गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

||वानप्रस्थ ||




ज्ञानी जनांचे ऎकावे वचन एक ,
संसारी राहून पेलाव्यात ,जवाबदार या अनेक ,
जसे खमंग ,पौष्टिक रुचकर भोजन बनवी सुरेख ,
अंगी ना चिकटे काही ,काय ही निर्लेप भांड्याची मेख ,
          अलिप्त असावे कुटुंबात राहून ,
आंब्याच्या बाठी सारखे कशाला घ्यावे बरबटून ,
चिक्कुत राहून बी नाही घेत काही चिकटवून ,
देऊ घेऊ आनंद वानप्रस्थात राहून .

।।नियोजन ।।




भुकेच्या आधी स्वयंपाकाची ,अंधाराच्या आधी दिवा-बत्ती ची तयारी करतात ,
उतार वयासाठी आर्थिक नियोजन ही हल्ली बरेच लोक करतात ,
पण जवाबदारीतून मोकळे झालो या आनंदात ,काहीलोक मोकळ्या वेळेचे नियोजनच विसरतात ,
मग रिकामपणी नकोनकोते विचार सतावतात ,अन तनामनाला दुखणी घेरतात ,
अश्यावेळी छंद जोपासावे ,निर्लेप मनाने उपयोगी पडावे ,म्हणजे उतरती चे दिवस चांगले जातात .

Wanaprasth sutra



                         ।। वानप्रस्थ ।।   
सध्या ६०ते ७०वयोगटातील माझ्या पिढीला वानप्रस्थात प्रवेश करून बरेच दिवस लोटले . पण नुसते वर्षाचे टप्पे गाठून उपयोग नाही . त्या त्या टप्प्यातील जवाबदाऱ्या चोख पार पाडल्या शिवाय पुढच्या आश्रमात मन रमणे अवघडच . हल्लीतर ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमातप्रवेशालाच उशीर होत चाललाय . (शाब्दिक अर्थाने नव्हे ,तर पारंपरिक व्यवस्थे प्रमाणे )त्यामुळे पुढचे टप्पेच अनिश्चित झाले आहेत . जन्म आणि मृत्यू यामधील काल म्हणजे जीवन असते ,पण तो काल किती वर्षांचा असेल ,कुणीच सांगू शकत नाही . हल्ली धकाधकीच्या काळात तर अजून अवघड . ब्रह्मचर्यातील शिक्षण म्हणजे नुसत्या पदव्या घेणे नव्हे . कोणतीही शाखा असूद्या नीतिमूल्यांचे शिक्षण ,कोणत्याही परिस्थितीत विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचे शिक्षण ,दुसऱ्यांची सुखे न हिसकावता सुखी -समाधानी जगायचे आणि जगू द्यायचे शिक्षण ,आपल्या जवळील ज्ञान ,बुद्धी ,पैसा,वेळ इत्यादि थोडेतरी इतरांसाठी खर्च करण्याचे शिक्षण इत्यादि गोष्टी आखून दिलेल्या टप्प्यात शिकता येऊ शकतात . पण सध्याच्या विभक्त कुटुम्ब पद्धती मुळे ज्याचा भार त्यानेच पेलायचा असतो . डिग्री शिवाय नोकरी नाही अन नोकरी शिवाय छोकरी नाही . त्यामुळे पन्नाशी आली तरी या काळात सांसारिक जावाबदार्यांचा डोंगरच समोर उभा असतो . त्यामुळे परंपरेला व्यवहाराची जोड द्यावीच लागते ,हाही शिक्षणातीलच महत्वाचा संदेश


                हल्ली चौथ्या सन्यास आश्रमा बरोबर काहींना एका नवीन आश्रमाला सामोरे जावे लागते ,तो म्हणजे 'वृद्धाश्रम '. काळाचा महिमाही स्वीकारावाच लागतो . असो. 
           नव वर्षा निमित्त वानप्रस्थात ठरवलेल्या काही गोष्टींची उजळणी . पाठ पक्का होण्यासाठी अधून-मधून उजळणी केलेली बरी . या महिन्याची प्रस्तुती ---१-वानप्रस्थ २-नियोजन ३-जीवनप्रवास ४-सुख दुःख ,नातीगोती इ . ----

।। जीवन प्रवासातील टप्पे ।।

जन्म -मरणा मधील अनिश्चित काळाचे नावच असे जीवन,
बालपण -तरुणपण -म्हातारपण ,असे होत जाते प्रमोशन,
प्रवास म्हंटले कि आलीच धावपळ ,अन अनेक टेन्शन्स,
काळजी कमी करता येते,वेळेवर करुन प्रवासाचे नियोजन ,
बालपणी सगळे आपली घेतात काळजी ,देऊन फुल अटेन्शन ,
पुढच्या -मागच्या पिढीला सांभाळायची ,कसरत म्हणजे तरुणपण ,
निरोगी चिंता रहित उतरणी लाभली ,तर सुखावह सरते म्हातारपण ,
मग मागे वळून बघताना समजते ,अरेच्या हेचते आहे नंदनवन 

।। लपंडाव ।।

कधि विरह ,कधि अभाव तर कधि असमाधानी वृत्तिने जीव होतो बेजार ,
विरह म्हणजे दुःख  ,दुःख म्हणजे काळोखा अंधार ,
कधि दृश्य  ,कधि अदृश्य गोठलेली आसवे  गार ,
कधि अखंड वाहणारी काजळाची धार ,
तर कधि बोचून -बोचून बोथट होते काळजाची धार ,
दुःख म्हणजे वस्त्राची टोचणारी ,भरजरी किनार ,
तलम-रेशमी पोत ,जरतारी मुळेच तर उठून दिसणार ,
आधी सुख उपभोगले म्हणून दुःख कळले ,लपंडाव खेळणारे तेतर जोडीदार,
कधि एक तर कधि दुसरा राज्य घेणार ,तरच खरा खेळ रंगणार ,तरच ------

।। श्री गुरुदेवदत्त प्रसन्न ।।

।।दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ।।
तूच माऊली तूच गुरु,तूच देव,वास तुझा चराचरा,
पाषाणाच्या हृदयातून वाहे,निर्मल ,शीतल गोड झरा,
पंचमहाभूते महान कर्मयोगी ,निसर्ग सांगतो जीवन गाणे सुगम करा,
नाही थकती ,नाही चुकती ,निरिच्छ नियमित ,पूर्वेला तो नित्य उगवती,
रविप्रभा सदाही,दाहिदिशाचा तम उजळिती,
अग्नि जवळी साठवण्याची ,मुळीच नाही मानव वृत्ती ,
अचला धरणीमाता जणू ,झाली मूर्तिमंत ,दया -क्षमा -शांति ,
पवित्र प्रवाही शीतल जल ,सहज सकलामधि समरसति ,
अथांग सागर सीमा जपतो,येवो कितीही ओहटी -भरती ,
इतरांच्या आनंदासाठी ,सुवासिक सुंदर फूल उमलती ,
कोटि जिवांना तोषिवण्यासी ,वृक्ष फळांचा भार पेलति ,
अनंत आकाश पोकळ -निर्मळ ,सामावूनही ग्रह -तारे अन मेघ किती,
वायूची व्याप्ती सकल जगी ,परि ना कोठे गुंतुन पडती,
तुज ओळखण्याची बुद्धि दे मज ,पडे तोकडी शूद्र मती . 

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

।।सुगरण ।।

चटणी ,कोशिंबीर ,भाजी ,आमटी अन उसळी,
सारखीच सामग्री वापरुन सुद्धा ,प्रत्येकाच्या हातची चव असते वेगळी,
लिंबू -मिरची -कैरी लोणचे ,पाहूनच तोंडाला सुटते पाणी,
कवडी सारखे दही ,ताजे ताक तर ,भूतलीचे अमृत जाणी,
भात असावा मऊ मोकळा ,भाकर -पोळी गोल मऊ,
पापुद्रे सुटलेली ,शिळी सुध्दा आनंदाने आम्ही खाऊ,
सणासुदीला पुरी असावी तळलेली ,कढई पासुन ताटापर्यंत कायम टम्म फुगलेली,
पुरणपोळी मऊ लुसलुशित ,कडेपर्यंत भरलेली ,इडली पानात वाढताना आनंदाने डुललेली,
केक -मैसूरपाक -अनारसा ,सुंदर मांडा जाळीदार ,तिखटामध्ये डोसा -उत्तप्पा -ढोकळा असे जोडीदार,
जिलबी ,गुलाबजाम ,रसगुल्याचे तन -मन रसदार ,करंजी ,चिरोटा शंकरपाळे तोंडात घेताच विरघळणार,
उकडीचा मोदक पातळ पारी ,मऊ सुबक ,रुबाबदार ,श्रीखंडाचे काय सांगता मिटक्या मारत बोट चाटणार,
पापड -पापडी,भजीवडे ,जड कसे ?तेलावरते तरंगणार ,
भरल्या पोटी पुढे ठेवले ,तरी भूक चाळवणार ,
लाडू -वाडीला तारेचापाक कसा काय जमणार ?पिकनिक पार्टीत भेळच बिनविरोध जिंकणार ,
समप्रमाणात रवा-साखर -दूध -तुपाने ,करायचा असतो प्रसादाचा शिरा,
घालून मेवा ,केळे ,केशर ,भक्ति -रसाने भरापुरा,
कला-शास्त्र अन प्रेमाच्या 'त्रिवेणीचा'पाककलेत वाहे झरा ,
प्राशन करणाऱ्याला मिळतो ,पूर्णब्रह्माचा आनंद खरा . 

।।नैवेद्याचे ताट ।।

डावी कडे लिंबू ,चटणी ,कोशिंबिर ,अन पापड भज्यांची तळणी,
मीठ त्यात वाढायचे नसते,कारण बरे असते खाणे थोडे अळणी,
उजवीकडे भाजी - आमटी -सार कढी,उसळी सारखी तोंडीलावणी,
मधल्या भागी पोटभरीला भात -पोळी ,आहाराची समतोल अन सुंदर मांडणी,
आंबट -खारट -तिखट -तुरट कडूलाही मानुन गोड ,सजतो पदार्थ घालुन फोडणी,
ताटाबाहेर डाविकडे पाण्याचे पात्र,अन्न पचाया हवी हवा अन पाण्याची जोड,
उजवीकडे ताटाबाहेर ,पक्वान्नाची वाटी ,शेवट असावा नेहमी गोड,
हरिचा ध्यास ,उदबत्तीचा वास ,पाट -रांगोळी,वातावरणही तोडिसतोड,
मुखशुद्धीचा विडा सांगतो,चार तास तरी मना आता खाण्याचा तू मोह सोड . 

|| गृहलक्ष्मी -||

पाहुणचार जणू  द्रोपदिची  थाळी ,पुरवठा जणू अन्नपूर्णेची पळी ,
येऊद्या पाहुणे वेळी -अवेळी ,स्वागत असते हसून जणू चाफेकळी ,
आनंदाचा गोडवा ,स्नेहाची स्निग्धता झोकून देते स्वतःला स्वयंम पाकाच्या वेळी ,
पोटामार्गे जाते वाट मनाच्या तळी ,
खाणाऱ्या चे समाधान एकच हेतू ,मग जिन्नस बिघडायची येतनाही पाळी ,
लोक म्हणतात ,हातालाच आहे चव ,असूदेत साधी भाजी -पोळी .

।। पाकक्रिया ।।

स्वयंपाक शास्त्र की कला ,यावर मोठी चर्चा होऊ शकते,
कला -शास्त्र शिकता येते ,पण कला थोडीतरी अंगी असावीच लागते,
पंचतारांकित हॉटेल मध्ये,साहित्य ,कृति ,स्वागत ,सजावट यांचे उत्तम मिश्रण असते,
पण ---पण आपल्या माणसाच्या हातचे खाताना ,वेगळीच काही 'लज्जत 'येते ,
कारण त्यात बाजारात नमिळणाऱ्या ,स्नेहाचे (तेलाचे )मोहन असते ,
आपली ती व्यक्ती ,तराजू शिवाय षटरसांचे संतुलन साधते ,
तिचे जणू पदार्थातल्या मिठासारखेच असते ,
आहे तोवर कळत नसते,नसलेतर मात्र सुग्रास अन्नही बेचव भासते . 

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

Mahanaivedya che tat

निवेदन -देवापुढील  ठेवलेले महानैवेद्याचे ताट म्हणजे संपूर्ण -संतुलित आहाराचा एक उत्तम नमुनाच जणू . स्वयंपाक म्हणजे शास्त्र आणि कलेचे मिश्रण . त्यात षटरस प्रमाणबध्द असावे लागतात . पौष्टीकते बरोबर पदार्थाचा स्वाद -रंगरूप -मांडणी यामुळे उदराग्नी प्रज्वलित होण्यास मदत होते . पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटलेतर तो पचायला मदतच होते . अर्थात खाण्याचे योग्य प्रमाण प्रत्येक खाणाऱ्याने अपापलेच ठरवायचे असते . भोजन ही फक्त पोट भरण्या साठीची क्रिया नसून एक यज्ञ -कर्मच आहे हे जाणले म्हणजे झाले . खाद्य -संस्कृतीतील षटरसाबरोबर ,साहित्यातील रस -राजाचा स्थायीभाव 'प्रेम 'पदार्थात मिसळता आलातर खाणाऱ्याला आत्मानंद मिळणारच आणि त्यामुळे पाककर्त्यालाही .
                मी साधारण दर शनिवारी ,माझ्या कुंपण नसलेल्या कवनोद्यानातील (मुक्तछंद )काही फुले माझ्या अक्षरमालेत गुंफण्याचा प्रयत्न करते . यामहिन्यात प्रस्तुत करीत आहे १-नैवेद्याचे ताट २-पाकक्रिया ३-हातालाच चव ४-सुगरण आणि काही -----

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

Kutumb prstawana


हल्ली कुटुम्ब छोटी छोटी ,तर घरे असतात मोठी,
पूर्वी कुटुम्ब असत मोठी,तर घरे असत त्यामानाने छोटी . 
त्यावरून सहज आठवल्या काही गोष्टी,
त्याच आल्या आपल्या भेटी . 

|| घरकुल ---हल्ली ||

नव्या म्हणी रुजू लागल्या ,जुन्याच्या जागेवर ,
लोन पहावे फेडून ,लग्न दाखवावे टिकवून कसे ,जीवनभर ,
सुंदर -स्पेशस  ,
आलिशान ,घर कसे सुबक ,
रंग रूप इंटिरियर सारे कसे ,आकर्षक ,
प्रत्येकाला वेगळी खोली ,नको कुणाची आवक -जावक ,
अगदी गेस्ट रूम ,servant रूम सारे कसे माफक ,
सर्वांकडे सेपरेट सेल ,बोलणे होते फोनवर ,
मग मनाच्या तारा जुळणार कश्या ?वाय -फाय घरभर ,
प्रत्येकाचा वेगळा मेनू ,टी . व्ही . बघत जेवण होई रूम वर ,
दगड -माती पैश्याने मात केली माणसावर ,
आत्म्या विणा शरीर जणू ,दुकानाच्या दारावर . 

ज्याला त्याला स्पेस मिळाली ,पण पाय अजून जमिनीवर,

स्पेसचे महत्व जाणूनच,जाऊ शकतात चंद्रावर अन मंगळावर ---

|| घरकुल -----पूर्वीचे ||

घर पहावे बांधून ,लग्न बघावे करून अवघड होती कामगिरी ,
स्वयंपाक घर ,देवघर माजघर ,एखादी खोली माडीवरी
गरजू आणि होतकरु एखादा तरी माधुकरी ,
आला-गेला
आगन्तुकाचे स्वागत करी ओसरी ,
आज्जी -आबा ,आई -बाबा ,काका -मामा जपली जात मैत्री ,
चुलत -मावस -मामे आत्ते भावंडे तर कितीतरी ,
साधे सात्विक वेळेवर जेवण सांज -सकाळ पंगती वरी ,
घरात शिजेल ते सर्वांनी खायचे ,वरण -भात ,भाजी अन भाकरी ,
सणावारी आवडीचे ,वडे -भजी ,श्रीखंड -पुरी ,


दाटीवाटीने झोपुन सुद्धा झोप होत शांत पुरी ,
एकमेकांची बुकं -कपडे ,वापरत असत शाळकरी ,
मुले बघता बघता मोठी होत ,कोणी व्यापारी -शेतकरी तर कोणी करत नोकरी ,
सण वार ,लग्न कार्य ,दुखल -खुपलं ,सर्वांची असे जवाबदारी ,
पैसा कमी असून समृद्धि कशी ?कारण दडपण नसे मनावरी ,
मानले तर सुख ,नाहीतर रडगाणे अन कुरबुरी