महानाट्य
महानाट्याचा एक अध्याय संपला ,
एक चक्री वादळ आले ,घोंगावले निघून गेले लोपले ,
वादळाच्या पूर्व सूचना ना समजल्या ,का ना उमगल्या तुझिया मना ,
आले काय ,गेले काय !!खोलवर ठेवून गेले कित्ती तरी खुणा ,
होऊनि उध्वस्त ही उठावेच लागते पुन्हा ,जीवनासी देण्या गती ,
तुम्ही नसता एकटे ,जोडलेले जीव अससी ,कित्येक तुमच्या सोबती ,
पळून जाणे पर्याय नसतो ,खरी परीक्षा पळवून लावण्यात भिती ,
जीवनाला अर्थ हवा तर ,लढल्याविना लाभेल का रे जिवा तुला सदगती ,
पूर्व अन पुनर्जन्म असती गहन प्रश्न चिन्हे ,सुखांत मात्र स्वतः च्याच हाती ,
प्रसंगानुरूप मधील पाने आपापलीच लागतात भरावी ,आवडो वा ना आवडो किती !!
तो ठरवितो प्रत्येक पुस्तकाची पृष्ठ संख्या ,आदि आणखिन इति ,
उत्पत्ती -स्थिती-लयासी समता भावाने जाणे सामोरे ,म्हणजेच असावी दिगंबर त्रिमूर्ती ची प्रचिती ,
सगुणातील निर्गुणाची अन निर्गुणातील सगुणाची परमानंदी अनुभूती .
रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२
महानाट्य
सतीश ब्रम्हे एकसष्ठी समारंभ
सतीश ब्रम्हे एकसष्ठी समारंभ
श्रीराम जन्मला ग सखी पुत्र जन्मला सुलभा -गोपाळा घरी ,
सतीश पाठी आली संध्या सोनेरी ,ब्रम्हे क्षितीजा वरी ,
तामाणे पति -पत्नीने अर्पिली सुंदर-सुशील -विद्या-विनय आदि गुणाने युक्त अंजली तव करी ,
लव -कुश सम पुत्र रत्न लाभले उभयतांच्या संसारी ,
आनंदासी द्विगुणित करण्या आली रिया ,बनुनी गोड परी ,
आदर्श पती -पिता-बंधू-श्वसुर-आबा बनुनी मायेचे तू छत्र धरी ,
समस्त नाती जपसी उत्तम ,पुत्र तर तू श्रावण बाळा परी ,
खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ,एकसष्ठी सोहळ्यासी लाभल्या चार पिढ्या सदगुणी ,
शतकी वाटेवर तव लाभो सदा ,आयु -आरोग्य-सुख -समाधान ,हीच प्रार्थना -
देवाच्या उरळी स्थित प्रभु राम चरणी .
गुरुवार, २० जानेवारी, २०२२
आठवणीतील गांव
आठवणीतील गांव
माझे पूवाश्रमीचे नांव शकुन्तला प्रभाकर बापट . माझे लहानपण भवानीमंडी /भैसोदामंडी या सीमारेषे वरील जोडगावात गेले . हे स्टेशन मुंबई -दिल्ली ला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे वरील नागदा आणि कोटा जंगशन च्या साधारण मध्यावर आहे . याचे अदभुत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे भवानी मंडी स्टेशन वर गाडी उभी राहिली तर एका बाजूचा प्लॅटफॉर्म भवानी मंडी (राजस्थान )जिल्हा झालावाड मध्ये तर दुसरी कडील प्लॅटफॉर्म भैंसोदा मंडी (म . प्र . )जिल्हा मंदसौर मध्ये येतो . तिकीट खिडकी वरील तिकीट देणारा म . प्र . मध्ये बसतो तर तिकीट घेणारे यात्री राज. मध्ये उभे असतात . दिल्ली कडून मुम्बई कडे जाणारी गाडी स्टेशन वर थांबली तर इंजिन राजस्थान आणि गार्ड चा डबा म . प्र . मधे असतो ,याच्या उलट मुंबई कडून येणाऱ्या गाड्यांचे असते .
स्वातंत्र्य पूर्व काळात माझे आजोबा भवानी मंडी जवळील केसोदा नामक छोट्याश्या गावचे जहागीरदार होते ,जे आधी ग्वालियर स्टेट व नंतर म . प्र . मध्ये आले . स्वातंत्र्या नंतर जहागीरदारी संपुष्टात अली पण शेती आणि संत्री ,मोसंबी,लिंबाची बागायती मात्र होती . पुढे माझ्या वडिलांनी शेती सांभाळली आणि आधुनिकतेचा स्पर्श देऊन भरभराटीस आणली . शेतमालाची ने आण करणे सोपे जावे म्हणून आजोबांनी भैसोदा मंडीत जागा घेऊन मोठे घर बांधले होते . बऱ्याच खोल्या ,धान्य साठवायची कोठारे ,ओसरी ,अंगण ,विहीर गोठा छोटी बाग इत्यादी . वडिलांनी वीज ,पाणी ,फरशी अश्या सुधारणा केल्या .भाड्याने देण्या साठी पण ६-७डबल रूम बांधल्या . आजी -आजोबा ,आई -वडील ,एक बाल विधवा आत्या ,आम्ही तीन भाऊ दोन बहिणी अशी भावंडे ,कायम पै -पाहुण्यांचा राबता ,असे आमचे आनंदी संयुक्त कुटुंब होते . शेजारी आणि भाडेकरुही कुटुंबाचाच एक भाग असत . आमचे प्राथमिक शिक्षण म . प्र . मध्ये माध्यमिक राजस्थान मध्ये झाले . पूर्वी कॉलेज नसल्याने माझे एम . ए .हिंदी लिटरेचर पर्यंत चे शिक्षण बाह्य विद्यार्थी म्हणून पुन्हा विक्रम युनिव्हर्सिटी उज्जैन मध्य प्रदेश मधून झाले.
भैसोदा मंडी एका छोट्या वसाहती सारखी होती पण भवानी मंडी मात्र सर्व सुख सोयीने युक्त गाव होते . धान्य,कापुस ,तेल बिया ची मोठी बाजार पेठ होती त्या मुळे रेल्वे स्टेशन ला ही खूप महत्व होते . आमच्या कडे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाहुण्यासाठी येथील विविध प्रकार ची शेव ,कलाकंद ,कचोरी चे विशेष आकर्षण होते .
काही गमतीदार आठवणी म्हणजे -उत्तरे कडून मुंबई कडे दुभत्या म्हशींना घेऊन जाणाऱ्या मालगाड्या इंजिन मध्ये कोळसा-पाणी भरण्या साठी थांबल्या कि भैया लोक दूध -दूध म्हणून ओरडत ,लगेच सर्व लोक पैसे ,पातेली घेऊन स्वस्त -मस्त-धारोष्ण दूध आणण्या साठी धावत ,मग काय वस्तीत खीर ,बासुंदी ,हलवा बनवून अचानक सण साजरा होत . तसेच कधीतरी आमच्या कडे मुंबईहून फास्ट ट्रेन ने पाहुणे येणार असले तर आमच्या घरात राहणारे रेल्वे ऑफिसर ट्रेन ला रेड सिग्नल देऊन गाडी काही मिनिटे थांबवत ,आमचे पाहुणे लगेच खाली उतरून चालत घरी येत . ६०-७०वर्षांपूर्वी तरी येथे सर्व धर्म-जाती-भाषा -स्तरातील लोक एकोप्याने रहात ,एकमेकांना अडीअडचणीत मदत करीत .हिंदी भाषिक प्रदेशात २-४मराठी घरे दुधात साखर मिसळावी तशी वेगळेपण टिकवत एकरूप झाली होती . गतकाळातील गोड आठवणींचा ठेवा आजही मोठी ऊर्जा देऊन जातो हेही परम भाग्यच .
आसावरी जोशी
१चिंतामणी अपार्टमेंट ,३८/२मधुबन कॉलनी ,
कर्वेनगर ,पुणे ४११०५२,
सेल-९६८९३९०८०२
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१
Ananya 40th birthday
अनन्या चाळीसावा वाढदिवस
चाळीशीचा चष्मा म्हणजे बहुआयामी दृष्टी ,
परमेश्वर कृपेने अन आप्त मित्र परिवाराच्या शुभेच्छानी बहरत राहो तव आयुष्याची सृष्टी ,
सज्ञान वयाला अनुभवाची जोड लाभते पूर्वार्धात ,
परिश्रम जवाबदारी अन सत्कर्माच्या पूंजीवर मिळणार असते प्रेम सुख समाधानाचे हवे हवेसे व्याज उत्तरार्धात ,
अर्चित च्या आगमनाने जणू साखर च पडली संसार रुपी दुधात ,
आज वर आलोक ची तुला लाभलीच आहे अन आयुष्यभर लाभत राहो सुंदर साथ ,
जणू लक्ष्मी च्या हातात केशवाचा हात ,
श्रीकृपेने आयु आरोग्य सुख समाधानाची सतत होवो तुजवरी बरसात .
आई
Charuta 40th birthday
चारुता चाळीसावा वाढदिवस
चारुता चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त खूप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा ,
ईश कृपेने लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समाधन ,पूर्ण होवो साऱ्या इच्छा ,
शुभम -मुक्ता फुले दोन ,तुमच्या संसार रूपी नंदनवनाची शान ,
अनिरुद्ध च्या सुंदर साथीने होवो चतुः आश्रमाची वाटचाल सुकर -सफल आणि छान ,
घरी दारी ,सरकार दरबारी ,मिळत राहो आदर मान -सन्मान ,
आप्त मित्र परिवाराला तुझा कायम वाटो स्वाभिमान ,
चाळीशी म्हणजे अठरा वर्षाचा सज्ञान पाया ,त्यावर उभी बावीस वर्षांच्या अनुभवांची सुंदर नक्षीदार कमान .
आई
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१
Fulanche sakhali
रविवार, २८ मार्च, २०२१
70th birthday
ईश्वर चरणी मनःपूर्वक नमस्कार
आणि सर्व शुभचिंतकांचे खूप खूप आभार
३१मार्च म्हणजे असते एका आर्थिक वर्षाची समाप्ती ,
प्रत्येक एन्ट्रीत हवा ताळमेळ अन निती -निगुती ,
ईशकृपेने मज जीवनात झाली सात दशकांची पूर्ती ,
अर्थकारणात चालत नसते चूक उन्नीस -बीस ,
जीवनात स्वार्थ -परमार्थ ,पाप -पुण्य मोजायला वर बसला आहे निर्गुण-निराकार हिशेबनीस ,
अर्थपूर्ण आयुष्या साठी हवे सत्कर्म ,निर्णय क्षमता ,आप्त -मित्र-परिवाराची साथ अन नशिबाचे बळ ,
परमेश्वराचे स्थान तर निश्चीतच असते सार्वोच्च अढळ ,
देवादिकांना तरी भोग आहेत का चुकले ?
आपण तर शूद्र जीव ,प्रवासात येणारच चढ -उतार ,खाच खळगे अन अडथळे ,
पूर्व संचितानेच आपणास मनुष्य जन्माचे भाग्य लाभले ,
शिव -शक्ती च्या मिलनाचा हा तर एक दुवा ,
जीवन सार्थकी लागू दे ,नमन तव चरणी श्री गणेशा -दिगंबरा-लक्ष्मी केशवा .
आसावरी जोशी