शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

।।सुगरण ।।

चटणी ,कोशिंबीर ,भाजी ,आमटी अन उसळी,
सारखीच सामग्री वापरुन सुद्धा ,प्रत्येकाच्या हातची चव असते वेगळी,
लिंबू -मिरची -कैरी लोणचे ,पाहूनच तोंडाला सुटते पाणी,
कवडी सारखे दही ,ताजे ताक तर ,भूतलीचे अमृत जाणी,
भात असावा मऊ मोकळा ,भाकर -पोळी गोल मऊ,
पापुद्रे सुटलेली ,शिळी सुध्दा आनंदाने आम्ही खाऊ,
सणासुदीला पुरी असावी तळलेली ,कढई पासुन ताटापर्यंत कायम टम्म फुगलेली,
पुरणपोळी मऊ लुसलुशित ,कडेपर्यंत भरलेली ,इडली पानात वाढताना आनंदाने डुललेली,
केक -मैसूरपाक -अनारसा ,सुंदर मांडा जाळीदार ,तिखटामध्ये डोसा -उत्तप्पा -ढोकळा असे जोडीदार,
जिलबी ,गुलाबजाम ,रसगुल्याचे तन -मन रसदार ,करंजी ,चिरोटा शंकरपाळे तोंडात घेताच विरघळणार,
उकडीचा मोदक पातळ पारी ,मऊ सुबक ,रुबाबदार ,श्रीखंडाचे काय सांगता मिटक्या मारत बोट चाटणार,
पापड -पापडी,भजीवडे ,जड कसे ?तेलावरते तरंगणार ,
भरल्या पोटी पुढे ठेवले ,तरी भूक चाळवणार ,
लाडू -वाडीला तारेचापाक कसा काय जमणार ?पिकनिक पार्टीत भेळच बिनविरोध जिंकणार ,
समप्रमाणात रवा-साखर -दूध -तुपाने ,करायचा असतो प्रसादाचा शिरा,
घालून मेवा ,केळे ,केशर ,भक्ति -रसाने भरापुरा,
कला-शास्त्र अन प्रेमाच्या 'त्रिवेणीचा'पाककलेत वाहे झरा ,
प्राशन करणाऱ्याला मिळतो ,पूर्णब्रह्माचा आनंद खरा . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा