सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

Happy २५th anniversary Archana -vinay best wishes for silver jubilee of your marriage

                        Happy २५th anniversary 
Archana -vinay best wishes for silver jubilee of your marriage 
   अर्चना -विनय १९९५मध्ये याच दिवशी सहजीवनाचा तुम्ही उभा केलात राजमहाल ,
धर्मेच -अर्थेच ...... वचने पूरी करत प्रेम ,सहकार्य ,तडजोड अन आश्वासक वृत्तीने सोडवलेत सर्व सवाल 
सुखी संसाराचा स्थायी भाव ‘प्रेम ’कधी मूक तर कधी व्यक्त होऊन करीत गेलात एकमेकासी बहाल ,
आप्त ,मित्र ,परिवारा सोबत प्रेम अन कर्तव्याने कायम जोडून ठेवलीत नाळ ,
“ईशा -अनिका “तव नभांगणातील “चंद्र -सूर्य “अखंड प्रकाशित ,सांज असो वा प्रातःकाल ,
स्वयंपूर्ण असते का कुणी ?पण सुंदर सांभाळलात जीवन संगीतातील सूर -ताल ,
संसाराचे सार उमगले तुम्हां ,पायातपाय ऐवजी हातात हात घालून चालण्याची तुमची केमिस्ट्री कमाल !!
शुभदिनाचा रौप्य -सुवर्ण—हीरक महोत्सव साजरा करा ,बनून एकमेकांची ढाल ,
एक श्वास तर दुसरा उश्वास ,योग चंदेरी ,वृद्धिंगत होत राहो प्रेमाचा खजिना ,
लाभो उभयतांना उदंड आयु -आरोग्य -सुख समृद्धी-समाधान ,हाच आशिर्वाद अन कामना ,
तव सहजीवनाचा वृक्ष बहरो सदा ,प्रार्थना स्वीकारा श्रीगणेशा -गौरीनंदना . 
                                        आई

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

को जागर्ति ,को जागर्ति

       को जागर्ति ,को जागर्ति 
कोजागरी पौर्णिमा हा सण लक्ष्मी ,ऐरावतावर आरूढ इंद्र देव ,अश्विनीकुमार ,मनाचा ग्रह चंद्रमा यांच्याशी निगडीत आहे . या दिवशी हे सर्व आराध्य तत्व रूपात पृथ्वी वर अवतरतात अशी आस्था . या सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  चंद्र या दृश्य माध्यमा च्या पूजेने   आपणास सुख ,समृद्धी ,शारीरिक -मानसिक आरोग्य लाभते . 
     ‘   को जागर्ति ‘म्हणत निरभ्र नभांगणात चंद्रिका जडित सिंहासनावर  निष्कलंकित शीतल तेजाने युक्त पूर्ण चंद्र विराजमान झाला . त्याने  निद्रितानां जागे करीत व जागे असलेल्याना सत्य -असत्य ,सदाचार -दुराचार ,स्वाभिमान -दुराभिमान ,न्याय -अन्याय ,विवेक -अविवेक ,आरोग्य -अनारोग्य ,पवित्र अपवित्र ,सुर -असुर ,कर्म-अकर्म यातील चांगल्याची निवड अन वाईटाचा नाश करण्या साठी दृष्टी पथात प्रकाशाची उधळण केली . हरिद्रा ,कुंकुम ,पुष्प अक्षदा वाहून पूजन ,दिव्याने औक्षण ,अर्ध्य सोडून मसाला दुधाचा नैवेद्य ,नमन आदि परंपरागत उपचार करून आम्ही प्रसादाचे प्राशन केले . 
    पूजोपचार नुसते निरर्थक उपचार नसून रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बहुगुणी वस्तू हाताशी असाव्यात हाच आपल्या पूर्वजांचा  खरा हेतू असावा . दीप म्हणजे अग्नीचे प्रतीक . त्यात सर्व वाईट गोष्टीना भस्म करून पुन्हा स्वतः शुद्ध व तेजोमय रूपात प्रज्वलित राहण्याची शक्ती असते . मसाला दूध म्हणजे शुद्ध ,सात्विक ,स्निग्धता या गुणांची हानि न करता केशराचा सुंदर रंग ,वेलचीचा सुगंध साखरेचा गोडवा ,सुक्या मेव्याची पौष्टिकता स्वतः मध्ये सहज सामावून घेऊन गुणांची वृद्धी कशी करावी याचे प्रतीक . आपले शरीरच नव्हे तर संपूर्ण सृष्टी पंचतत्वांनी व्याप्त आहे . आपल्या प्रत्येक सण ,वार ,उत्सव यात पृथ्वी ,जल,वायू,अग्नि आकाश ,यात आणि निरामय जीवनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा समतोल साधणे शिकवले जाते . त्यातील भावार्थ लक्षात घेणे महत्वाचे . 
   मी वर चंद्राला निष्कलंक म्हंटले आहे . आपण नेहमी सौंदर्यवतीच्या सुमुखाला चंद्राची उपमा देतो . पण आज मला चंद्रात सुमुखीचे दर्शन झाले .चंद्रावरील काळे डाग ,डागनसून कुरळे काळे केश आहेत ,गहिरे पाणीदार काळे नयन आहेत ,वाईट नजर लागूनये म्हणून लावलेला काळा टिळा आहे रजत कांतीवर शोभणारा तीळ आहे चंद्रावरील खाच खळगे म्हणजे सौंदर्याला चार चांद लावणाऱ्या गालावरील खळ्याच जणू .प्रत्येक महिन्या च्या पौर्णिमेला उगवणारा चंद्र सुंदरच दिसतो पण कोजागरीचा चंद्र मातृत्वाचे तेज असणाऱ्या दोन जीवांच्या सुमुखी प्रमाणे पवित्र शीतल तेजोमय भासला . नुकताच नवरात्रोत्सव झाल्याने चंद्रमुखात नवदुर्गेचे सर्व गुण दिसून आले . 
   कोजागरी चा एक भाग म्हणजे ‘अश्विनी ‘,या दिवशी ज्येष्ठ अपत्याचे औक्षण करून भेटवस्तू दिली जाते ,या परंपरेचा माझ्या शूद्र मती ला उमगलेला अर्थ म्हणजे अति ज्येष्ठानीं ज्येष्ठांना ,ज्येष्ठानीं अनुजांना आपल्या चांगल्या परंपरा व संस्कृती चा ठेवा साखळी रूपाने पुढे नेत राहणे . पुन्हा औक्षण करणे म्हणजे अमूल्य ठेव्याला असुरी शक्तींची नजर लागूनये अन वक्रदृष्टी झालीच तर त्वरित त्याचे भस्म व्हावे . म्हणून निरांजन रूपात अग्नीला साक्षीस ठेवणे . सुसंस्कारांचा ठेवा ओझे नसून अमूल्य संपत्ती आहे ,जितकी वाटाल तेवढी वाढत जाणारी अजर -अमर . 
  चंद्रमा ,चांदोबा ,चंदामामा ,रजनीश जुन्या वस्त्रा च्या एका धाग्याने कायमचा बंधनात अडकणार निरिच्छ भाऊराया ,मनोदेवता बाह्य नेत्रांना अंधारात वाट दाखवणारा ,चढ -उतार ,खाच खळगे युक्त जीवनप्रवासात अंतः चक्षूंना उन्मिलित करून ,आत्मा -परमात्मा ,शिव -शक्तीच्या पारमोच्च मिलनाचा मार्ग सुकर कर ,हीच तव चरणी नमन पूर्वक प्रार्थना .       
       आसावरी जोशी .