शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

व्रत -वैकल्य -साधना

            व्रत -वैकल्य -साधना 
सणावारी नको नुसत्या झेंडूच्या माळा अन आपट्याची पाने ,
करूया प्रार्थना ,सूर्याने शिंपडावे भरभरून लखलखते सोने ,
नको नुसते सडा -रांगोळी ,दिवे आरत्या तोरणं ,
शुद्ध पाण्याने काठोकाठ भरावीत ,नदी -नाले -धरणं ,
पुरेसे नाही सवाष्ण -ब्राह्मण ,पक्वान्न -पुरण ,
गुरांनां लाभो मोकळ्या आकाशा खालील हिरवेगार कुरण ,
पाणी -टंचाई ,तपमान वाढ ,प्रदूषण ,अत्याचार ,भ्रष्टाचार रुपी असुरांचा होवो संहार ,
एकाचा श्वास तो दुसऱ्याचा उश्वास ,एकमेकांच्या जगण्याचा आधार ,
निसर्गाच्या सुंदर संतुलनासाठी मानावेत किती आभार !!!
जठराग्नी च्या होमकुंडात असावी समाधानाची आहुती,
सात्विक ओंब्या -लोम्ब्या -शेंगा ,फळा -फुलांनी राहो धरणी अंकुरती ,
खरी पूजा म्हणजे सर्वांनी जपावे पंचतत्वांचे शुद्ध स्वरुप ,
त्यांच्याच ठाई असे कोटि -कोटि देवतांचे सगुण रुप ,
प्रत्येक सण -उत्सव म्हणजे खेळीमेळीने एकत्र येऊन केलेली परमेश्वराची आराधना ,
निसर्गाला सोबत घेऊनच पुरी होऊ शकते ,मानवाची ही साधना .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा