शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

***अटी लागू

           ***अटी लागू 
हल्ली माणसे आपली दुःखे शेअर करीत नाहीत ,आणि मदत मागत नाहीत ,अशी असते तक्रार ,
एक कारण -पैसा झाला मुबलक ,तो फेकला की दिमतीला माणसे मिळतात हजार ,
मग मदतीची भीक घेऊ कशाला ?कशाला हवेत कुणाचे उपकार ?
पण मग पाषाणातील झरे अन बाटली बंद पाणी यात फरक काय तो उरणार ?
दुसरी बाजू मदत करणाऱ्यांची ,त्याचाही दुष्काळ भासू लागलाय फार ,
अनकंडिशनल लव्ह ,हेल्प ,जाऊन बसलय ,कुठे तरी तडीपार !!!
कुणी नावासाठी तर कुणी कर वाचवण्या साठी ,कर -सेवा करणार ,
कुणी *अटी लागू असे दिसणार नाही इतक्या बारिक अक्षरात लिहून ,साध्या -भोळ्यांना लुटणार ,
बेमालूम पणे ,आवळा देऊन कोहळा उकळणाऱ्यांचाही असतो एक प्रकार ,
कमी उरलेत ,दुसऱ्यांच्या अडचणीत ,धावून जाणारे दयाळू -दानशूर -उदार ,
तरी शेवटी जग चालले आहे ,चांगल्यांच्याच बळावर ,मग ते असोत दोन -चार ,
गोड लागले म्हणून मुळापासून खाल्ले तर ,पुन्हा ऊस कसा उगवणार ?
दान देताना एका हाताचे ,दुसऱ्या हाताला कळु नये ,हा केवढा मोठा विचार !
मदत मागावी गरजे पेक्षा कमी ,मदत करावी क्षमते पेक्षा जास्त ,असे असावेत  सुंदर संस्कार !!!

प्रदर्शन दुःखाचे

                       प्रदर्शन दुःखाचे 
कमी -जास्त प्रमाणात दुःख प्रत्येकाच्याच वाटेला येत असते ,
म्हणून तर सुखी माणसाचा सदरा शोधणे अत्यन्त अवघड असते ,
दुःखाने कुणी जोरात रडते ,कुणी बैचेन दिसते ,तर कुणी निमूट पणे सहन करते ,
जोरात रडून इतरांचे लक्ष वेधून घेणारे काही असतात ,
काहींना प्रदर्शन आवडत नाही ,ते मनातल्या मनात मुसमुसतात ,
काही 'लांडगा आलारे आला 'गोष्टी सारखे उगाचच ओरडतात ,
दुसऱ्याला फसवण्याच्या छंदात ,शेवटी स्वतःच फसतात ,
असत्य असते अल्पायुष्यी ,सत्याचा प्रवास लांब -अवघड ,पण तरणारे शेवटी तेच असतात ,
दुःख वाटले तर कमी होते ,सुख वाटले तर वाढते ,असे लोक म्हणतात ,
पण -काहींना इतरांशी काही देणे -घेणे नसते तर काही इतरांच्या दुःखातच सुखावतात ,
थोडेच का असेनात दुसऱ्याच्या सुखाने सुखावतात अन दुःखात धावून येतात ,तेच खरे आपले असतात .

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

. कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन

.                     कवन -अमूर्ताचे मूर्ताशी मिलन 
जीवन पथावर चालताना दोन्ही अनुभवले ,वनवास आणि नंदनवन ,
उन्हाचा चटका अन चंद्रिका यामधील जागाही जगले  आशेने ,हे बावरे मन ,
गेले ते विसर ,येणारे लाभतील कितीसर !वेड्या मना तू जग रे आजचा क्षण अन क्षण ,
व्यवहाराच्या ओझ्याखाली बिचकल्या भावना ,हे कविते !वाटले नव्हते ,मन प्रसवेल घेऊन तुझे तन ,
वाटले ,जगणे शिकविणारी मांडणी मृत नसावी ,त्याला असावे रूप -रंग -नाव -चलन -वलन ,
भावनांना चढविली शब्दांची वस्त्रे ,थोडे यमकादी अलंकार ,शिकविले थोडे यम -नियम पालन ,
श्रीगणेशा करण्या मागे नक्कीच होता ,अत्रि -अनुसयेचा त्रिमुखी नंदन ,
हे कवना !सर्व रसास्वादात लाभली तुझी साथ ,ऋतु कोणता का असो बहरत गेले उपवन ,
आता तर इतुकी जडली तुझी सवय ,की तुजविण उदास भासे जीवन ,
स्वान्तसुखाय असेल तव जन्माचे कारण ,पण एखादी कळी खुलवता अली तर माझ्या सवे तू ही होशील धन्य ,
कधी मूक ,कधी शब्द ,कधी स्वर स्वरूपात दिलीस साथ ,मज जगण्याचे तू ही एक प्रयोजन ........ तू ही ... 

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

मकरसंक्रांती

                      मकरसंक्रांती 
चिमुकल्या तिळावर गोड पाक चढविला ,
स्निग्धता अन गोडी एवढी की ,काटाही भाव खाऊन गेला ,
स्नेह -सुगंध -गोडवा ,पसरविण्याची अंगी असे कला ,
काटेरी गुलाब असो वा हलवा ,बरेच काही शिकवून जाई ,माणसाला ,
तीळ -गूळ घेऊन ,संक्रांतीचा सण आज आला ,
खूप -खूप शुभेच्छा ,माझ्याकडून आपल्याला . 
                                    आसावरी जोशी .

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

सुख -शास्त्र

          सुख -शास्त्र 
जीवन जगताना मानसशास्त्र -तत्वज्ञान -आध्यात्म अश्या अनेक शास्त्रांचे ज्ञान आपल्याला मिळते ,
बरेच वेळा ते कळत असते ,पण सहज कुठे वळते   ......... !!!!!
पाण्याच्या अर्ध्या ग्लासा कडे बघुन ,कोणी म्हणते अरेरे अर्धे पाणी सरले !
तर कुणी म्हणेल चिंता नसावी ,अजून अर्धे पाणी आहे उरले ,
पन्नाशी नंतर पूर्वार्धाचा डोंगर सर केल्याचा मानावा आनंद स्वाभिमानाने ,
शिखरावरून उत्तरार्धाच्या उतरणीची चिंता करत बसु नये माणसाने ,
सकारात्मकतेचा सूर्य भेदू शकतो ,नाकारात्मकतेचा भीषण अंधार ,
एक दार बंद झाले तर ,उघडलेले असते संधीचे दुसरे दार ,
यश मिळाले तर कष्ट -बुद्धी -सुसंधीचा करायचा घोष ,
अपयश पदरी पडले तर नशीब अन देवाला का बरे द्यायचा दोष ?
जीवन -शास्त्राच्या वहीतील पहिले पान म्हणजे जन्म आणि शेवटले मृत्यु ,हे असते नक्की ,
मधली पाने कमी -जास्त असू शकतात ,त्यांची संख्या माणसाला माहीत नसते पक्की ,
प्रत्येकाने असते ठरवायचे ,गणित कसे सोडवायचे !करून भागाकार -गुणाकार -बेरीज की वजाबाकी ?
पूर्वजन्म -पुनर्जन्म हेतर एक गुंतागुंतीचे कोडे    ......... !!!!!!
कोटि -कोटि जीवात ,आपल्याला लाभला मनुष्य -जन्म ,हेही नसे थोडे . 

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

. पिंड

.                            पिंड 
बरेच वेळा व्यक्ती -विकासात बुद्धयांक वाढीसाठी केला जातो प्रयत्न प्रचंड ,
योग्य भावनाविष्कारांना हि हवे तेवढेच महत्व ,नसावा न्यून किंवा अहंगंड ,
अनुवंश -देवाची देणगी ,योग्य आहार -संस्कार पोषण या सर्वांनी बनत असतो एक पिंड ,
एखाद्या गहन प्रश्नाला सामोरे जाताना ,कोणी वाकतो तर कोणी शरण जातो ,राहून एकदम थंड ,
कोणी म्हणतो मोडेन पण वाकणार नाही ,अन अन्याया विरुद्ध पुकारतो बंड ,
काही नैसर्गिक प्रवृत्ती नष्ट करता आल्या नाहीत तरी त्यावर मात करून त्यावर ठेवावा पाबंद ,
'जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या ' किमान एवढा तरी असावा मान -दंड ,
इतरांना सुखी करण्यासाठी निरिच्छपणे काही करता आलेतर ,समजावे आपण जगलो उदंड .

. कल्पवृक्ष


.                          कल्पवृक्ष 
परसातील पडलेला नारळ आबांनी सोलायला घेतला ,
दूरदेशाहून आलेल्या नातवंडांना मोठा प्रश्न पडला ,
आबा आबा !नारळ वरून आहे कडक ,पण आतून पाणीदार कोवळा ,
नारळ पील करायला आबा तुम्हाला खूपच कष्ट अन वेळ लागला ,
आबा म्हणाले मुलांनो !नारळाचे मन तरल -स्नेहल -धवल कमालीचे ,
म्हणून देवाने त्याला जपायला ,कडक कवच दिले करवंटीचे ,
वरून तंतुमय ,टिकाऊ ,उबदार पांघरुण ,जणू जाळीदार शाल ,
आई तुम्हाला थंडीपासून जपायला ,घालते कसा कपड्यांवरुन कोट ,हिरवा -चॉकलेटी -लाल ,
डोक्यावर जटा -शेंडी ,तीन डोळे असलेले शंकरा सारखे भाल ,
झाड कसे उंच -सडसडीत -एव्हरग्रीन ,कायम फळणारे -डुलणारे आनंद पसरवी भोवताल ,
बागेला सोबत करी सदा ,मग वसंत असो वा रखरखीत ग्रीष्मकाल ,
शुभकार्यात -देवपुजेत ,पाच फळांमधे एकतरी नारळ लागतोच किमान ,
आज्जी बनवते लाडू -वडी -मोदक ,चटणी आणि कित्तीतरी पौष्टिक पदार्थ छान ,
समुद्राचे खारे पाणी घेऊन ,बदल्यात गोड पाणी देण्याची ,याला किमया लाभली महान ,
नारळाचे झाड असो वा फळ प्रत्येक भाग उपयोगाचा ,म्हणून मिळाला त्याला कल्पवृक्षाचा मान .