कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

|| अर्पणपत्र ||

माझ्या पहिल्या ब्लॉगपोस्टसाठी हे अर्पणपत्र.

अंधकाराला छेदून आलोकित करणारा,
अवघड वाट अनिरुद्ध करून देणारा,
सहज -शुद्ध भावनांची अर्चनाच खरी पूजा मानणारा,
माझा अनन्य चारुत सुंदर सुवासिक मळा फुलविणारा,
त्याला संरक्षणाचे कडे देणारा,
माझ्या ॐ कार स्वरुपी अविनाशी परमेश्वरा,
मज कवनोद्यानातील अक्षरमाला सविनय अर्पिते, ती स्वीकारा.
--------------------------------------------------------------------
थोडी पूर्वजांकडून मिळालेली शिदोरी,
थोडी तात -मातेच्या उदरी,
थोडे आयुष्यात जगताना पडले पदरी,
इतरांना जगताना पाहिले या नेत्री,
शिक्षणासाठी जागवल्या रात्री,
परीजनांचे प्रेम अन मैत्री,
देवाजीने दिली खात्री,
आहे मी पाठिशी, मनातील उमटुदे ताम्रपात्री,
थेंबे -थेंबे साठले या पंचतत्वाच्या घागरी,
बांधली जुडी दुर्वांची, करोनी पूजा षोडशोपचारी,
अर्पिते परमेश्वरा चरणावरी,
वाहते ईश्वरा तुझिया शिरी. 


- आसावरी जोशी.

|| दीपावली चे दिवस सहा ||

गोधुलि समई दीप लावूनि, दुधदुभत्याने समृद्ध, गोवत्साचे पूजन असे वसुबारस,
परिवाराचे चिर-आरोग्यच खरे धन, समजुन करतो पूजा ती असते धनतेरस,
अभ्यंग फराळा ने चतुर्दशी साजरी, नरकासुर वधोनि कृष्णाचे देवत्व जाहले सरस,
संध्या समई अवसेला, गणेश-लक्ष्मी, सोने -नाणे, चोपडी पूजन करती माजी-आजी-वारस,
पाडव्याच्या साडेतीन मुहूर्ती, औक्षण, अन शुभ कामाचे रोप लावूनि फळ पावे रसाळ -गोमटे-सकस,
भाऊ -बहिणीचे प्रेमळ नाते जपतो भाऊ बिजेचा दिवस,
अश्विन-कार्तिक, कृष्ण-शुक्ल, अंधार-प्रकाश, कितीतरी नाती  जपणारा सण दीपावली चौरस,
देऊ शुभेच्छा अरस-परस, घेऊ शुभेच्छा अरस-परस.

|| दिवाळीची मौज -मजा ||

आली रे,आली रे, दिव्या-दिव्याची माळ घेऊन आली दिवाळी,
साफ-सफाई, किल्ले -तोरण, दारी अंगणी सडा-रांगोळी,
लाडू करंज्या, चिवडा-चकली, गोड-खारी शंकरपाळी,
शेव-चिरोटे, अनारसे अन वेटोळी वेटोळी कडबोळी,
फराळाची देवाण घेवाण, सजवुन सुंदर थाळी,
फुलबाजी माळ चक्र अनार, फटाके वाजति सांज-सकाळी,
एक दिवस काकी-आई तर एक दिवस आत्याबाई काका अन बाबाला ओवाळी,
मावशी-मामा, आज्जी-आबा, नुसति मज्जा येई आजोळी,
अभ्यंग-उटणे, भरजरी कपडे, दाग-दागिन्यांनी सजली मंडळी,
आनंद समई आशिष घेण्या जातो देवाच्या देवळी,
नतमस्तक होऊ देवाजिच्या पाऊली.