शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली . 

   दत्तजयंती च्या निमित्ताने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण नऊ -दहा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली

उतरणाऱ्या लोकांची वर्दळ हळू हळू कमी व्हायला लागली होती . डोलीवाले सरावा मुळे भराभर उतरत होते . आम्हीपण उतरताना जलद गतीने उतरत होतो . पण पाय थकले होते आणि उतारावर तोल सांभाळणे अवघड जात होते . अश्या वेळेस काठीचा चांगला उपयोग झाला . तरी जाताना लागला त्यापेक्षा निम्म्या वेळेत नऊ हजाराच्या वर पायऱ्या उतरून आलो होतो . दिवस लहान असल्याने लवकर अंधार झाला . पायऱ्या दिसेनाश्या झाल्या . आजूबाजूच्या झाडातून सरसर आवाज ऐकू येऊ लागले . पायऱ्यांचे दगड गुळगुळीत झालेले ,पायताणे पण झिजलेली ,दोन-तीन वेळा पडता पडता राहिलो . आमची गती खूपच मंदावली होती . आम्ही ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ वयोगटातील होतो . मनात एक अनामिक भिती होती . आमच्या तिघांशिवाय आता कोणीच यात्रेकरू दिसत नव्हते . प्रवासाच्या तयारीत घेतलेली बॅटरी हॉटेल वर राहिली होती . सहकाऱ्यांना फोन करावा तर फोनला रेंज मिळत नव्हती . तेवढ्यात महाविद्यालयीन मुला -मुलींचा एक ग्रुप आम्हाला वर चढताना दिसला . काय करावे कळेना ,या मुलांकडे मदत मागावी का ?ते मदत करतील का ?अश्या अनेक शंका मनात आल्या ,पण दुसरा    काहीच पर्याय नसल्याने त्यांना भैया म्हणून हाकमारले आणि आमची अडचण त्यांना सांगितली . ते म्हणाले आम्ही खाली हॉटेलमध्ये  उतरलोय ,जेवायला थोडा वेळ होता म्हणून विचार केला थोडे  फिरून यावे कारण सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत . आम्ही त्यांना विनंती केली कि पायथ्या पर्यंत उतरायला आमच्या सोबत येता का ?ती मुले क्षणाचाही वेळ न लावता लगेच तयार झाली . जणू त्या साठीच ते सगळे तिकडे आले होते . एकेकाने आमच्या पैकी प्रत्येकाचा हात धरला बाकीच्यांनी सेलफोन ची बॅटरी सुरु केली आणि म्हणाले ,आम्ही तुम्हाला तुमच्या हॉटेल पर्यंत सोडल्या शिवाय जाणार नाही . बोलता बोलता पायथा केव्हा आला ते कळलेच नाही . आमचा ग्रुप आमची वाट पहात पायथ्याशी थांबला होता . 
        गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .

Asawari Joshi
1 Chintamani, Karvenagar, Pune 411052
Cellphone: 9689390802

Sent from my iPad

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा