सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

आजोळ च्या आठवणींची चित्रफीत -part-1

      आजोळ च्या आठवणींची चित्रफीत 
आमचे नाना (चिं . पु . देवधर )आणि माई यांना अर्पण ----
नाना -माईच्या अष्टपैलू संसाराला फुलवण्या साठी जणू देवाने त्यांना पाच कन्यारत्न आणि तीन पुत्ररत्नांची देणगी दिली असावी . माझी आई जिला आम्ही मुले मामी म्हणायचो तिला नाना -माई कधी गोदू म्हणत तर कधी आक्का म्हणत . या  लेकीची पाठवणी थोडी लांब झाली होती . राजस्थान -मध्यप्रदेश च्या हद्दीवर स्थित भैंसोदामंडीहून बदलापुरला पोहोचायला जवळ -जवळ चोवीस तास लागत . हल्ली अमेरिकेला जायलाही एवढा वेळ लागत नाही ती गोष्ट वेगळी . आई जमेल तेव्हा आम्हा भावंडांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत बदलापूरला यायची . कधी इकडची मंडळी आमच्या घरी येत असत . वडिलांना शेतीचा व्यवसाय आणि संयुक्त कुटुम्ब असल्याने ,फार दिवस घर सोडून बाहेर पडता येत नसे . ते आले तरी त्यांना थोडेच दिवस राहायला जमत असे . 
             मग आमच्या गावाहून मामाच्या गावाला येता जाताना ,पहिला हक्काचा ब्रेक मुम्बईला -अर्थातच ताई मावशी /लीला मावशी कडे . या ब्रेक मधे मुंबई दर्शन ,चौपाटी एखादा मराठी सिनेमा /कार्यक्रम ठरलेला . मग मुंबईला एक तरी मामा आम्हाला घ्यायला यायचा . बदलापुरला माहेरवाष्णी जमायला सुरुवात झालेली असायची . आणि घर माणसांनी फुलुनजायचे .उषा मावशी तर मला मावशी पेक्षा बहीण किंवा मैत्रिणी प्रमाणे जवळची वाटायची . माझ्या लग्ना नंतर ,पुण्यात 
गेल्यावर इंदूमावशी चे घर म्हणजे ,पुण्यातील माझे जिव्हाळ्याचे माहेर घर . मावश्यांप्रमाणे सर्व काका लोकांनी पण आमच्यावर खूप माया केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा