मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

आजोळ -------भाग ३

         आजोळ -------भाग ३
        अजून एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ,ती म्हणजे मामा मंडळी कडून आईला भाऊबीज म्हणून' ,स्त्री मासिक आणि केसरी वर्तमानपत्राची वार्षिक वर्गणी प्रेमाची भेट असायची . त्यामुळे दूरवर अमराठी प्रांतात राहून सुद्धा ,आमची मातृभाषा मराठीशी ,नाळ जुळून राहिली . 
          त्याच प्रमाणे  एक विस्मयकारक गोष्ट म्हणजे ,आजही माझ्या सुंदर स्वप्नात ,जेंव्हा एखादे घर येते ,तेंव्हा त्याचे चित्र आजोळच्या घराशी मिळते जुळते असते . याची उकल अशी असू शकेल कि हे माझे जन्मस्थान आहे आणि त्याच बरोबर येथे मी क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे . 
             असे म्हणतात ,आज बदलापुर खूप बदलले आहे ,पण देवधर वाडीतील भावंडे ,त्याच बरोबर त्यांचे बेटर हाफ ,आणि पुढील जनरेशन ,यांचा आधार पूर्वी सारखाच आश्वासक आहे . 
         अजोळीच्या वटवृक्षाचा अनेक शाखा ,उपशाखा ,पारंब्या ,उपपारंब्या युक्त पसारा आहे . उंची आणि विस्तारा बरोबर पाळेमूळे ही खोलवर रुजल्याने ,याच्या सावलीत मने खरोखरच विसावतात . 
                    आसावरी जोशी /शकू 

सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

आजोळच्या ----भाग २

        आजोळच्या ----भाग २
बदलापुरला सर्व बहिणी आणि भाचरं जमली की श्रीधर मामा ,विसु मामा ,मन्या मामा यांना काय करू अन काय नाही असे व्हायचे . लाडा सोबत गप्पा -गोष्टी ,थट्टा मस्करीही असायची . शकुंतला मामी ,वसुधा मामी अन माधवी मामी ,हसतमुखाने एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कश्या करत याचे आश्चर्यच वाटते आता . तीन ही माम्या' सुग्रण ',म्हणजे रोज रोज केळ्याची 'शिक्रण 'वाल्या नाहीत हं !!त्यांच्या प्रत्येक पदार्थाला तृप्ती देणारी चव असायची . प्रेम आणि आपुलकी या सामुग्रीचा सढळ हाताने वापर करीत ,म्हणून असेल कदाचित . 
                      आंबा ,जांभुळ ,तुती यांचा फलाहार ,माम्यांनी लोणच्या साठी चिरलेल्या कैरीच्या मीठ -हळद -तिखट लावून ठेवलेल्या फोडी ,अचानक कमी झालेल्या असायच्या . 
     तळघरात आंब्यांची लावलेली अढी ,तयार झाली की नाही ती सारखी चेक करणे ,कारण प्रत्येकाला रोज एक आक्खा आंबा खायला मिळत असे . शिवाय अधून -मधून जेवणात अंबरस असायचाच . कागदाच्या चौकोनावर मिळालेल्या फोडणी च्या भाकरीची चव ही आंब्याच्या तोडीसतोड . 
        बाकी खेळ म्हणाल तर डबा ऐसपैस ,पत्यातील नाटेठोंम ,ज्याचे खरे नाव उशीरा उमगले ,झब्बू बदामसात ,जांभळे गोळा करुन आणणे ,अंगणातील मोरी चा तरण तलाव बनवणे इ . नाना आणि मामा लोकांची हौस आणि कष्ट या मुळे बहरलेल्या ,परसबागे मुळे ,आम्हाला ,अनेक प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे पाहायला मिळाली . पांढरी मिरची ,अक्कलकाढा ,लाजाळु ,याचेतर अप्रूपच वाटे . 
           रोज संध्याकाळी सर्व मुलांनी झोपाळ्यावर बसून' शुभं करोती ' म्हणणे ,कधीतरी गुलाबाची बाग ,नदी ,मारुति मंदिर येथे फिरायला जाणे व्हायचे .आम्ही मावस ,आत्ते ,मामे भावंडे असायचोच ,त्यात भर म्हणून  वाड्यातील भाडेकरू कुटुंबीयांची मुले ही  असायची . 

आजोळ च्या आठवणींची चित्रफीत -part-1

      आजोळ च्या आठवणींची चित्रफीत 
आमचे नाना (चिं . पु . देवधर )आणि माई यांना अर्पण ----
नाना -माईच्या अष्टपैलू संसाराला फुलवण्या साठी जणू देवाने त्यांना पाच कन्यारत्न आणि तीन पुत्ररत्नांची देणगी दिली असावी . माझी आई जिला आम्ही मुले मामी म्हणायचो तिला नाना -माई कधी गोदू म्हणत तर कधी आक्का म्हणत . या  लेकीची पाठवणी थोडी लांब झाली होती . राजस्थान -मध्यप्रदेश च्या हद्दीवर स्थित भैंसोदामंडीहून बदलापुरला पोहोचायला जवळ -जवळ चोवीस तास लागत . हल्ली अमेरिकेला जायलाही एवढा वेळ लागत नाही ती गोष्ट वेगळी . आई जमेल तेव्हा आम्हा भावंडांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत बदलापूरला यायची . कधी इकडची मंडळी आमच्या घरी येत असत . वडिलांना शेतीचा व्यवसाय आणि संयुक्त कुटुम्ब असल्याने ,फार दिवस घर सोडून बाहेर पडता येत नसे . ते आले तरी त्यांना थोडेच दिवस राहायला जमत असे . 
             मग आमच्या गावाहून मामाच्या गावाला येता जाताना ,पहिला हक्काचा ब्रेक मुम्बईला -अर्थातच ताई मावशी /लीला मावशी कडे . या ब्रेक मधे मुंबई दर्शन ,चौपाटी एखादा मराठी सिनेमा /कार्यक्रम ठरलेला . मग मुंबईला एक तरी मामा आम्हाला घ्यायला यायचा . बदलापुरला माहेरवाष्णी जमायला सुरुवात झालेली असायची . आणि घर माणसांनी फुलुनजायचे .उषा मावशी तर मला मावशी पेक्षा बहीण किंवा मैत्रिणी प्रमाणे जवळची वाटायची . माझ्या लग्ना नंतर ,पुण्यात 
गेल्यावर इंदूमावशी चे घर म्हणजे ,पुण्यातील माझे जिव्हाळ्याचे माहेर घर . मावश्यांप्रमाणे सर्व काका लोकांनी पण आमच्यावर खूप माया केली .

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

बुआ -बाबा / साधु संत

                            बुआ -बाबा / साधु संत 
काही अनुचित बातम्या अन घटनांनी ढवळून निघतो समाज ,
खरे कोण ?खोटे कोण ? आयाराम -गयाराम समजणे अवघड झाले आहे आज ,
मानवाच्या हळव्या भावनांना वटवून स्वतःच घालायचा बाबाजीचा ताज ,
चमत्कार ,चार चांगल्या गोष्टी अन भाषा -वेशभूषेचा चढवून साज ,
दाबून टाकायचा ,दुर्बल ,पीडितांच्या न्यायासाठी झगडणारा आवाज ,
चांगल्या सोबत काही वाइटांचेही असते अस्तित्व ,इतिहास सांगत आलाय पूर्वापार ,
सगळी आढीच नासवतात ,नासके आंबे दोन -चार ,
पण डोळसपणे आपल्यालाच करायला हवा ,चांगल्याचा विचार ,
श्रद्धा असावी ,नको अंधश्रद्धा ,ओळखायला शिकूया कोण चोर ,कोण सावकार ,
मलमाशी सुगंधी फुले सोडून ,सदा बसे ,दुर्गंधयुक्त मलावर ,
तर मधमाशी फीर -फीर फिरुन बसे फक्त सुगंधी फुलांवर ,
आपल्या देशाला ,संकट समयी बळ देणारी ,साधु -संतांची परंपरा लाभली आहे थोर ,
साधु -संत -सदगुरूंच्या -मदतीने ,विजय मिळवूया ,दुष्ट प्रवृत्ती अन विकारांवर . 


सगुण सखी -कविता लेखन

                    सगुण सखी -कविता लेखन 
तू वेडी आहेस का शहाणी !
तू राजा आहेस का राणी !
तू निराकार का साकार ,तू सगुण का निर्गुणी !
तू अनमोल रत्न का काचेचा मणी !
तू तो का ती !विरोधाभासी प्रश्नांची उत्तरे सांगेल का कुणी !
तू गद्य की पद्य ,कसे सांगेल लेखणी !
मला वाटते गद्याची असते रोकठोक वाणी ,
पद्य म्हणजे रंगवून सांगितलेली सुंदर कहाणी ,
ज्याच्या अंतरी भाव जसे ,तशी उलगडे कविता ,कुणासाठी हासू तर कुणासाठी आसवाचे पाणी ,
कवितेत अभिव्यक्ती सोबत ,रसग्रहणाची लवचिकता ,जणू सुकुमारीची आनंदाने झुलणारी वेणी ,
थोडी देवाची देणगी ,थोड्या संवेदना ,थोडी जाण ,कविता म्हणजे पवित्र संगम त्रिवेणी ,
माहित नाही ,तिने केंव्हा ,कशी घातली मोहिनी !
ती तर माझी सखी -जिवाभावाची ,सूज्ञ ,सुंदर ,निर्गुणी असुनही गुणी . 

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

अन्न -वस्त्र -निवारा

             अन्न -वस्त्र -निवारा 
अन्न -वस्त्र -निवारा म्हणजे ,जगण्यासाठीच्या गरजा आवश्यक ,
अंग झाकायला वस्त्र ,निरोगी जीवन जगायला हवे अन्न पोषक ,
ऊन -वारा पाऊस या पासुन वाचविण्यास  ,एका शांत सुरक्षित घरट्याची अपेक्षा माफक ,
काळ बदलत गेला ,अनेक शब्दांची परिभाषाच जणू बदलत गेली ,
कम्फर्ट कडून लग्झरी कडे नेसेसिटी ची वाटचाल झाली ,
पूर्वी जेवणासाठी ताजे ,सात्विक अन्न शिजायचे ,घरात बनेल ते सर्वांनी खायचे ,
अधून -मधून सणासुदीला ,प्रत्येकाच्या आवडीचा मान राखायचे ,
गॅस ,फ्रीज ,मिक्सर ,कुकर ,मायक्रोवेव्ह अन लक्ष्मीबाईंच्या येण्याने पदार्थांची रेलचेल झाली ,
चटपटीत चण्यांची कमतरता नाही पण दातांची ताकतच कवळीबाईनें हिरावून घेतली ,
कपड्यांचे म्हणाल तर ,एक अंगावर ,एक दांडीवर ,एखाद्या ठेवणीतल्या घडीचा आनंद असे अजोड ,
आता भाराभर भारी वस्त्रालंकारांनी ,आत्म्याला टाकलेय झाकून ,बाह्य प्रदर्शनाची जुंपली चढाओढ ,
पूर्वी खोल्यांपेक्षा माणसे जास्त ,एका घरात आनंदाने रहात असत मस्त ,
आता माणसे कमी तर ,टीव्ही ,फोन ,फर्निचरने ने युक्त खोल्याच जास्त ,
सगळे कसे सुसज्ज असून ही ,भासे कसे ,निर्जिव आणि सुस्त सुस्त ,
अती समृद्धी च्या चक्रात अडकून, साधनच साध्य बनू लागलय ,नकळत ,
चक्र उलट फिरावावेसे वाटते ,कळतयं पण नाही ना वळत ,
जिने केलिये जरुरी है ,रोटी -कपडा और मकान ,
सुख ,शांति ,समृद्धी के संग ,बनी रहे ,सहज स्वस्थ सुंदर मुस्कान ,
आओ हम बनायें रोटीको जीवन ,कपडे को लज्जा का आवरण महान ,
और मकान को पवित्र पूजाघर ,ना की लेन -देन की एक दुकान . 

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

साक्षरता दिन (८सप्टेंबर )

                         साक्षरता  दिन (८सप्टेंबर  )
साक्षरतेची नको नुसती टक्केवारी ,नकोत नुसते परिक्षार्थी ,
वाचाल -लिहाल तरच वाचाल ,बनून रहा सदा शिकणारा विद्यार्थी ,
मुलगा -मुलगी ,आबाल -वृद्ध ,सर्वांनी असावे ज्ञानार्थी ,
ज्ञानार्जना साठी बनू स्वार्थी ,ज्ञानदानात परमार्थी ,
माहितीचे नसावे नुसते संकलन ,ज्ञान असावे सदुपयोगी अन   व्यवहारार्थी ,
साक्षर म्हणजे सुसंस्कृत जवाबदार माणुस ,हक्का सोबत कर्तव्याची जाण हवी ,
अंधारा कडून प्रकाशा कडे ,अज्ञाना कडून ज्ञाना कडे जाणारी, वाट शोधू सदा नवी ,
शून्यालाही येते किंमत ,त्याच्या पुढे एक होऊन उभे राहण्याची ,ताकत आणि जिद्द हवी .