सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

अष्टांगयोगातील एक शुद्धिक्रिया -जलनेती

         अष्टांगयोगातील एक शुद्धिक्रिया -जलनेती 
मी योगप्रवेश >परिचय >शिक्षक हा अभ्यासक्रम नाशिकच्या योगविद्याधाम येथे २००४ मध्ये एक महिन्याच्या निवासी शिबिराद्वारे पूर्ण केला . शास्त्रीय पण सोप्या पद्धतीने अष्टांग योग शिकवल्या बद्दल सर्व गुरुजनांचे आभार . त्या नंतर ही वेळोवेळी निरामय जीवनाला पूरक असे छोटे छोटे कोर्स केले . इगतपुरीला  राहून ‘विपश्यना ’चे प्राथमिक शिक्षण घेतले . आयुष्याच्या आत्ता पर्यंत च्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी कळत न कळत मला सुज्ञान ,संस्कारक्षम ,साकारात्मकतावादी ,सक्षम बनवण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे अन जन्मदात्या मातापित्यांचे आभार . पंचतत्वांनी व्यापलेल्या निसर्गरूपी गुरु चे आभार . मनुष्य जन्म देऊन आज पर्यंत जे सुख -समाधान दिले त्या परमोच्च गुरुदेव परमेश्वराचे आभार आणि सर्वांना शतशः नमन . 
        अष्टांगयोगातील यम ,नियम ,आसन ,प्राणायाम म्हणजे बहिरंगयोग . धारणा ,ध्यान ,समाधी हा अंतरंगयोग . बहिरंग  आणि अंतरंग ला जोडणारा दुवा म्हणजे प्रत्याहार . बहिरंग शरीराला अंतः -बाह्य शुद्ध ठेवायला व निग्रही, समतोल साधणे ,सकारात्मकता शारीरिक आरोग्य चांगले कसे ठेवायचे हे शिकवतात . अंतरंग मन आणि आत्म्याला निरोगी कसे ठेवता येईल हे शिकवतात . अश्या प्रकारे शरीर -मन-आत्म्याचा सुंदर योग जुळून आला की निरामय जीवन जगण्यास मदत होते . योगशास्त्राकडे उपचार पद्धती म्हणून न पहाता ,जीवनशैली म्हणून बघणे उचित ठरेल . 
         प्रत्येक व्यक्तीने या जीवनशैलीचे अनुकरण केले तर कुटुंब ,समाज ,राष्ट्र आणि ओघाने समस्त सृष्टी निरोगी ठेवण्यास मदत होईल . 
     संपूर्ण आरोग्यासाठी सामान्यतः योग्य आहार ,व्यायाम ,विश्रान्ती सोबत एका आध्यात्मिक बैठकीची गरज असते . आपण नशीबवान आहोत कि आपल्या संस्कृतीला ही बैठक वेद ,पुराण ,आयुर्वेद ,योगशास्त्र ,रामायण ,महाभारत ,गीता अश्या अनेक अमूल्य ग्रंथातून ,ऋषीमुनी ,संतमहंतांच्या विचारधारेतून वारसाहक्काने मिळाली आहे . त्यावरील धूळ झटकून गाभ्याचा अंगीकार ,संवर्धन ,जतन ,प्रसार करायला हवा . तर्कशास्त्राच्या मदतीने एका पिढीने पुढच्या पिढी पर्यंत या संपत्तीचे हस्तांतरण करीत राहिले पाहिजे . आपली प्राचीन शास्त्रे स्थल -काल अबाधित आहेत . जीवनशैली म्हंटले कि वैयक्तिक पातळीवर दैनिक ,नैमित्तिक ,प्रासंगिक लवचिकतेचे भान ही असायला हवे . 
    महामुनि पतंजलींना नमन करून मी  योगशास्त्रातील जलनेती या शुध्दीक्रियेचे छोटे प्रात्यक्षिक प्रस्तुत करीत आहे .अनेक तज्ज्ञांनी याची महती सांगितलीच आहे . पण सध्या महामारी जन्य परिस्थितीत ,किमान रोज सकाळी एकदा जलनेती केल्याने मला आणि अनेकांना फायदा होत आहे . मी २००ml पिण्याच्या कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालुन एका नाकपुडी साठी वापर करते . पुन्हा तशीच क्रिया दुसऱ्या नाकपुडी साठी करते . जलनेती करण्यापूर्वी आधी ५-१०वेळा कपालभाती करून नासिका मार्ग स्वच्छ करून घेणे जी नाकपुडी (नाडी )चांगली चालत असेल त्या बाजुने सुरुवात करावी . पुन्हा २००ml पाणी घेऊन दुसऱ्या बाजुने ही क्रिया करावी . किंवा कम्फरटेबल वाटेल त्या बाजूने आधी केली तरी हरकत नाही . जलनेती करताना नाकाने श्वास घेऊ नये . तोंड उघडे ठेऊन सहज श्वास घेत रहावे . नेती पूर्ण झाल्यावर पुन्हा ५-१०वेळा कपालभाती करावी . नाकासमोर पाणी टिपण्या साठी एक स्वच्छ रुमाल धरावा . घश्यात पाणी गेले तरी काळजी नसावी . खाकरून टाकावे . डोक्याच्या बाजूला थोडे पाणी गेले असे वाटल्यास ,कपाळावर पुढे ,डावीकडे ,उजवीकडे थपकी मारावी . धन्यवाद !!!
                                      आसावरी जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा