
ठरवून प्रत्येकाने आणावा एक एक पदार्थ ,नको उपकाराचं लोढणं 
सहजच बोलता बोलता होते विचारपूस अन मतांची घेवाण -देवाण ,
सुसंवाद अन नकळत समुपदेशन ,ना कुणी उणं ना कुणी दूण ,
सुग्रास जेवण अन सुटतात काही प्रश्न ,सुरेल होते जीवन गाणं . 


रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

तार -प्रकार

        तार -प्रकार 
तार म्हंटलेकी पकवान्न करणाऱ्याला आठवते साखरेच्या पाकाची तार ,
कच्चा -पक्का ,एकतारी -दोनतारी ,कडक -गोळीबंद केवढे ते पाकाचे प्रकार ,
फक्त पुस्तकातून समजत नाही ,अनुभव येई पर्यंत तार ओळखायची कसरतच फार ,
आई कडून मुली कडे ,सासू कडून सुनेकडे आलेला असतो हातर ठेवा ,
अंगठा अन तर्जनीच्या मध्ये ,घेऊन थेंब पाकाचा ,तार बघाया ,तर्जनी नाचवा ,
गोळीबंद पाकासाठी पाण्यात टाकावा पाकाचा थेंब ,तो गोळी बनून टिकायला हवा ,
गुलाबजामला लागे कच्चा पाक ,तना -मनात मुरायला गोडवा ,
लाडूसाठी एकतारी पाकात दोन -तीन तास मुरत ठेवावा खमंग भाजलेला खवा -रवा ,
गूळपापडी ,मोतीचूर ,पाकातील पुऱ्यांना दोनतारीच्या आसपास ठेवा ,
साखरआंब्याला लागे पक्का पाक ,वर्षभर टिकवून ,पाहुणचाराचा गोडवा वाढवा ,
साखरभाताला लागे गोळीबंद पाक ,केशर वेलची ,बदाम बेदाणा ,सुका मेवा ,
कडक चिक्की मध्ये गूळ -साखरेच्या पाकाला ,पाण्याचा थेंबही चालत नाही बुआ ,
वड्यांसाठी मिश्रण गोळा होईस्तोवर घोटावे ,पातेल्याची जमीन दिसे पर्यंत ,गॅस कसा बारिक हवा ,
खादाडी शिवाय आयुष्यात बरेच ठिकाणी ,तारेचा लागतो हातभार --------
चांगल्या -वाईट बातम्या देऊन काळजाचे ठोके वाढवणारी ,पोस्टाची तार ,झालीये आता हद्दपार ,
खेड्या -पाड्यात अजूनही कपडे वाळवायला ,पडदा लावायला ,अडकवायला ,उपयोगी पडते तार ,
वीज वाहून आणणारी ,पक्ष्यांना झुलवणारी तार तर असते एक दुधारी तलवार ,
अंतरीच्या लोकांना भेटवणारी ,टेलिफोनची तार तर ,एक महानच आविष्कार ,
डोंबाऱ्याच्या कुटुंबाचा तार म्हणजे ,जगण्याचा एक भक्कम आधार ,
जीवनात वागताना सर्वांनी ठेवावे 'तारतम्य ',तरच होईल जगताचा उद्धार . .... 


परदेशातून आलात का ?

        परदेशातून आलात का ?
(चांदोबा चांदोबा चालीवर -२००९स्वाईन फ्लू ची साथ आली तेंव्हा --)
परदेशातून आलात का आलात का ... 
सोबत स्वाईन फ्लूला आणलेत का .... 
विषाणूंना नसते तिकीटाची कटकट 
प्रवास केला त्यांनी विमानातून फुकट ,
प्रवासीहो तपासल्या शिवाय जाऊ नका ,
टॅमी फ्लू ची गोळी घेऊन टळेल धोका ,
सज्ज झालो चहू बाजुने लढण्यासी ,
संसर्गाच्या नव्याने आलेल्या रोगाशी ....

. दिनदर्शिकेत सण लाल झळकती

.                 दिनदर्शिकेत सण लाल झळकती 
(मंगेश पाडगावकरांची -'श्रावणात घन निळा 'च्या चालीवर आधारित )
दिनदर्शिकेत सण लाल झळकती ,आनंदाच्या बरसती धारा ,
एका मागुन एक उलटुया वर्षभराची पाने बारा ,
चैत्र ,वैशाख ,ज्येष्ठ ,आषाढ महिने येती बारी बारी ,
स्वागत करूया दिवस सुगीचे ,नववर्षाचे ,गुढी उभारून प्रवेश दारी ,
रामनवमी ,गुरुपौर्णिमा ,दिंडी संगे चालू ,पंढरीची वारी ,
श्रावण भादव अश्विन कार्तिक सणांची जणू आली भरती ,
रक्षाबंधन ,स्वातंत्र्यदिन ,कृष्णजयंती ,गौरी अन गणपती ,
नवरात्री ,दिवाळी -दसरा तेथे नसती अंधारासी थारा ,
मार्गशीर्ष ,पौष ,माघ ,फाल्गुन ,
गोड बोलुया कटुता विसरून ,
गणतंत्राला बळकट करूया ,येवो कितीही वादळ -वारा ,
सुष्ट वृत्तींना जोपासुया ,अन होळी करुनि दुष्ट वृत्तींचा करूया नाश ,
प्रेम रसाच्या रंगाने ,धुंद होऊदे धरणी -आकाश ,
सण शिकवती एकजुटीने आनंदाने कुटुम्ब -समाज -राष्ट्र उभारा . ......

चॅनल

              चॅनल 
(श्री .बा . रानडे यांच्या 'लेझीम 'या कविते वरील विडंबन )
ढीगभर टी . व्ही . चॅनल चे दिवस सुरू जाहले ,
टी आर पी अन ब्रेकिंग न्यूज च्या मागे धावले ,
ताजी बातमी आधी देण्यासी सगळे चॅनल सरसावले ,
डे &नाईट नवे काय देणार !प्रेक्षक मात्र वैतागले ,
पण चॅनल चाले जोरात !चॅनल चाले जोरात ,
रियालिटी शो च्या परीक्षकांनी आपले आपले मत दिले ,
एकसे एक स्पर्धकांनी आपल्या कलेने मंच गाजविले ,
सूत्र संचालकांनी प्रत्येक घटकाला उत्तम प्रकारे बांधुन ठेवले ,
एस एम एस ने निकाल अन स्पर्धकांचे नशीब ठरविले ,
रियालिटी शो चा व्यवसाय चाले जोरात ..... जोरात  ... 
मुलाखतीला पाहुणे बोलाविले ,वेळेचे पण भान न उरले ,
झाली का पंचाईत ,धन्यवाद म्हणून पाहुण्यानाच गप्प केले ,
हॅलो हॅलो ... प्रेक्षकांचा फोन मध्यात अन प्रयोजकांची जाहिरात तेवढ्यात ... 
लोक दिन भर काम करुनि दमले ,संध्या समयी घरी परतले ,
नाही दमती स्पोर्ट ,सिनेमा ,मालिका ,कुकिंग अन कार्टून वाले ,
प्रत्येकाचीआवड नीरनिराळी  ,रिमोट वरून भांडण चाले ,
मग एकाचे दोन टी . व्ही . झाले ,ऑन लाईन ची सोय तर खोलीत ... 
पहाट झाली घरचे लोक जागे झाले ,सगळे आपापल्या कामाला जुंपले ,
परी न थकले चॅनलवाले ,पुनः प्रक्षेपण दाखवतच राहिले ,
सतत नको इडियट बॉक्सच्या पुढ्यात ,मिळू मिसळुया लोकात .. सुसंवाद साधुया आपसात ...

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

. नळा नळा पावरे

.              नळा नळा पावरे 
(इंदिरा संत यांची नको नको रे पावसा -या कविते वरील विडंबन -सकाळ -२००९)
नको नकोरे नळराया असा येऊस अवेळी ,काळजीत असती आई -बाई ,मुली बाळी ,
पाहुणे आले गाडी भरून ,पाणी साठवाया ,मोठी भांडी आणू मी कोठून ,
नको करू लहरी पणा बाग गेली सुकुन ,डबा करू कि पाणी भरू ,बादली गेली वाहुन ,
नको दिवसा आड ,एकदातरी ये दिवसातून ,पळाले तोंडचे पाणी ,डोळे गेले ओलावून ,
वेटिंग च्या टँकर ला लवकर पाठव ना ,ओतले शिळे पाणी ,एकदाच माफ कर ना !
नदी नाले धरणे तुडुम्ब भरु दे ,दुष्काळ पळवून ,सृष्टी आनंदी  मंगलमय होऊ दे ,
वरुणराजा आम्हांसी घे सांभाळून ,पावसाचा आला कंटाळा असे उगाच येणार नाही तोंडून ,
जल जीवन हे कळले ,त्यासी जपून वापरेन ,नळातील थेंबाला तिर्थासम पुजेन .....

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

उठा उठा दादा ताई (विडंबन )

          उठा उठा दादा ताई (विडंबन )
पुणे सकाळ ने वाचकांची प्रतिभा आजमावण्या साठी एक संधी उपलब्ध करून दिली होती . एका लोकप्रिय कवीची कविता ,गीत ,गाणे देऊन त्यावर आधारित विडंबन करून सप्तरंगच्या अंका साठी लेखन मागविण्यात आले होते . त्या साठी रचलेल्या पण काही कारणास्तव छापून न आलेल्या  काही कविता . 
ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रज यांची -उठा उठा चिऊताई -या कविते वरील विडंबन -

चला उठा दादा ताई ,पहा केवढे उजाडले ,
काय हे !तुम्ही अजून झोपाळलेले !
पेपर आला दूध आले ,तयार आहे दुधाचा कप नाश्त्याची बशी ,
टि . व्ही . पुढे जागत बसून ,पहाटे जाग येणार कश्शी !
कपडे चढवत नाश्ता करणे ,धावत पळत बस पकडणे ,
वाहने धावती जिकडे तिकडे ,कसे सुटणार वाहतुकीचे कोडे !
सुखाने झोपलेले अजून तुम्ही ,
चांगला नंबर मिळवायचा कोणी ?
डोनेशन च्या नावाने आमच्या डोळ्यात येते कि पाणी ,
बाळांनो ...... बाळांनो ..... 
नंबरचे नांव काढताच ,खाडकन उठले दादा ताई ,
तयार होताना झाली घाई ,अच्छा टाटा येतोग आई .

श्रीमंत

          श्रीमंत 
तोच खरा श्रीमंत जो उठल्यावर असे ताजा तवाना ,कारण रात्री लागे झोप शांत ,
दिवसाचा तळपता सूर्य असो वा पौर्णिमेच्या रात्रीचा शीतल निशिकांत ,
प्रत्येकाने शक्ती -भक्ती -प्रिती -नितीने गाजवावा ,एखादा तरी प्रांत ,
लाभावे निरोगी शरीर ,रोजच्या जमा -खर्चाची नसावी भ्रांत ,
पहाटे व्यायाम ,चिंतन ,मनन करण्यासाठी ,वेळ मिळावा निवांत ,
क्षमतेनुसार दिवसभर कामाची सर्वच श्रीमंतांना गरज असते नितांत ,
आप्तांचा सहवास अन सुसंवादात ताकत असे जग करण्यासी पादाक्रांत ,
फावल्यावेळी एखादा तरी जोपासावा छंद ,मन राहती सुखाय -स्वान्त ,
व्यक्ती तितुक्या प्रकृती ,पण शेवट मात्र असावा सुखांत ...... 

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

विभिन्न नाती

         विभिन्न नाती 
रक्ताची नाती जन्माने मिळतात ,पण काही जुळतात कोणतेही नाव न देता ,
प्रेमाचा ओलावा नसेल तर ,युवर्स ,अवर्स ,माईन ,पर्यांयांनी सुद्धा सुटत नाही गुंता ,
ना रक्ताचे ,ना जोडलेले पण अंतरीच्या ओढीने जुळते तेंव्हा आपण म्हणतो काहीतरी ऋणानुबंध होता ,
दया क्षमा अन निरिच्छ प्रेम करणाऱ्या धरणीला आपल्याकडे म्हणतात माता ,
भेद भाव न करता समान छत्र छाया देणारे अनंत आकाश असे जगताचा पिता ,
चंदा मामाशी नाते जोडायला पुरतो ,नेसत्या वस्त्राचा धागा नुसता ,
रक्ताची ,भक्तीची ,अंतरीच्या निरिच्छ प्रेमाची नाजुक नाती जपताना दिसते केवढी महानता .

successss

           successss 
इच्छा ,निश्चित हेतू ,ज्ञान ,कृती ,कष्ट ,जिद्दीच्या बळावर जीवन सफल होतं ,
गरजूला आधाराचा हात मिळाला तर ,कोडं लवकर सुटतं ,
आळस ,सुसंगत ,सुसंधी नाकारून ,सक्षम जीवन ही बिघडतं ,
'जो जीता वो सिकंदर 'खरे असले तरी ,success मधील u अक्षर महत्वाचं असतं .

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

सत्यम शिवम सुंदरम

        सत्यम शिवम सुंदरम 
जग कितीही पुढे गेलेतरी ,जन्म -मरण देवाच्या हाती ,
भ्रूण असो वा इतर हत्या ,माणुसकीला कलंकित करिती ,
आत्महत्या तर पळपुटेपणा ,वरदान स्वरूप जीवनाची माती ,
चतुःपुरुषार्थाने फुलवावे कुटुम्ब -समाज -संस्कृती ,
तीत रंग -सुगंधाची उधळण करत असते प्रकृती ,
काटेकोर रेषांनी आकाराला येते तीतर असते भूमिती ,
अलौकिक आनंद देते चित्रकाराची लवचिकता अन रंग -संगती ,
सोपे असते वाईट वर्तन जेंव्हा प्रबल होते अविवेकी मती ,
विवेक अन आनंदाने परिस्थितीला सामोरे जाऊन समजते ,जग सत्य शिव सुंदर किती ?

मॅनेजमेंट

              मॅनेजमेंट 
वाहत्या पाण्यात हात धूताना वापरात असतं उधाण ,
मर्यादित चा वापर करताना ठेवावे लागते थोडे भान ,
स्वभाव तोच पण परिस्थिती ची असावी सर्वांना जाण ,
पाणी -वाणी ,वेळ -पैसा ,वापरात हवी मॅनेजमेंट ,कमी होतो ताण ,
कोणत्याही गोष्टीचा योग्य जागी योग्य वापर ,करतो माणुस सुजाण . 

सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

कल्पवृक्ष परसातील

        कल्पवृक्ष परसातील 
वास्तुशांतीला हौसेने परसात  लावला कल्पवृक्ष ,बाकीची झाडे आजूबाजूला ,
आळे करा ,खतपाणी घाला ,माणुस मिळवा झावळ्या कापायला ,
वाट पाहून पाहून ,दहा वर्षांने लागले नारळ ,सीमा नव्हती आनंदाला ,
काढायला सोलायला मोजायचे पैसे ,वर कष्ट करायचे फुकट वाटायला ,
कोणी म्हणते छान होता ,तर कोणी खराब निघाला हो नारळ !वरुन लागते ऐकायला ,
घरी तरी किती लागतात वापरायला !शिवाय सोलणे ,फोडणे ,खरवडने पाहिजे जमायला ,
पुन्हा माणसे पाहिजेत आनंदाने खायला ,उगाच निमित्त नको कोलेस्ट्रॉल वाढायला ,
जास्तीचे विकायचे म्हंटले तर कर्म कठिण ,विकून गाठचे पैसे लागतात घालायला ,
नगदी पीक म्हणजे काय ते कळले ,जेंव्हा काढतो विकायला ,
नारळ म्हणजे 'कल्पवृक्ष 'छान वाटते पुस्तकात वाचायला ,
हातर आपला प्रॉब्लेम ,पण कल्पवृक्षाचा प्रत्येक भाग येतो उपयोगाला ,
शेंड्या -करवंट्या झावळ्या शहाळी असतात उपयोगी ,खोबरे हवेच पदार्थाची लिज्जत वाढवायला ,
बारमाही हिरवेगार -बहरलेले ,एकतरी हवे परसाची शोभा वाढवायला ,
आपल्या परसात स्वकष्टाने रुजवायचे ,वाढवायचे ,अवर्णनीय आनंद देई मनाला ,
शुभकार्य असो वा पूजा -अर्चा ,पाच फळात वरचा मान श्रीफळाला ...... 


. कसरत नोकरदार महिलांची

.        कसरत नोकरदार महिलांची 
अबला झाली सबला नोकरी -व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात तिचे दिसू लागले प्राबल्य ,
घरात -बाहेर सांभाळावा लागतो तोल ,जर हवी असेल शांति आणि साफल्य ,
एकाचवेळी मिळवणे ,वाचविणे ,देणे आधार कुटुम्बाला ,असते एक कौशल्य ,
कामावरची घरात अन घरातील कारणे कामावर ,चालत नाहीत वरचेवर ,
पुरूषांशी  ही मैत्री ठेवावी लागते ,पण ठेवून सावध अंतर ,
मोकळ्या वागण्याचा वेगळा अर्थ काढायला ,असतातच लोक तत्पर ,
अश्यावेळी लोकांना ,देता आले पाहिजे चोख उत्तर ,
बौद्धिक -आर्थिक क्षमतेत ,ती असते त्याच्या बरोबर ,
हे सर्व करताना सावधान !उतरणीला नसावा विपरीत परिणाम प्रकृतीवर ,
धावपळीतही योग्य विश्रांती अन छंद जोपासावा ,प्रेम ही करावे स्वतःवर ,
  अष्टभुजेचा वरदहस्त लाभला तिला ,बहुआयामी जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मस्तकावर .

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

कौटुम्बिक वाद

           कौटुम्बिक वाद 
कुटुंब म्हणजे अनेक माणसे एकत्र येतात ,एखादा विचार घेऊन ग्रेट ,
प्रत्येकाला असते विचार स्वातंत्र्य ,मते असू शकतात सेपरेट ,
नाते असो रक्ताचे ,मैत्रीचे ,राष्ट्रीय ,अंतराष्ट्रीय ,पाया असतो सुसंवादी भेट ,
काही असो गल्लीतील ,वनडे किंवा टेस्ट मॅच चे क्रिकेट ,
आपसात सोडवूनसुवर्णमध्य  साधावा ,कौटुम्बिक वादाचे प्रक्षेपण नसावे थेट,
घराची मांडणी म्हणजे नसतोना ,नाटकातील तात्पुरता सेट ,
चार भांडी एकत्र आली की वाजणारच ,कसा का असो साईज ,शेप अन वेट ,
पण त्यातील पदार्थ मात्र हवेत ,उपयोगी ,टेस्टी ,हेल्दी अन परफेक्ट .

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

पंगत ते बुफे पार्टी

              पंगत ते बुफे पार्टी 
पूर्वी लग्ना -कार्यात पंगती असायच्या ,होती जेवणाची औरच मजा ,
पाट -रांगोळी -अगत्यही भारी ,पण पकवान्नाचा आग्रह वाटे सजा ,
वेळ ,जागा,मनुष्यबळ अभावी ,झाली सुरु कॉट्रॅक्ट पद्धत आणि बुफे ,
नको अन्नाची नासाडी ,लागेल तेवढेच घ्या ,उरलेच तर खातिल भिखारी -भुके ,
इथेही क्यू ची कटकट ,पदार्थांची मिसळ ,हातात ताट घेऊन जणू अन्नछत्रात उभे ,
पंगत झालीच तर ,मागे उभ्याच्या टेन्शनने जेवणारा पटकन ताक पिऊन निघे ,
दोन्ही पर्याय निष्फळ ठरले ,याला जवाबदार गेस्ट आणि होस्ट आहेत दोघे ,
जायचे नसेल तर आधी कळवावे ,अति पदार्थांचे प्रदर्शन बंद करावे ,असावी आपुलकी प्रेम सर्वांमधे . 

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

. आरोग्यम धन संपदा

.                आरोग्यम धन संपदा 
तरुणपणी आरोग्या कडे केला काणा डोळा ,
एकच हव्यास ,करावा भरपूर पैसा गोळा ,
उतारवयात एक एक करून रोगांचा झाला तयार सेतू ,
आहार -व्यायाम -विश्राम ,समाधानाचे अमृत नाही सेविले ,करताना किंतु -परंतू ,
आता कडू -विषारी औषधांना ,जालिम उपचारांना ,जुमानेनात रोग -जंतू ,
कोणीतरी बरे करारे  ,आम्ही वाट्टेल तेवढा पैसा ओतू ,पैसा ओतू . 

. पाण्याचे मन

.                पाण्याचे मन 
चंचल ,उशृंखल ,अथांग ,गंभीर ,जल तरल सामावून घेई विविध रंगी स्वप्न ,
कधी जल स्थिर -कणखर ,गोठून गार झालेले बर्फाचे मन ,
कधी हलके -काळे -अस्थिर ,आपटून ओघळती पाणेरी घन ,
उन्हाच्या चटक्यांनी पाण्याचे जाते अस्तित्वच संपून ,
उन्हाचे चटके परतवून कणखरपणे ,बर्फ परिसर टाके उजळवून ,
पर्यायच उरला नसता ,मग हळू हळू जातो रे वितळून ,
शेवटी मर्यादा असतेच ना !असो जल अथवा जीवन ...... 

भावार्थ

                             भावार्थ 
साधी ,आलंकारिक ,व्याकरण -छंदाने नटलेली ,शब्द -वाक्ये म्हणजे भाषेचे तन ,
बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे ,ते समजणे म्हणजे भाषेचे मन ,
फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतात पण नुसत्या रूपावर नका जाऊ ,
बघून मिठाईचा रंग -रुप ,आपण एकदा खरेदी करूनही खाऊ ,
पण चवच चांगली नसली तर आपण पुन्हा कसे घेऊ ?
पाण्यात पडले की पोहता येते ,कारण प्रश्न असतो जीवनाचा ,
थोडे शिकून पडलो तर ,आनंद घेता येतो सागर पार करण्याचा ,
शब्दार्थ ,भावार्थ ,उच्चाराने उलगडलेला अर्थ समजण्यात नसावी गफलत अन घाई ,
भाषेचा हेतू असतो सांगणाऱ्याचा भावार्थ समोरच्या पर्यंत पोहोचावा सही सही .

श्रोता

           श्रोता 
मिळवलेले ज्ञान पाखडावे शहाणपणाच्या प्रसारा साठी अन भल्यासाठी ,
महान वक्त्याचे ऐकायला ,भाग्य लागते रसिक श्रोत्यांच्या गाठी ,
कधी श्रोता व्हावे लागते ,समोरच्याच्या कोंडंऱ्याच्या निचऱ्यासाठी ,
कधी एका कानाने ऐकून ,दुसऱ्या कानाने सोडून देण्या साठी ,
अवघड असते विश्वासाने सांगितलेले गुपीत पोटात दडवण्या साठी . 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

आलेख

         आलेख 
चढ उतारा शिवाय पूर्ण होत नाही आयुष्याचा आलेख ,
दुसऱ्याचा चढता आलेख बघून ईर्ष्या नसावी ,धडा शिकावा  एक ,
सोपे असते पुसून लहान करणे दुसऱ्यानी काढलेली रेघ ,
त्यापेक्षा टिम्बा टिम्बा ने मोठी करावी ,आपण आपली रेघ ,
पायथा आहे म्हणूनच ,शिखरावरून दृष्य दिसतात सुरेख .....