ईश्वर चरणी मनःपूर्वक नमस्कार
आणि सर्व शुभचिंतकांचे खूप खूप आभार
३१मार्च म्हणजे असते एका आर्थिक वर्षाची समाप्ती ,
प्रत्येक एन्ट्रीत हवा ताळमेळ अन निती -निगुती ,
ईशकृपेने मज जीवनात झाली सात दशकांची पूर्ती ,
अर्थकारणात चालत नसते चूक उन्नीस -बीस ,
जीवनात स्वार्थ -परमार्थ ,पाप -पुण्य मोजायला वर बसला आहे निर्गुण-निराकार हिशेबनीस ,
अर्थपूर्ण आयुष्या साठी हवे सत्कर्म ,निर्णय क्षमता ,आप्त -मित्र-परिवाराची साथ अन नशिबाचे बळ ,
परमेश्वराचे स्थान तर निश्चीतच असते सार्वोच्च अढळ ,
देवादिकांना तरी भोग आहेत का चुकले ?
आपण तर शूद्र जीव ,प्रवासात येणारच चढ -उतार ,खाच खळगे अन अडथळे ,
पूर्व संचितानेच आपणास मनुष्य जन्माचे भाग्य लाभले ,
शिव -शक्ती च्या मिलनाचा हा तर एक दुवा ,
जीवन सार्थकी लागू दे ,नमन तव चरणी श्री गणेशा -दिगंबरा-लक्ष्मी केशवा .
आसावरी जोशी
रविवार, २८ मार्च, २०२१
70th birthday
सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०
Happy २५th anniversary Archana -vinay best wishes for silver jubilee of your marriage
Happy २५th anniversary
Archana -vinay best wishes for silver jubilee of your marriage
अर्चना -विनय १९९५मध्ये याच दिवशी सहजीवनाचा तुम्ही उभा केलात राजमहाल ,
धर्मेच -अर्थेच ...... वचने पूरी करत प्रेम ,सहकार्य ,तडजोड अन आश्वासक वृत्तीने सोडवलेत सर्व सवाल
सुखी संसाराचा स्थायी भाव ‘प्रेम ’कधी मूक तर कधी व्यक्त होऊन करीत गेलात एकमेकासी बहाल ,
आप्त ,मित्र ,परिवारा सोबत प्रेम अन कर्तव्याने कायम जोडून ठेवलीत नाळ ,
“ईशा -अनिका “तव नभांगणातील “चंद्र -सूर्य “अखंड प्रकाशित ,सांज असो वा प्रातःकाल ,
स्वयंपूर्ण असते का कुणी ?पण सुंदर सांभाळलात जीवन संगीतातील सूर -ताल ,
संसाराचे सार उमगले तुम्हां ,पायातपाय ऐवजी हातात हात घालून चालण्याची तुमची केमिस्ट्री कमाल !!
शुभदिनाचा रौप्य -सुवर्ण—हीरक महोत्सव साजरा करा ,बनून एकमेकांची ढाल ,
एक श्वास तर दुसरा उश्वास ,योग चंदेरी ,वृद्धिंगत होत राहो प्रेमाचा खजिना ,
लाभो उभयतांना उदंड आयु -आरोग्य -सुख समृद्धी-समाधान ,हाच आशिर्वाद अन कामना ,
तव सहजीवनाचा वृक्ष बहरो सदा ,प्रार्थना स्वीकारा श्रीगणेशा -गौरीनंदना .
आई
मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०
को जागर्ति ,को जागर्ति
को जागर्ति ,को जागर्ति
कोजागरी पौर्णिमा हा सण लक्ष्मी ,ऐरावतावर आरूढ इंद्र देव ,अश्विनीकुमार ,मनाचा ग्रह चंद्रमा यांच्याशी निगडीत आहे . या दिवशी हे सर्व आराध्य तत्व रूपात पृथ्वी वर अवतरतात अशी आस्था . या सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्र या दृश्य माध्यमा च्या पूजेने आपणास सुख ,समृद्धी ,शारीरिक -मानसिक आरोग्य लाभते .
‘ को जागर्ति ‘म्हणत निरभ्र नभांगणात चंद्रिका जडित सिंहासनावर निष्कलंकित शीतल तेजाने युक्त पूर्ण चंद्र विराजमान झाला . त्याने निद्रितानां जागे करीत व जागे असलेल्याना सत्य -असत्य ,सदाचार -दुराचार ,स्वाभिमान -दुराभिमान ,न्याय -अन्याय ,विवेक -अविवेक ,आरोग्य -अनारोग्य ,पवित्र अपवित्र ,सुर -असुर ,कर्म-अकर्म यातील चांगल्याची निवड अन वाईटाचा नाश करण्या साठी दृष्टी पथात प्रकाशाची उधळण केली . हरिद्रा ,कुंकुम ,पुष्प अक्षदा वाहून पूजन ,दिव्याने औक्षण ,अर्ध्य सोडून मसाला दुधाचा नैवेद्य ,नमन आदि परंपरागत उपचार करून आम्ही प्रसादाचे प्राशन केले .
पूजोपचार नुसते निरर्थक उपचार नसून रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बहुगुणी वस्तू हाताशी असाव्यात हाच आपल्या पूर्वजांचा खरा हेतू असावा . दीप म्हणजे अग्नीचे प्रतीक . त्यात सर्व वाईट गोष्टीना भस्म करून पुन्हा स्वतः शुद्ध व तेजोमय रूपात प्रज्वलित राहण्याची शक्ती असते . मसाला दूध म्हणजे शुद्ध ,सात्विक ,स्निग्धता या गुणांची हानि न करता केशराचा सुंदर रंग ,वेलचीचा सुगंध साखरेचा गोडवा ,सुक्या मेव्याची पौष्टिकता स्वतः मध्ये सहज सामावून घेऊन गुणांची वृद्धी कशी करावी याचे प्रतीक . आपले शरीरच नव्हे तर संपूर्ण सृष्टी पंचतत्वांनी व्याप्त आहे . आपल्या प्रत्येक सण ,वार ,उत्सव यात पृथ्वी ,जल,वायू,अग्नि आकाश ,यात आणि निरामय जीवनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा समतोल साधणे शिकवले जाते . त्यातील भावार्थ लक्षात घेणे महत्वाचे .
मी वर चंद्राला निष्कलंक म्हंटले आहे . आपण नेहमी सौंदर्यवतीच्या सुमुखाला चंद्राची उपमा देतो . पण आज मला चंद्रात सुमुखीचे दर्शन झाले .चंद्रावरील काळे डाग ,डागनसून कुरळे काळे केश आहेत ,गहिरे पाणीदार काळे नयन आहेत ,वाईट नजर लागूनये म्हणून लावलेला काळा टिळा आहे रजत कांतीवर शोभणारा तीळ आहे चंद्रावरील खाच खळगे म्हणजे सौंदर्याला चार चांद लावणाऱ्या गालावरील खळ्याच जणू .प्रत्येक महिन्या च्या पौर्णिमेला उगवणारा चंद्र सुंदरच दिसतो पण कोजागरीचा चंद्र मातृत्वाचे तेज असणाऱ्या दोन जीवांच्या सुमुखी प्रमाणे पवित्र शीतल तेजोमय भासला . नुकताच नवरात्रोत्सव झाल्याने चंद्रमुखात नवदुर्गेचे सर्व गुण दिसून आले .
कोजागरी चा एक भाग म्हणजे ‘अश्विनी ‘,या दिवशी ज्येष्ठ अपत्याचे औक्षण करून भेटवस्तू दिली जाते ,या परंपरेचा माझ्या शूद्र मती ला उमगलेला अर्थ म्हणजे अति ज्येष्ठानीं ज्येष्ठांना ,ज्येष्ठानीं अनुजांना आपल्या चांगल्या परंपरा व संस्कृती चा ठेवा साखळी रूपाने पुढे नेत राहणे . पुन्हा औक्षण करणे म्हणजे अमूल्य ठेव्याला असुरी शक्तींची नजर लागूनये अन वक्रदृष्टी झालीच तर त्वरित त्याचे भस्म व्हावे . म्हणून निरांजन रूपात अग्नीला साक्षीस ठेवणे . सुसंस्कारांचा ठेवा ओझे नसून अमूल्य संपत्ती आहे ,जितकी वाटाल तेवढी वाढत जाणारी अजर -अमर .
चंद्रमा ,चांदोबा ,चंदामामा ,रजनीश जुन्या वस्त्रा च्या एका धाग्याने कायमचा बंधनात अडकणार निरिच्छ भाऊराया ,मनोदेवता बाह्य नेत्रांना अंधारात वाट दाखवणारा ,चढ -उतार ,खाच खळगे युक्त जीवनप्रवासात अंतः चक्षूंना उन्मिलित करून ,आत्मा -परमात्मा ,शिव -शक्तीच्या पारमोच्च मिलनाचा मार्ग सुकर कर ,हीच तव चरणी नमन पूर्वक प्रार्थना .
आसावरी जोशी .
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०
एकांत एक अनुभूति -मूळ विचार-सचिन चंद्रात्रे .
