सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

परिस्तिथी जन्य गुरु कोविड १९/ कोरोना

         परिस्तिथी जन्य गुरु  कोविड १९/ कोरोना 
एका परावलंबी शूद्र व्हायरस ने  संपूर्ण मानव जातीची  चांगलीच आवळली मान ,
त्याच्या लेखी सर्व देश -जाती-धर्म -रंग-श्रीमंत-गरीब-शिक्षित-अशिक्षित ,समानच ,ना कोणी मोठा ना कोणी लहान ,
स्वावलंबन ,स्वच्छता ,स्वयंशिस्त ,काटकसर, कष्ट याचे कोरोना नामक गुरूने उजळणी रूपात शिकवले  ज्ञान ,
वर्ष भरात आले काय नि गेले काय ,कित्येक  कार्ये ,उत्सव ,समारंभ ,सण ,वार ,
सनई ,ढोल ,ताशे ,घंटा ,टाळ अश्या ऊर्जा देणाऱ्या नादाऐवजी ,ऍम्ब्युलन्स  च्या आवाजाने केले बेजार ,
उलटी गंगा वाहू लागली ,काय म्हणावे या कलियुगाला !!!
पूर्वी पालक म्हणत बालकाला “ठेव तो मोबाईल अन बस अभ्यासाला ”
आता -“घे तो मोबाईल अन बस अभ्यासाला ”असे आईच सांगे मुलाला ,
आप्त मित्रांपासून दोन हात दूरच राहणे म्हणजे होते तुसडे पणाचे लक्षण ,
सध्या तेच वागणे म्हणजे झालाय सभ्य शहाण्या माणसाचा एक गुण ,
सुख दुःखात माणसाने माणुसकी जपत कायम माणसा सोबत असावे ,
महामारीने शिकवले आजारी माणसा पासून दोन मीटर दूरच रहावे ,
बुद्धीच्या जोरावर मानवाने निसर्गावर केली मात , नियमांपेक्षा वरचढ झाले नियमांना पुष्टी देणारे अपवाद 
स्वरक्षणा साठी पंचतत्व युक्त पुरूष -प्रकृतीला नाईलाजाने उचलावा लागत आहे हात ,
मानव -निसर्ग ,मन -शरीर ,नवे -जुने ,बुद्धी -भावना  मानवता -भौतिकवाद ,सर्वातच साधुया समतोल ,
“अति तेथे माती “शेवटी सुवर्ण मध्यच ठरत असतो अनमोल 
आपल्याकडे बाहेरून आल्यावर अन जेवणा पुर्वी हातपाय धुणे हा रक्तातच रुजला होता संस्कार ,
“बिग हग पेक्षा प्रेमाने सुहास्य बघ “ची होती शिकवण ,शेकहॅंड पेक्षा करतच  होतो ना नम्रतेने नमस्कार ,
जन्म मृत्यू समयी सोयर सुतक म्हणजे आजच्या क्वारंटाईन चाच होता एक प्रकार ,
रूढी परंपरांचा बडगा नको ,पण समजून घ्यायला हवा त्या मागचा शास्त्रीय आधार ,
“वाचाल तर वाचाल “खरे असले तरी सध्या  अनलिमिटेड  कॉलिंग वाट्सअँप ,ट्विट वाचन ,कळेना शाप कि वरदान !!!
शेवटी साधन होऊ नये साध्य याचे आपणच ठेवायचे असते भान ,
दो गजकी दूरी ठेवताना ,जमेची बाजू म्हणजे सोशल मीडिया मुळे भावनांचा निचरा करता आल्याने पेलता आले अवघड आव्हान 
सर्वोच बुद्धिमान सामाजिक प्राणी ,पैसे -सत्ता -शक्ती असूनही झाला असहाय ,ताका ने भागवावी लागली दुधाची तहान ,
जुनं ते सर्वच सोनं नसेलही ,पण पाश्चात्यांचे अंधानुकरण हा एकमेव नसावा सर्वोत्तम उपचार ,
संकटे येतात तशी जातातही ,त्यांना संधी समजू या अन डॉक्टर ,पोलिस स्वच्छता कर्मचारी ,सर्व समाज सेवकांचे मानूया आभार 
काळजी करूया नकोत ,काळजी घेऊ या आपली अन इतरांची , करुयात बंदिवासाचा  सदुपयोग अन सकारात्मक विचार ,
शुद्ध निरिच्छ सेवाभाव ,हीच तर खरी विरक्ती -श्रद्धा-भक्ती अन ईश्वरीय साक्षातकार ,
देवा महामारीच्या विळख्यातून लवकर सोडव मानवास ,दे विश्व् बंधुत्व भाव जपण्याची सदबुद्धी , तव चरणी शतशः नमस्कार !!!
                                                                             आसावरी जोशी 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा