शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

 रोहन -ऋचा विवाह 

रोहन -ऋचाची गाठ देवानेच बांधली ,
नावातील आद्याक्षरे बघा कशी सहजी जुळली ,
खाडिलकर -घाणेकर दोन कुटुंबे एकत्र आली जोडूनिया ‘कर ’
देवाजी जवळ सुखी संसाराचा आशिर्वाद मागती उभयता वधू -वर ,
संकट असो वा सुख ,मातू नये उतू नये ,प्रचिती येते वरचे वर ,
म्हणून तर बसते श्रद्धा त्या अनंत अज्ञात शक्तीवर ,
अतुलनीय सुवर्ण योग आला जुळुनी ,त्या निमित्त  दोन्ही परिवारास अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ,
श्री कृपेने पुऱ्या होवोत आपल्या कुटुंबाच्या सर्व इच्छा . 
                                                                    आसावरी जोशी 

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

Passion fruit

बहुगुणी पॅशन फ्रुट 
माझ्या परस बागेत अंबा -अननस-संत्र्याचा स्वाद-सुगंध घेऊन फुलला पॅशन फ्रुट चा वेल ,
करा सरबत -जॅम-जेली-केक-इसक्रीम-फ्रुट सॅलड ,शरीरा सोबत त्वचेचे आरोग्य ही सुधारेल ,
मोठ्या लिंबा एवढा आकार ,बहु बीजावर चिकटलेला पिवळा आंबट गर ,जाडसर असते फळाचे शेल ,
शेती ,कॅनींग ,तारांकित हॉटेल्स ना पुरवठा ,अश्या  अनेक स्टार्टअप ना जन्म देऊ शकेल ,
जास्तीची माहिती हवी असल्यास आपला गुगल गुरु आहेच ,सोबतीला अनुभव ही बरेच काही शिकवेल ,
कृष्ण कमळाशी फुला पानांचे साधर्म्य म्हणून झाले’ कृष्ण फळ ‘ परदेशी असून भारत देशी आनंदाने रुजेल .

विलास सहस्त्रबुद्धे -पंचाहत्तरी समारंभ

विलास सहस्त्रबुद्धे -पंचाहत्तरी समारंभ 
उगवला सोनियाचा दिन ,खूप खूप शुभेच्छा विलास आज तुझी पंचाहत्तरी ,
आप्त -मित्र-कुटुंबियांशी सदा असतोस कनेक्ट ,मदतीला तयार सर्वतोपरी ,
कॅरम मध्ये स्पर्धक ,शिक्षक ,परीक्षक ,मानाची पारितोषिके अन पदे भूषविलीस कितीतरी ,
कर्म योगाला सुंदर साथ अष्टांग योगाची ,शुभाशीष देती लक्ष्मी अन वागेश्वरी ,
तव जीवन संगीतात विलसती वीणेची अलौकिक माधुरी ,
वानप्रस्था कडून  शताब्दी कडे निघाली अमृत महोत्सवी वारी ,
सुना -मुले-नातवंडे -आप्तांचे सुख सदा बहरो तुमच्या दारी ,
लाभो आयु -आरोग्य-सुख-समाधान,परमेश्वराचे आशिर्वाद असूदे उभयतांच्या शिरी . 
                                                                 आसावरी जोशी

सोमवार, २८ मार्च, २०२२

ऋण निर्देश

      ऋण निर्देश 
खरेतर आवडेल मजसी ,सदा -सर्वदा आप्त -मित्र-परिवाराच्या ऋणात राहणे ,
त्या निमित्ताने अधून -मधून होत जाईल ,मधुर स्मृतीत डोकावणे ,
व्यवहारी जगात औपचारिकता ही असे आवश्यक मनाला मनांचा घेण्यास ठाव ,
सर्वांचे खूप खूप आभार ,केलात मजवरी आशिर्वाद आणी शुभेच्छांचा वर्षाव ,
नको आता भेट वस्तू ,समारंभ ,पण हवा हवासा वाटे सदा प्रेम -आपुलकीचा भाव ,
देवा एकच प्रार्थना तव चरणी ,श्वास आहे तोवरी ,लाभूदे  मजसी सन्मती -गती—भक्ती -शक्ती -कृती 
स्वावलंबनाचा  सदा सराव . 

राधा

 


                          राधा 
प्रवाहा बरोबर वाहणारी ‘ ती ‘धारा ,पण विरुद्ध वाहणारी’ ती ’राधा ,
तो आराध्य ,ती आराधना ,लोकनिंदा नाही आणू शकली विशुद्ध प्रेमात किंचित ही बाधा ,
श्रीकृष्णाची पराकोटीची ‘आराधना ‘करणारी ,म्हणून झाली ती राधा ,
जिवा -शिवाच्या मिलनाची रूपे किती अलौकिक - अनआकलनीय -विविधा ,
संत सांगती रुचेल पचेल तो मार्ग निवडून ,जीवनाचे अंतिम ध्येय मात्र साधा ,
लक्ष्मी -केशव ,गौरी शंकर ,सियाराम ,राधेश्याम ,
धन्य धन्य ते रूप शक्तीचे ,शिवाच्या आधी घेतले जाते तिचे नाम . 

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

महानाट्य

                      महानाट्य 
                 महानाट्याचा एक अध्याय संपला ,
एक चक्री वादळ आले ,घोंगावले निघून गेले लोपले ,
वादळाच्या पूर्व सूचना ना समजल्या ,का ना उमगल्या तुझिया मना ,
आले काय ,गेले काय !!खोलवर ठेवून गेले कित्ती तरी खुणा ,
होऊनि उध्वस्त ही उठावेच लागते पुन्हा ,जीवनासी देण्या गती ,
तुम्ही नसता एकटे ,जोडलेले जीव अससी ,कित्येक तुमच्या सोबती ,
पळून जाणे पर्याय नसतो ,खरी परीक्षा पळवून लावण्यात भिती ,
जीवनाला अर्थ हवा तर ,लढल्याविना लाभेल का रे जिवा तुला सदगती ,
पूर्व अन पुनर्जन्म असती गहन प्रश्न चिन्हे ,सुखांत मात्र स्वतः च्याच हाती ,
प्रसंगानुरूप मधील पाने आपापलीच लागतात भरावी ,आवडो वा ना आवडो किती !!
तो ठरवितो प्रत्येक पुस्तकाची पृष्ठ संख्या ,आदि आणखिन इति ,
उत्पत्ती -स्थिती-लयासी समता भावाने जाणे सामोरे ,म्हणजेच असावी दिगंबर त्रिमूर्ती ची प्रचिती ,
सगुणातील निर्गुणाची अन निर्गुणातील सगुणाची परमानंदी अनुभूती . 

सतीश ब्रम्हे एकसष्ठी समारंभ

सतीश ब्रम्हे एकसष्ठी समारंभ 
श्रीराम जन्मला ग सखी पुत्र जन्मला सुलभा -गोपाळा घरी ,
सतीश पाठी आली संध्या सोनेरी ,ब्रम्हे क्षितीजा वरी ,
तामाणे  पति -पत्नीने अर्पिली सुंदर-सुशील -विद्या-विनय आदि गुणाने युक्त अंजली तव करी ,
लव -कुश सम पुत्र रत्न लाभले उभयतांच्या संसारी ,
आनंदासी द्विगुणित करण्या आली रिया ,बनुनी गोड परी ,
आदर्श पती -पिता-बंधू-श्वसुर-आबा बनुनी मायेचे तू छत्र धरी ,
समस्त नाती जपसी उत्तम ,पुत्र तर तू श्रावण बाळा परी ,
खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ,एकसष्ठी सोहळ्यासी लाभल्या चार पिढ्या सदगुणी ,
शतकी वाटेवर तव लाभो सदा ,आयु -आरोग्य-सुख -समाधान ,हीच प्रार्थना -
        देवाच्या उरळी स्थित प्रभु राम चरणी . 

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

आठवणीतील गांव

आठवणीतील गांव 
माझे पूवाश्रमीचे नांव शकुन्तला प्रभाकर बापट . माझे लहानपण भवानीमंडी /भैसोदामंडी या सीमारेषे वरील जोडगावात गेले . हे स्टेशन  मुंबई -दिल्ली ला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे वरील नागदा आणि कोटा जंगशन च्या साधारण मध्यावर आहे . याचे अदभुत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे भवानी मंडी स्टेशन वर गाडी उभी राहिली तर एका बाजूचा प्लॅटफॉर्म भवानी मंडी (राजस्थान )जिल्हा झालावाड मध्ये तर दुसरी कडील प्लॅटफॉर्म भैंसोदा मंडी (म . प्र . )जिल्हा मंदसौर मध्ये येतो . तिकीट खिडकी वरील तिकीट देणारा म . प्र . मध्ये बसतो तर तिकीट घेणारे यात्री राज. मध्ये उभे असतात . दिल्ली कडून मुम्बई कडे जाणारी गाडी स्टेशन वर थांबली तर इंजिन राजस्थान आणि गार्ड चा डबा म . प्र . मधे असतो ,याच्या उलट मुंबई कडून येणाऱ्या गाड्यांचे असते . 
स्वातंत्र्य पूर्व काळात माझे आजोबा भवानी मंडी जवळील केसोदा नामक छोट्याश्या गावचे जहागीरदार होते ,जे आधी ग्वालियर स्टेट व नंतर म . प्र . मध्ये आले . स्वातंत्र्या नंतर जहागीरदारी संपुष्टात अली पण शेती आणि संत्री ,मोसंबी,लिंबाची बागायती मात्र होती . पुढे माझ्या वडिलांनी शेती सांभाळली आणि आधुनिकतेचा स्पर्श देऊन भरभराटीस आणली . शेतमालाची ने आण करणे सोपे जावे म्हणून आजोबांनी भैसोदा मंडीत जागा घेऊन मोठे घर बांधले होते . बऱ्याच खोल्या ,धान्य साठवायची कोठारे ,ओसरी ,अंगण ,विहीर गोठा छोटी बाग इत्यादी . वडिलांनी वीज ,पाणी ,फरशी अश्या सुधारणा केल्या .भाड्याने देण्या साठी पण ६-७डबल रूम बांधल्या . आजी -आजोबा ,आई -वडील ,एक बाल विधवा आत्या ,आम्ही तीन भाऊ दोन बहिणी अशी भावंडे ,कायम पै -पाहुण्यांचा राबता ,असे आमचे आनंदी संयुक्त कुटुंब होते . शेजारी आणि भाडेकरुही कुटुंबाचाच एक भाग असत . आमचे प्राथमिक शिक्षण म . प्र . मध्ये माध्यमिक राजस्थान मध्ये झाले . पूर्वी कॉलेज नसल्याने माझे एम . ए .हिंदी लिटरेचर पर्यंत चे  शिक्षण बाह्य विद्यार्थी म्हणून पुन्हा विक्रम युनिव्हर्सिटी उज्जैन मध्य प्रदेश मधून झाले.

भैसोदा मंडी एका छोट्या वसाहती सारखी होती पण भवानी मंडी मात्र सर्व सुख सोयीने युक्त गाव होते . धान्य,कापुस ,तेल बिया ची मोठी बाजार पेठ होती त्या मुळे रेल्वे स्टेशन ला ही खूप महत्व होते . आमच्या कडे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाहुण्यासाठी येथील विविध प्रकार ची शेव ,कलाकंद ,कचोरी चे विशेष आकर्षण होते . 
काही गमतीदार आठवणी म्हणजे -उत्तरे कडून मुंबई कडे दुभत्या म्हशींना घेऊन जाणाऱ्या मालगाड्या इंजिन मध्ये कोळसा-पाणी भरण्या साठी थांबल्या कि भैया लोक दूध -दूध म्हणून ओरडत ,लगेच सर्व लोक पैसे ,पातेली घेऊन स्वस्त -मस्त-धारोष्ण दूध आणण्या साठी धावत ,मग काय वस्तीत खीर ,बासुंदी ,हलवा बनवून अचानक सण साजरा होत . तसेच कधीतरी आमच्या कडे मुंबईहून फास्ट ट्रेन ने पाहुणे येणार असले तर आमच्या घरात राहणारे रेल्वे ऑफिसर ट्रेन ला रेड सिग्नल देऊन गाडी काही मिनिटे थांबवत ,आमचे पाहुणे लगेच खाली उतरून चालत घरी येत . ६०-७०वर्षांपूर्वी तरी येथे सर्व धर्म-जाती-भाषा -स्तरातील लोक एकोप्याने रहात ,एकमेकांना अडीअडचणीत मदत करीत .हिंदी भाषिक प्रदेशात २-४मराठी घरे दुधात साखर मिसळावी तशी वेगळेपण टिकवत एकरूप झाली होती .  गतकाळातील गोड आठवणींचा ठेवा आजही मोठी ऊर्जा देऊन जातो हेही परम भाग्यच . 
                                                                                     आसावरी जोशी 
                                                                                   १चिंतामणी अपार्टमेंट ,३८/२मधुबन कॉलनी ,
                                                                                     कर्वेनगर ,पुणे ४११०५२,
                                                                                   सेल-९६८९३९०८०२