गुरुवार, २० जानेवारी, २०२२

आठवणीतील गांव

आठवणीतील गांव 
माझे पूवाश्रमीचे नांव शकुन्तला प्रभाकर बापट . माझे लहानपण भवानीमंडी /भैसोदामंडी या सीमारेषे वरील जोडगावात गेले . हे स्टेशन  मुंबई -दिल्ली ला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे वरील नागदा आणि कोटा जंगशन च्या साधारण मध्यावर आहे . याचे अदभुत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे भवानी मंडी स्टेशन वर गाडी उभी राहिली तर एका बाजूचा प्लॅटफॉर्म भवानी मंडी (राजस्थान )जिल्हा झालावाड मध्ये तर दुसरी कडील प्लॅटफॉर्म भैंसोदा मंडी (म . प्र . )जिल्हा मंदसौर मध्ये येतो . तिकीट खिडकी वरील तिकीट देणारा म . प्र . मध्ये बसतो तर तिकीट घेणारे यात्री राज. मध्ये उभे असतात . दिल्ली कडून मुम्बई कडे जाणारी गाडी स्टेशन वर थांबली तर इंजिन राजस्थान आणि गार्ड चा डबा म . प्र . मधे असतो ,याच्या उलट मुंबई कडून येणाऱ्या गाड्यांचे असते . 
स्वातंत्र्य पूर्व काळात माझे आजोबा भवानी मंडी जवळील केसोदा नामक छोट्याश्या गावचे जहागीरदार होते ,जे आधी ग्वालियर स्टेट व नंतर म . प्र . मध्ये आले . स्वातंत्र्या नंतर जहागीरदारी संपुष्टात अली पण शेती आणि संत्री ,मोसंबी,लिंबाची बागायती मात्र होती . पुढे माझ्या वडिलांनी शेती सांभाळली आणि आधुनिकतेचा स्पर्श देऊन भरभराटीस आणली . शेतमालाची ने आण करणे सोपे जावे म्हणून आजोबांनी भैसोदा मंडीत जागा घेऊन मोठे घर बांधले होते . बऱ्याच खोल्या ,धान्य साठवायची कोठारे ,ओसरी ,अंगण ,विहीर गोठा छोटी बाग इत्यादी . वडिलांनी वीज ,पाणी ,फरशी अश्या सुधारणा केल्या .भाड्याने देण्या साठी पण ६-७डबल रूम बांधल्या . आजी -आजोबा ,आई -वडील ,एक बाल विधवा आत्या ,आम्ही तीन भाऊ दोन बहिणी अशी भावंडे ,कायम पै -पाहुण्यांचा राबता ,असे आमचे आनंदी संयुक्त कुटुंब होते . शेजारी आणि भाडेकरुही कुटुंबाचाच एक भाग असत . आमचे प्राथमिक शिक्षण म . प्र . मध्ये माध्यमिक राजस्थान मध्ये झाले . पूर्वी कॉलेज नसल्याने माझे एम . ए .हिंदी लिटरेचर पर्यंत चे  शिक्षण बाह्य विद्यार्थी म्हणून पुन्हा विक्रम युनिव्हर्सिटी उज्जैन मध्य प्रदेश मधून झाले.

भैसोदा मंडी एका छोट्या वसाहती सारखी होती पण भवानी मंडी मात्र सर्व सुख सोयीने युक्त गाव होते . धान्य,कापुस ,तेल बिया ची मोठी बाजार पेठ होती त्या मुळे रेल्वे स्टेशन ला ही खूप महत्व होते . आमच्या कडे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाहुण्यासाठी येथील विविध प्रकार ची शेव ,कलाकंद ,कचोरी चे विशेष आकर्षण होते . 
काही गमतीदार आठवणी म्हणजे -उत्तरे कडून मुंबई कडे दुभत्या म्हशींना घेऊन जाणाऱ्या मालगाड्या इंजिन मध्ये कोळसा-पाणी भरण्या साठी थांबल्या कि भैया लोक दूध -दूध म्हणून ओरडत ,लगेच सर्व लोक पैसे ,पातेली घेऊन स्वस्त -मस्त-धारोष्ण दूध आणण्या साठी धावत ,मग काय वस्तीत खीर ,बासुंदी ,हलवा बनवून अचानक सण साजरा होत . तसेच कधीतरी आमच्या कडे मुंबईहून फास्ट ट्रेन ने पाहुणे येणार असले तर आमच्या घरात राहणारे रेल्वे ऑफिसर ट्रेन ला रेड सिग्नल देऊन गाडी काही मिनिटे थांबवत ,आमचे पाहुणे लगेच खाली उतरून चालत घरी येत . ६०-७०वर्षांपूर्वी तरी येथे सर्व धर्म-जाती-भाषा -स्तरातील लोक एकोप्याने रहात ,एकमेकांना अडीअडचणीत मदत करीत .हिंदी भाषिक प्रदेशात २-४मराठी घरे दुधात साखर मिसळावी तशी वेगळेपण टिकवत एकरूप झाली होती .  गतकाळातील गोड आठवणींचा ठेवा आजही मोठी ऊर्जा देऊन जातो हेही परम भाग्यच . 
                                                                                     आसावरी जोशी 
                                                                                   १चिंतामणी अपार्टमेंट ,३८/२मधुबन कॉलनी ,
                                                                                     कर्वेनगर ,पुणे ४११०५२,
                                                                                   सेल-९६८९३९०८०२