शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

. अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता --



     .  अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------
            २०जानेवारी १९८०या दिवशी कोणत्याही अडथळ्यांची चिंता न करता जन्माला आलेले आमच्या वंश -वृक्षाचे हे शेंडेफळ . दोन वर्षापेक्षाही कमी अंतर असलेला -आलोकचा जणू पाठिराखाच . आलोक -अनिरुद्धला जुळ्यांप्रमाणेच वाढवलेले आठवतंय मला . 
            तीक्ष्ण बुद्धी आणि इतरांवर छाप पडेल असे व्यक्तिमत्व असलेला . आमच्या कडे पूर्वी पाहुण्यांची बरीच वर्दळ असायची . पुण्याला कोणी शिक्षणासाठी ,कोणी नोकरीसाठी ,कुणी उपचारासाठी तर कुणी सहज पुणे बघण्यासाठी आमच्या घरी येत असत . सहा ते साठ वयाच्या सर्वांशी लाघवी पणाने बोलून आपलेसे करून त्यांना कम्फर्टेबल झोन मधे आणणारा हा माझा मनकवडा मुलगा ,म्हणून कदाचित याला लहानपणी लाडाने आम्ही' मोनू 'म्हणत असू . ताई -दादा चे मित्र -मैत्रिणीनशी याची खास मैत्री . त्यांच्या सर्व वस्तू कुठे असतात ?आई मीठ मोहरी ,डाळ -तांदूळ कुठे ठेवते याची त्याला बारिक माहिती असत . चौकस बुद्धी आणि तीक्ष्ण पंचेंद्रिय असल्याने आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी त्याला माहीत असत . अभ्यास मात्र उडत -उडत करायचा ,त्यामुळे त्याला बरेच वेळेला ,ओरडा बसायचा . पण परिक्षेत मार्क मात्र उत्तम असायचे . शाळेत आदर्श विद्यार्थी ,आणि पालकांनाही आदर्श पालकांचा मान मिळवून देणारा हा आमचा मुलगा !!!!
       अर्चनाताईने लहान भावाचे नाव अनिरुद्ध ठेवायचे असे सांगितले . आणि आम्ही तेच नांव ठेवले . नावाप्रमाणे कोणत्याही रोधकाची पर्वा न करता ,बारावी टेक्निकल ,सी . ओ . ई . पी . मधे प्रॉडक्शन इंजिनियरिंग ,आणि अमेरिकेतील सिनसिनाटीहून एम . एस . होऊन नोकरीत स्थिर -स्थावर झालेले गुणी बाळ ते !!!चारुताचायोग्य जोडीदार  शुभम -मुक्ताचा प्रेमळ बाबा ,मुलगा ,जावई ,भाऊ ,मामा -काका अशी सर्व नाती जवाबदारीने अन प्रेमाने सांभाळणारा . अमेरिकेतून आईला रोज फोन करून हाल -हवाल विचारणाऱ्या या माझ्या मुलाचे माझ्या बऱ्याच नातेवाईकांना आणि मैत्रिणींना कौतुक वाटते .
दूरदेशी गेल्यावरही, रोज येणारा  तुझा फोन, जणू माझ्या प्राण वायूला संरक्षक कवच देणारा ओझोन...      
                                                                                                                               आई         

      अनिरुद्ध आम्हां सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा ,आज तुझा वाढदिवस चाळीसावा ,
पहाटे उठल्यावर शुभम -मुक्ताचा हसरा चेहरा  तुला सदा दिसावा ,
चारुताचा प्रेमळ सहवास शतकपूर्ती पर्यंत लाभावा ,
जन्मदात्यांना तुझा सदैव स्वाभिमानच वाटावा ,
चाळीशीच्या चष्म्यातून ,सकारात्मक बहुआयामी दृष्टिकोन तू जपावा ,
यश -कीर्ती -संपत्तीचा लौकिक -अलौकिक खजिना ,सत्कार्यासाठी खर्चुन वाढवावा ,
मैलाच्या दगडाने भूत -भविष्य सांधून ,गुरुकृपेने जीवन प्रवास सुकर -सफल व्हावा
चाळीशी म्हणजे काय ,जणू अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
एकच प्रार्थना सुखी -समाधानी चिरायुष्या साठी ,सर्वांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या पाठीशी असावे .
                                                                                                          आई  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा