शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

Homework

                              होमवर्क .
करोना सारख्या अकल्पित संकटा मुळे सारे जग हादरले आहे . आपल्या हातात सद् सद विवेक बुद्धीने ,एकजुटीने ,सर्व यम -नियमांचे पालन करून ,या असुराचा लवकरात लवकर नाश करणे हा एक मात्र पर्याय आहे . एकवीस दिवसांचे लॉक डाऊन घोषित झाले ,त्याच सुमारास मोठा पाऊस आला ,संपूर्ण परिसरातील दिवे गेले . म्हणून मी याच परिसरात राहणाऱ्या माझ्या मुलाकडे ,तासाभरात आवरा आवर करुन रहायला गेले . मुलाकडे मी ,सुनेचे वडील ,सून -मुलगा ,दहा वर्षाचा नातू असे पाच लोक होतो . कामवाल्या येणार नव्हत्या ,सून मुलाला घरून दहा दहा तास काम करावे लागत होते ,नातू सारखा आई -बाबाला जाऊन  डिस्टर्ब् करत होता ,त्याला आधी शाळा ,क्लास ,अभ्यास नाही ,आई ,बाबा, आबा आज्जी सर्व घरी आहेत याची मजाच वाटली . मी सकाळचा संपूर्ण स्वयमपाक थोडी साफ -सफाई ,जमेल तेवढ्या कामाची जवाबदारी घेतली . सर्वानीच कामे वाटून घेतली . एकाच दिवसात अर्चित म्हणजे नातवाला कंटाळा यायला लागला . मग काय त्याला ऑन डिमांड गोष्टी सांगणे ,जे गुगल मुळे शक्य झाले . पत्यातील नवनवीन खेळ शिकवणे ,योगासन -प्राणायाम ,संध्याकाळी स्तोत्र पठण ,इत्यादी मुळे वेळ चटकन गेला . दिवसातून एकदाच बातम्या आणी दोन—तीन वेळा पाच दहा मिनिटं वॉटसऍप बघायचे असे बंधनच घालून घेतले .     लॉक डाऊन च्या काही डाऊन साईड्स आहेत ,पण सर्वानी एकत्र बसून सुसंवाद साधत ,ताजे गरम अन्न सेवन म्हणजे खऱ्या अर्थाने ,उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ,याचीच जणू अनुभूति . तीन वर्षा पूर्वीच अमेरिकेहून आलेला ,एकही मराठी वाक्य न बोलणाऱ्या नातवाला २५-३०स्तोत्रे मुखोद्गद झाली ,ही केवढी जमेची बाजू .संस्काराची व अनुभवांची शिदोरी त्याला आयुष्य भर उपयोगी पडणार आहे .
        काही अपरिहार्य कारणाने मी सध्या माझ्या राहत्या घरी आले . इथे रुटीन कामा सोबत ,चिंतन-मनन -पूजन—वाचन ,बागकाम ,वाटण्या साठी कापडी पिशव्या आणि मास्क चे शिवण ,रोज एकतरी नातेवाईक किंवा परिचितास हालहवाल विचारायला पाचेक मिनिटे फोन ,असा दिनक्रम आहे . थोडं हटके सांगायचे तर ,या परिसरात उंबर ,जांभुळ व इतर फळ -फुलझाडे असल्याने पोपटांचे थवेच्या थवे ,भारद्वाज ,फुलपाखरे ,तांबट आणि अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा वावर सुरू झाला आहे . बाहेरील बागेत त्यांच्या साठी दाणा -पाणी ठेवण्यात ही निर्भेळ आनंद मिळतो .
            प्रत्येकाच्या आयुष्यात ,अपना टाइम ,येतच असतो . सध्या पक्षी शुध्द हवेत मुक्त संचार करीत आहेत ,आणि माणसे सिमेंट च्या पिंजऱ्यात बंदिस्त आहेत . काळजी करत बसण्या पेक्षा स्वतः ची आणि सोबत इतरांची काळजी घेऊ यात व वर्तमानाला सकारात्मकतेने सामोरे जाऊ यात . शुभमं भवतु .
          आसावरी जोशी
कर्वेनगर पुणे ,४११०५२,
सेल नंबर -९६८९३९०८०२