रविवार, २ डिसेंबर, २०१८

. अक्षय योजना

        .                 अक्षय  योजना 
अक्षय बचत योजनेचा किती गावा गोडवा !!!!!
क्षमतेनुसार वेळ -विवेकबुद्धी -कष्ट -पैसा निरिच्छ पणे गुंतवावा ,
ना वयाचे ,ना अर्थाचे ,ना ओळखपत्राचे बंधन ,परमार्थ योजनेचा लाभ ,संस्कारानेच कळावा ,
ना बंद पडण्याची ,ना चोरीची भिती ,योग्यवेळी मिळणारच असतो परतावा ,
श्रद्धा -सबुरी -भक्ती -विश्वास मात्र मनापासून जपावा ,
असंख्य वही खात्यांचा हिशोब "तो "एकटा कसा बरे ठेवत असावा ?
याच्या शाखा त्रिलोकी  २४x ७सुरु  ,एकही सुट्टीचा वार नसावा ?
संकट समयी ,कधी ओळखीचा तर कधी अनोळखी चेहरा' दत्त 'म्हणून उभा ठाकावा !!!
याचा अनुभव ,ज्याने -त्याने अपापल्या परीनेच ,लागतो घ्यावा ,
योजना तशी खूप जुनीच ,पण उजाळया साठी ,अधून -मधून एखादा संत -सदगुरु लागतो जन्मावा ,
तव चरणी शतशः प्रणाम ,परमेश्वरा तुझा आशिर्वादाचा हात ,सदा आमच्या शिरी असावा !!! 

सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

तू तू -मै मै

     तू तू -मै मै 
कॉम्पुटर म्हणे मी महान ,चौफेर माहिती चा जणू मी खजिना ,
जसे लॉकर मधे ठेवता ,पैसा -अडका ,कागद -पत्रे ,दाग -दागिना ,
नेट प्रोव्हायडर म्हणे ,माहितीचे असुदे तुजपाशी भांडार ,
पण त्याची 'मास्टर की 'मजपाशी ,तुम्हास देतो होऊनि उदार ,माना माझे आभार!!
वीज म्हणे ,ऊर्जा देते ,दृष्टी देते ,वाट दाखवते ,भेदण्यासाठी अज्ञानाचा अंधार ,
मानव म्हणे मी सर्वात महान ,माझ्या बुद्धी शिवाय सबकुछ बेकार ,
यंत्र मानव पुटपुटला ,मी आहे ना !!अरे तुला पण केलाय मानवानेच तर तयार !!
गुरु वदला ,अरे लहान -मोठ्या पाची बोटांची मूठ वळली तरच ,ताकत होते कैक पटीने तयार ,
भांडू नका ,एकमेकासी सहाय करा ,तरच मिळेल मान ,अन होईल सर्वांचाच उद्धार .

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

बैल पोळा

                              बैल पोळा 
वसु बारस असो वा नागपंचमी ,श्रावण मास सरता सरता आला बैलपोळा ,
पशुधनाला ,मित्र प्राण्यांना आदर देण्या ,सण समर्पित ,एक -एक आगळा -वेगळा ,
पूर्वजांनी निर्मित केले कित्येक सण -वार ,त्यांना बैठक होती आणे सोळा ,
फूल ना फुलाची पाकळी अर्पून ,आपण प्रेम ,परोपकार ,मैत्रभाव ,अन नातेसंबंधांना देत राहू दरवर्षी उजाळा ,
गोड -धोड ,गाठी भेटी ,वस्त्रालंकार ,साज -सजावटीची देऊन जोड ,अविस्मरणीय होतो ,कृतज्ञेचा सोहळा ,
कोजागिरीला चंद्र चांदणी ,श्रावणीला सागर भरणी ,संक्रांतीला सूर्याची मनधरणी ,भाव खातो रंगही काळा ,
मनसोक्त काहीही खायचे प्यायचे म्हणून ,साजरी होते अमावस्या गटारी ,
पण चातुर्मासाची किंवा सणा मागची बंधने पाळायची ,नसते आपली तयारी ,
सोईस्करपणे कर्म -कांड ,बुरसटलेले विचार ,अंधश्रद्धा यांना ढाल बनवून ,उगारायच्या तलवारी ,
ग्रह -तारे ,मृत -जीवित ,पशु पक्षी प्राणी ,वृक्ष -वेली ,निसर्गादीला जपण्या साठी ,त्यांना दिले देवाचे स्थान ,
जड -चेतन ,सूक्ष्म -स्थूल ,दृश्य -अदृश्य ,गुरु -लघु ,लौकिक -अलौकिक यांचे ,पूर्वजांना होते अफाट ज्ञान ,
मानवता ,कुटुंब ,समाज ,राष्ट्र अन विश्वाच्या कल्याणा साठी झटणाऱ्या ,महामानवांना काही तिथी -जयंती समर्पित ,
आपल्या संस्कृतीचे करू किती गुणगान ?तेतर वाटे मज शब्दातीत ,आहेच तेतर शब्दातीत ...... 


रविवार, २ सप्टेंबर, २०१८

हात

                      हात 
नवजाताला कुशीत घेणारे आईचे हात ,
आईचा पदर आशेने घट्ट धरणारे बाळाचे हात ,
बाळाला भरवणारे ,हाताला धरून चालायला शिकवणारे ,
हातात पेन्सिल धरायला शिकवणारे ,दमल्या बाळाला कडे घेणारे ,
कौतुकाने गालगुच्य घेणारे ,शाबासकीची थापदेणारे  ,वेळ पडली तर गालावर चापटपोळी ही देणारे ,
दोनचे चार हात झाल्यावर ,जोडीदाराच्या हातात हात सोपविणारे मुलांच्या पालकांचे हातच ,
कर्तृत्व बजावणारे ,दातृत्वाचा वसा घेणारे ,मदतीला धावून जाणारे हातच ,
षडरिपूंच्या आहारी जाऊन ,हात ओले करणारे ,हात धुवून घेणारे ,हातघाईला येणारे ,कुकर्म करणाऱ्याचें व्यर्थ जाई जीवन ,
देशासाठी शीर हातात घेणाऱ्या ,वीरांना मात्र शतदा करूया नमन ,
देवाजींनी दिलेले एक कर्मेंद्रिय ,निरिच्छ सत्कर्मा साठी भाग्यवंतालाच लाभते मोठे मन ,
जगताच्या कल्याणासाठी ,फेर धरुया प्रेमाने ,घेऊन हातात हात ,
जन्मापासून पंचभूतात विलीन होईपर्यंत  ,लागतातच मदतीचे हात ,
देवा !!सन्मती -सदगती येण्यासाठी ,असुदे आमच्या शिरी ,सदैव तुझा आशिर्वादाचा हात . 


शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

मैत्र

                                मैत्र 
मैत्र असावे बर्फासम उबेने वितळणारे ,नितळ आणि पारदर्शी ,
वायुसम शीतल ,प्रवाही ,ना कुम्पण ना वेशी ,
एका हाकेला प्रतिध्वनी सारखे धावत येशी ,
धरणीसम क्षमाशील ,आश्वासक ,जणू विसावा देणारी हाताची उशी ,
चंद्र -सूर्य -ग्रह -तारे ,विभिन्न प्रकार -प्रकृती राहती ,जसे अनंत -आकाशी ,
सागरासम अथांग ,ओहटी असो वा भरती ,आधार देई किनाऱ्याची कुशी ,
मैत्र भावनेची दिली जोड ,तर प्रत्येक नाते होई सुगंधित -सोनेरी -बावनकशी !!!!! 

. ओडोमॉस

.                                          ओडोमॉस 
चला मुलांनो बागेत जाऊ ,खेळ खेळुया एक खास ,
जाण्यापूर्वी विसरू नका अंगभर लावायला ,ओडोमॉस ,
नाक नका मुरडू ,त्याचा असतो चांगलाच वास ,
नाहीतर मंडळी हल्लाबोल करातील ,गुणगुणणारे मोठे डास ,
खाजवून -खाजवून हैराण व्हाल ,सहन नाही होणार तुम्हाला त्रास ,
डासांना आवडे ,जेवणामधे ,गोड -गोड ब्लडी घास ,
प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर ,हेच शिकवलेस ना आज्जी तू आम्हास ,
हो मुलांनो प्रेव्हेंटिव्ह क्रीम किंवा स्प्रे वापरल्याने ,दासोपंत दूर राहतात थोडेतरी तास 

,

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

Undergrad wishes

                              ईशा ताई -ईशा ताई
ईशा ताई ,घरा पासुन दूर ,डॉम लाईफ ची मज्जा तुला ,कळली का ग बाई ,
ना गाडी ,ना लिफ्ट ,जिकडे -तिकडे चालत -पळत फार तर फार बसने  जाई ,
धावपळ नुसती ,क्लासेस -अभ्यास -,जेवण -खाण ,लाँड्री आणि साफ -सफाई ,
चंदन काय नि .. .. ..काय हे  नाव काही तुझी साथ सोडत नाई ,
सुट्टी मधे घरी आल्यावर ,सिस्टरली लव्ह ची करत जा हं तुम्ही भरपाई ,
डिग्री सोबत ,हा सगळा अनुभवही ,आयुष्यात खूप कामास येई ,
मिळालेल्या संधीचे सोने कर ,पर्ड्यू यूनीवर्सीटी हे नावच सगळे सांगुन जाई ,
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद !!!!!!!!!
पाठीशी आहेत मामा -मामी ,भाऊ -बहिणी ,फॅमिली -फ्रेंड्स ,आज्जी आणि बाबा -आई . 

रविवार, २९ जुलै, २०१८

जोकर

             सर्कस आणि पत्यातील जोकरचे लहानपणी वाटणारे महत्व ,आणि आता मोठेपणी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ,यात किती बदल झालाय ,याचे माझे मलाच आश्चर्य वाटले . तो बरेच काही शिकवून जातो . 
                                            जोकर 
बावन्न पत्त्यांच्या संचात ,ज्याची ना गणती ,ना कुणी कैवारी ,
तरी ,'जेथे कमी तेथे आम्ही 'म्हणत ,मदतीला तयार अष्टौ -प्रहरी ,
        
सर्वांना वाटे विदूषकाचा आधार ,बावन्न पत्ते असो वा सर्कशीतील प्राणी अन कर्मचारी ,
पद छोटे पण कर्तब मोठे ,गैरहजर असणाऱ्या कुणाच्याही कामाची पेलतो जवाबदारी ,
हुकुम ,पेअर ,कलर ,सिक्वेन्स, एक्का ,राजा -राणी ,तोरा मिरवितात पत्त्यांच्या दरबारी ,
पोकळी भरून काढणारा ,अनेक पदे भूषविणारा असे जोकर ,तरी नसे अहंकारी ,
संकट समयी सर्कशीत अन  ,हरवलेल्या -फाटलेल्या पत्याची उणीव भरणारा हरहुन्नरी ,
गृहित बिचारा ,साक्षी -भावाने उपयोगी पडणारा ,कुणी गुलाम असो वा राजा भोगी ,
पत्त्यांचा असो वा सर्कशीचा खेळ ,मला नेहमी जोकर वाटे एक महान कर्म -योगी .

सोमवार, १९ मार्च, २०१८

अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------



     .  अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------
            २०जानेवारी १९८०या दिवशी कोणत्याही अडथळ्यांची चिंता न करता जन्माला आलेले आमच्या वंश -वृक्षाचे हे शेंडेफळ . दोन वर्षापेक्षाही कमी अंतर असलेला -आलोकचा जणू पाठिराखाच . आलोक -अनिरुद्धला जुळ्यांप्रमाणेच वाढवलेले आठवतंय मला . 
            तीक्ष्ण बुद्धी आणि इतरांवर छाप पडेल असे व्यक्तिमत्व असलेला . आमच्या कडे पूर्वी पाहुण्यांची बरीच वर्दळ असायची . पुण्याला कोणी शिक्षणासाठी ,कोणी नोकरीसाठी ,कुणी उपचारासाठी तर कुणी सहज पुणे बघण्यासाठी आमच्या घरी येत असत . सहा ते साठ वयाच्या सर्वांशी लाघवी पणाने बोलून आपलेसे करून त्यांना कम्फर्टेबल झोन मधे आणणारा हा माझा मनकवडा मुलगा ,म्हणून कदाचित याला लहानपणी लाडाने आम्ही' मोनू 'म्हणत असू . ताई -दादा चे मित्र -मैत्रिणीनशी याची खास मैत्री . त्यांच्या सर्व वस्तू कुठे असतात ?आई मीठ मोहरी ,डाळ -तांदूळ कुठे ठेवते याची त्याला बारिक माहिती असत . चौकस बुद्धी आणि तीक्ष्ण पंचेंद्रिय असल्याने आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी त्याला माहीत असत . अभ्यास मात्र उडत -उडत करायचा ,त्यामुळे त्याला बरेच वेळेला ,ओरडा बसायचा . पण परिक्षेत मार्क मात्र उत्तम असायचे . शाळेत आदर्श विद्यार्थी ,आणि पालकांनाही आदर्श पालकांचा मान मिळवून देणारा हा आमचा मुलगा !!!!
       अर्चनाताईने लहान भावाचे नाव अनिरुद्ध ठेवायचे असे सांगितले . आणि आम्ही तेच नांव ठेवले . नावाप्रमाणे कोणत्याही रोधकाची पर्वा न करता ,बारावी टेक्निकल ,सी . ओ . ई . पी . मधे प्रॉडक्शन इंजिनियरिंग ,आणि अमेरिकेतील सिनसिनाटीहून एम . एस . होऊन नोकरीत स्थिर -स्थावर झालेले गुणी बाळ ते !!!चारुताचायोग्य जोडीदार  शुभम -मुक्ताचा प्रेमळ बाबा ,मुलगा ,जावई ,भाऊ ,मामा -काका अशी सर्व नाती जवाबदारीने अन प्रेमाने सांभाळणारा . अमेरिकेतून आईला रोज फोन करून हाल -हवाल विचारणाऱ्या या माझ्या मुलाचे माझ्या बऱ्याच नातेवाईकांना आणि मैत्रिणींना कौतुक वाटते

      एक गोड आठवण शेअर कराविशी वाटते ,ती म्हणजे अनिरुद्ध साधारण १०-१२वर्षाचा असताना ,मी घरी नव्हते आणि माझी एक मैत्रिण सहज घरी अली . हा घरी एकटाच होता . त्याने माझ्या मैत्रिणीशी छान गप्पा मारल्या ,फ्रिज मधील एक वडी तिला दिली ,आमची बाग दाखवली ,आणि बागेतील एक सोनटक्याचे फूल ,मरवा -दवणा असे एकत्र करून त्याने माझ्या मैत्रिणीला दिले . मी घरी आल्यावर मैत्रीण भारावून जाऊन माझ्या जवळ त्याचे कौतुक करीत होती . इतरांनी आपल्या मुलांचे कौतुक करावे ,या पेक्षा मोठा आनंद तो काय असू शकेल पालकांना ???
                                                                                             आई 

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

निष्काम कर्म

                                           निष्काम कर्म 
एकदा नदीकाठी निवांत बसले असता निसर्गाच्या निष्काम कर्मा संबंधित अनेक विचार डोक्यात येऊन गेले . नदीचा जन्मदाता पर्वत . त्याला अचल ,नग ,पाषाणाचा बनलेला असे काय काय आपण म्हणतो . मंदबुद्धी माणसाला म्हणतो ,डोक्यात काय दगड -धोंडे भरलेत ?निर्दयी माणसाला पाषाण हृदयी संबोधतो . 
      पर्वत निष्काम कर्म करतो म्हणून काय त्याच्या हृदयातील ओलावा दिसूच नये माणसाला ?घनदाट वनराई अन अनेक जीवांचा पालनकर्ता तो . पर्वताच्या पोटातूनच जीवनदायिनी नदीचा जन्म होतो . कधीही एकत्र येऊ न शकणाऱ्या दोन किनाऱ्यांना कायम सोबत घेऊन ,अविरत प्रवाहित राहणे ,हेच तिचे 'जीवन '  . नदीकाठीच अनेक महान संस्कृती जन्माला आल्या ,सुखावल्या . पाणी म्हणजे नदीचा आत्मा . त्याला 'जीवन '  ऐसे नांव . जीवाच्या जन्म -मृत्यु च्या मधील काळ म्हणजेच 'जीवन '. तसेच डोंगरातून जन्मून ,सागरात विलीन होई पर्यंतच्या प्रवासात पाण्या मुळेच नदीचे अस्तित्व असते ,म्हणून त्याला जीवन ऐसे नांव . 
         समस्त जीवांना जीवनदान देणारी नदी स्वतः कधीच पाणी पीत नाही . पण दुष्काळ समयी बिचाऱ्या नदीलाच निंदायचे !
       नदी -नाले -ओहोळ आपल्या बरोबर जेकाही वाहून आणतील -काष्ठ ,पाषाण ,पंजर ,प्लास्टिक ,त्या सर्वांना सामावुन घेणारा अथांग सागर . ओहोटी -भरती आणि इतर अनेक आंदोलने सागराच्या खाऱ्या जीवनात ,सतत सुरु असूनही ,तो आपली सीमा कधी ओलांडत नाही .  
          अथांग पाण्याचा साठा असून ,ना तहान भागवायला सागराच्या पाण्याचा उपयोग ,ना वापरण्यासाठी उपयोग ,लोकांचे असे कटु बोल पचवून सुद्धा ,इतरांसाठी सर्व खारटपणा स्वतः जवळ ठेवून ,शुद्ध गोड पाणी वाष्प रूपाने ढगांकडे पाठवणार महासागर किती महान आहेना ?
           निष्काम कर्माचा संदेश देणाऱ्या निसर्गातील सर्व गुरूंचा आपण आदर करू या ,मान राखूया . थोडेतरी त्यांचे गुण आत्मसाद करूया . निसर्गाचे संरक्षण -संवर्धनच त्यांची खरी गुरुदक्षिणा होय .

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा .

            आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा . 
                      गुरुवार दिनांक २३फेब्रुवारी १९७८हा दिवस ,माझ्या आयुष्यातील कॅलेंडर मधील ,एक सोनियाचा दिन . म्हणून कदाचित आम्ही आलोकल  लहानपणी सोनू म्हणायचो . आलोक लहानपणापासूनच शांत ,स्वावलंबी ,मोठ्यांचा मान राखणारा ,लहानांना प्रेमाने मदत करणारा ,निश्चयी ,मितभाषी पण मिष्किल ,मोजके पण जिवलग मित्र असलेला . व्यवस्थित जेऊन सुद्धा शरीरयष्टी मात्र फारच किरकोळ . अर्चना -आलोक -अनिरुद्ध ही भावंडे फारशी भांडलेली मला आठवत नाही . एक गम्मत सांगाविशी वाटते ,लहानपणी तो अंक आणि अक्षरे उलटी लिहायचा ,मिरर इमेज सारखी . तीन ला सहा आणि सहाला तीन तर हमखास . तोच प्रकार कुलुप -किल्ली च्या बाबतीत . पण प्राथमिक शाळेत पहिला -दुसरा क्रमांक सोडला नाही . कधी चारू पहिला तर कधी आलोक पहिला . 
            चिकाटी आणि हार्डवर्क च्या जोरावर बारावी बोर्डात नंबर आला आणि इंजिनिअरिंग ,एम . एस . ,पीएच . डी . असे टप्पे पूर्ण केले . पर्ड्यूला कोराफासच्या अवॉर्ड साठी नॉमिनेशन झाले तेव्हा आणि पीएच . डी . ग्रॅज्युएशन सेरेमनी चा वॉक पाहताना अभिमानाने ऊर भरून आले . पुढे नोकरी ,लग्न ,बाबा म्हणून ही प्रमोशन मिळाले . 
            आता आलोक -अनन्या -अर्चित पुण्यात आल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झालाय . 
 चाळीशी म्हणजे काय ?जणु अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
  आमच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या ,पाठीशी असावे . 
                                                                                                           Aai

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

व्हॅलेंटाईन डे

                         फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात . प्रेमाच्या अनेक रंगछटा आपल्याला पहायला मिळतात . गडद -फिक्या ,प्रकट -सुप्त ,एकांगी -द्विअंगी ,त्रिकोनी ,स्वार्थी -निस्वार्थी ,सफल -असफल इत्यादि . सामान्यांपेक्षा प्रेमात दुःखांताला सामोरी जाणारी अनेक प्रेमी -युगले ,अजरामर झालेली आपल्याला माहित आहेत . त्यातीलच एक म्हणजे शमा -परवाना ही जोडी . प्रेयसीचे प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःला संपवून अमर झालेला परवाना चांगलाच भाव खाऊन जातो . सोशिक -कर्तव्यनिष्ठ वृत्ती मुळे ,शमा जरा दुर्लक्षित -उपेक्षितच राहिलीशी वाटते . मला अश्यांबद्दल विशेष आस्था आहे ,कदाचित म्हणून शमाने एकदा आपली व्यथा ,माझ्या जवळ व्यक्त केली आणि तीच मी आपल्या समोर पेश करीत आहे . 
             मराठी माझी मातृभाषा ,हिंदी मैत्रभाषा -राष्ट्रभाषा आणि अध्ययनाचे माध्यम ,त्यामुळे कधी मराठीतून विचारांशी संवाद होतो तर कधी हिंदीतून . सहज सुसंवाद महत्वाचा !!!!
               व्हॅलेंटाईनडे ला शमा -परवाना या युगलाला निवांत हवा असल्याने ,ते उद्याच आपल्या भेटीला येत आहेत . 

                                                                                       आसावरी जोशी