सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

आजोळच्या ----भाग २

        आजोळच्या ----भाग २
बदलापुरला सर्व बहिणी आणि भाचरं जमली की श्रीधर मामा ,विसु मामा ,मन्या मामा यांना काय करू अन काय नाही असे व्हायचे . लाडा सोबत गप्पा -गोष्टी ,थट्टा मस्करीही असायची . शकुंतला मामी ,वसुधा मामी अन माधवी मामी ,हसतमुखाने एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कश्या करत याचे आश्चर्यच वाटते आता . तीन ही माम्या' सुग्रण ',म्हणजे रोज रोज केळ्याची 'शिक्रण 'वाल्या नाहीत हं !!त्यांच्या प्रत्येक पदार्थाला तृप्ती देणारी चव असायची . प्रेम आणि आपुलकी या सामुग्रीचा सढळ हाताने वापर करीत ,म्हणून असेल कदाचित . 
                      आंबा ,जांभुळ ,तुती यांचा फलाहार ,माम्यांनी लोणच्या साठी चिरलेल्या कैरीच्या मीठ -हळद -तिखट लावून ठेवलेल्या फोडी ,अचानक कमी झालेल्या असायच्या . 
     तळघरात आंब्यांची लावलेली अढी ,तयार झाली की नाही ती सारखी चेक करणे ,कारण प्रत्येकाला रोज एक आक्खा आंबा खायला मिळत असे . शिवाय अधून -मधून जेवणात अंबरस असायचाच . कागदाच्या चौकोनावर मिळालेल्या फोडणी च्या भाकरीची चव ही आंब्याच्या तोडीसतोड . 
        बाकी खेळ म्हणाल तर डबा ऐसपैस ,पत्यातील नाटेठोंम ,ज्याचे खरे नाव उशीरा उमगले ,झब्बू बदामसात ,जांभळे गोळा करुन आणणे ,अंगणातील मोरी चा तरण तलाव बनवणे इ . नाना आणि मामा लोकांची हौस आणि कष्ट या मुळे बहरलेल्या ,परसबागे मुळे ,आम्हाला ,अनेक प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे पाहायला मिळाली . पांढरी मिरची ,अक्कलकाढा ,लाजाळु ,याचेतर अप्रूपच वाटे . 
           रोज संध्याकाळी सर्व मुलांनी झोपाळ्यावर बसून' शुभं करोती ' म्हणणे ,कधीतरी गुलाबाची बाग ,नदी ,मारुति मंदिर येथे फिरायला जाणे व्हायचे .आम्ही मावस ,आत्ते ,मामे भावंडे असायचोच ,त्यात भर म्हणून  वाड्यातील भाडेकरू कुटुंबीयांची मुले ही  असायची . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा