गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

निष्काम कर्म

                                           निष्काम कर्म 
एकदा नदीकाठी निवांत बसले असता निसर्गाच्या निष्काम कर्मा संबंधित अनेक विचार डोक्यात येऊन गेले . नदीचा जन्मदाता पर्वत . त्याला अचल ,नग ,पाषाणाचा बनलेला असे काय काय आपण म्हणतो . मंदबुद्धी माणसाला म्हणतो ,डोक्यात काय दगड -धोंडे भरलेत ?निर्दयी माणसाला पाषाण हृदयी संबोधतो . 
      पर्वत निष्काम कर्म करतो म्हणून काय त्याच्या हृदयातील ओलावा दिसूच नये माणसाला ?घनदाट वनराई अन अनेक जीवांचा पालनकर्ता तो . पर्वताच्या पोटातूनच जीवनदायिनी नदीचा जन्म होतो . कधीही एकत्र येऊ न शकणाऱ्या दोन किनाऱ्यांना कायम सोबत घेऊन ,अविरत प्रवाहित राहणे ,हेच तिचे 'जीवन '  . नदीकाठीच अनेक महान संस्कृती जन्माला आल्या ,सुखावल्या . पाणी म्हणजे नदीचा आत्मा . त्याला 'जीवन '  ऐसे नांव . जीवाच्या जन्म -मृत्यु च्या मधील काळ म्हणजेच 'जीवन '. तसेच डोंगरातून जन्मून ,सागरात विलीन होई पर्यंतच्या प्रवासात पाण्या मुळेच नदीचे अस्तित्व असते ,म्हणून त्याला जीवन ऐसे नांव . 
         समस्त जीवांना जीवनदान देणारी नदी स्वतः कधीच पाणी पीत नाही . पण दुष्काळ समयी बिचाऱ्या नदीलाच निंदायचे !
       नदी -नाले -ओहोळ आपल्या बरोबर जेकाही वाहून आणतील -काष्ठ ,पाषाण ,पंजर ,प्लास्टिक ,त्या सर्वांना सामावुन घेणारा अथांग सागर . ओहोटी -भरती आणि इतर अनेक आंदोलने सागराच्या खाऱ्या जीवनात ,सतत सुरु असूनही ,तो आपली सीमा कधी ओलांडत नाही .  
          अथांग पाण्याचा साठा असून ,ना तहान भागवायला सागराच्या पाण्याचा उपयोग ,ना वापरण्यासाठी उपयोग ,लोकांचे असे कटु बोल पचवून सुद्धा ,इतरांसाठी सर्व खारटपणा स्वतः जवळ ठेवून ,शुद्ध गोड पाणी वाष्प रूपाने ढगांकडे पाठवणार महासागर किती महान आहेना ?
           निष्काम कर्माचा संदेश देणाऱ्या निसर्गातील सर्व गुरूंचा आपण आदर करू या ,मान राखूया . थोडेतरी त्यांचे गुण आत्मसाद करूया . निसर्गाचे संरक्षण -संवर्धनच त्यांची खरी गुरुदक्षिणा होय .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा