गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

Tristhali yatra

 त्रिस्थळी यात्रा  ७-११-२४ तें १५-११-२४भाग्यश्री  ट्रॅव्हल +पंचकन्या 

मैत्रिणीं मुळे त्रिस्थळी यात्रेचा योग आला जुळून ,

प्रयागराज ,अयोध्या ,नंदीग्राम ,सारनाथ ,काशी ,गया ,बौध्दगया ,चित्रकूट  ,गुप्तगोदावरी ,आदि तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले जवळून ,

प्रयागराजला गंगा -यमुना- गुप्त सरस्वती च्या संगमावर गेलो बोटीतून,

संगम असुनही गौरवर्णी गंगा ,सावळी यमुना ,गुप्त सरस्वती आपले अस्तित्व आहेत टिकवून ,

यमुना शांत तर गंगा थोडी चंचल असल्याने संगमाचे स्थान थोडेफार बदललेले येते दिसून ,

प्रयागराज /अलाहाबाद नेहरुंचे -इंदिराचे जन्मस्थान आनंदभवन ,चंद्रशेखर आझाद पार्क ,विद्यापीठ ,कोर्ट आदि परिसर पहिला फिरून ,

चित्रकूट ला गुहेतील गुप्त गोदावरी ,स्फटिक शिळा राम -भरत भेटीचा प्रसंग आठवून डोळे आले भरून ,

अयोध्ये जवळील नंदी ग्राम हून भरताने चौदा वर्षे अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या मदतीने सांभाळला दुरून ,

तेथे भरत मंदिर  ,भरतमारुती भेट ,कल्की मंदिर इत्यादी बघून विविध नात्यातील प्रेम आले उलगडून ,

२२-१ - २४ला राम लल्ला आला  मोहक बालरुपात अयोध्येला जन्मस्थानी ,कलियुगातील वनवास संपवून ,

अयोध्याधाम ,अयोध्या ,वाल्मिकी विमानतळ , लतामंगेशकर चौक ,शरयू घाट ,देवादिकांच्या सुंदर मुर्त्या ,हनुमान गढी ,कनक भवन एकूणच शहर नमो-योगी  -सहकारी आणि भक्तांच्या मुळे गेले एकदम उजळून ,

ज्योतिर्लिंग -सप्तपुरी-आणि त्रिस्थळी पैकी एक काशी विश्वेश्वराचे लिंग दोनच मिनिटात डोळ्यात घेतले साठवून ,

कालभैरव ,अन्नपूर्णा मातेची घेऊन दर्शन गंगा नदीतून थोडे जल तीर्थरूप आणले भरून ,

काशी /वाराणसी ला ८४घाटांच्या मध्ये रात्री गंगा आरतीच्या सोहळ्याने डोळे गेले दिपून ,

पितृ गयेला गयासुराला पाताळात पाठवणाऱ्या विष्णुपदाचे दर्शन आणि स्पर्शाचा योग आला जुळून ,

बौद्धगयेला सिद्धार्थ चा झाला गौतम बुद्ध ज्या पिंपळ वृक्षा खाली बसून ,

तो बौधी वृक्ष आणि सोनेरी धीर -गंभीर मूर्ती असलेले बुद्ध मंदिर पाहीले निरखून ,

अयोध्येहून येताना सरनाथाचे झाले दर्शन ,जेथेप्रथम पाच शिष्याना बुद्धाने बौद्ध धर्माची शिकवण सांगितली समजावून ,

अश्या प्रकारे ईश कृपेने सुखरूप घरी परतलो त्रिस्थळी यात्रेचे समापन करून . 

                    आसावरी जोशी. 

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

Chhunda

              कैरी  चा छुन्दा 

     साहित्य -   राजापुरी कैरी सारख्या रेषा नसलेल्या बेताच्या आंबट कैरीचा साल काढून केलेला जाङसर कीस दोन वाट्या ,दोन वाट्या साखर ,दोन टी स्पून लालरंगाचे  तिखट ,एक टी स्पून मीठ ,दोन टी स्पून जिरे +दोन इंच दालचिनी +सात -आठ लवंगा ,या तिन्हींची किंचित गरम करून केलेली जाडसर पूड करावी . 
 कृती -कैरीचा कीस ,साखर ,मीठ एकत्र करून दोन तास झाकून ठेवावे म्हणजे साखर विरघळते .हे मिश्रण एका काचेच्या पसरट बोल मध्ये घालून दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे ,हलवून पुन्हा दोन मिनिटे ठेवावे असे मिश्रणातील पाक आटून एक तारी होई पर्यंत पाच  सहा वेळा करावे .थोडे  सरसरीत असताना बाहेर  काढावे . गार झाल्यावर मिश्रण अजून घट्ट होते .कोमट असताना तिखट ,
आणि जिरे लवंग दालचिनीची ची केलेली पूड घालून हलवावे . छुन्दा तयार !! 
काही लोक स्टील च्या परातीत मिश्रण घालून वर पातळ फडके बांधून सन ड्राय करतात ,तर काही लोक गॅस च्या मंद आचेवर एक तारी पाक होई पर्यंत शिजवतात . 
टीप -घावन ,पराठे थालीपीठ ,सँडविच या बरोबर  आंबट गोड तिखट चवीचा  छुन्दा छान लागतो . 
            आसावरी जोशी