एकांत एक अनुभूति -मूळ विचार-सचिन चंद्रात्रे .
सृजनाचा जन्म होतो नेहमी एकांतात ,आनंद मात्र साजरा होतो समूहातील लोकात ,
विवेकाने परमार्थमय स्वार्था साठी काहीलोक एकांतात जगतात ,
बहुधा भित्रे विकारी स्वकर्माच्या परिणामाची जवाबदारी स्वतः घेण्यास घाबरतात ,
त्यासाठीच ते विकृत समुहाचा हात धरुन घोळक्याने चालणे पसंत करतात ,
हल्लीचे सामुहिक दंगे धोपे ,मोर्चे ,अत्याचार याच वृत्तीला दर्शवितात ,
ज्या मोजक्याच प्रामाणिक लोकांना विकारी समूहाचे दुर्गुण दिसतात ,
तेच स्वतः मध्ये लपलेल्या सगुणांकडे पाहू शकतात ,
एकल साक्षातकाराच्या अनुभूतीने पुन्हा सगुणाकडून निर्गुणाकडे ओढले जातात ,
मूळ वृक्षारोपण असेल सृजनात्मक शुद्ध -सात्विक-निष्काम-स्वान्तसुखाय ,
तर पाने ,फुले ,फळे असणारच ,पिढया न पिढ्या जनहिताय .
आसावरी जोशी
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०
प्रार्थना -त्वमेव माताच पिता त्वमेव .....
प्रार्थना -त्वमेव माताच पिता त्वमेव .....
तूच माता तूच पिता ,बंधू -भगिनी मित्र ,
विद्या ,कला ,पैसा अडका ,सुख समृद्धी ,तुजविण सारे शून्यमात्र ,
तूच जीवन ,एका मडक्याला बनवीशी ,पूज्य कलश अन अभिषेकाचे पात्र ,
धरणी ,वायु ,आकाश ,अग्नी ,पंचतत्वाना बांधुन ठेवणारे तू सूत्र ,
“पिंडी ते ब्रह्मांडी ,ब्रह्मांडी ते पिंडी ,होई निर्मिती सृष्टीची ,या तत्वांच्या असण्याने एकत्र ,
तूच पंचप्राण ,कर्ता -धर्ता-हर्ता ,भूलोकी सर्वत्र ,
ना थकशी ना कंटाळशी ,कसेरे फिरवितोस ,नचुकता जीवनचक्र अन दिवा -रातीचे सत्र ,
परमेश्वरा दे मजसी दे शक्ती बुद्धी तव स्मरणाची ,अंतर्मनातुनि अहोरात्र .
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
अष्टांगयोगातील एक शुद्धिक्रिया -जलनेती
अष्टांगयोगातील एक शुद्धिक्रिया -जलनेती
मी योगप्रवेश >परिचय >शिक्षक हा अभ्यासक्रम नाशिकच्या योगविद्याधाम येथे २००४ मध्ये एक महिन्याच्या निवासी शिबिराद्वारे पूर्ण केला . शास्त्रीय पण सोप्या पद्धतीने अष्टांग योग शिकवल्या बद्दल सर्व गुरुजनांचे आभार . त्या नंतर ही वेळोवेळी निरामय जीवनाला पूरक असे छोटे छोटे कोर्स केले . इगतपुरीला राहून ‘विपश्यना ’चे प्राथमिक शिक्षण घेतले . आयुष्याच्या आत्ता पर्यंत च्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी कळत न कळत मला सुज्ञान ,संस्कारक्षम ,साकारात्मकतावादी ,सक्षम बनवण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे अन जन्मदात्या मातापित्यांचे आभार . पंचतत्वांनी व्यापलेल्या निसर्गरूपी गुरु चे आभार . मनुष्य जन्म देऊन आज पर्यंत जे सुख -समाधान दिले त्या परमोच्च गुरुदेव परमेश्वराचे आभार आणि सर्वांना शतशः नमन .
अष्टांगयोगातील यम ,नियम ,आसन ,प्राणायाम म्हणजे बहिरंगयोग . धारणा ,ध्यान ,समाधी हा अंतरंगयोग . बहिरंग आणि अंतरंग ला जोडणारा दुवा म्हणजे प्रत्याहार . बहिरंग शरीराला अंतः -बाह्य शुद्ध ठेवायला व निग्रही, समतोल साधणे ,सकारात्मकता शारीरिक आरोग्य चांगले कसे ठेवायचे हे शिकवतात . अंतरंग मन आणि आत्म्याला निरोगी कसे ठेवता येईल हे शिकवतात . अश्या प्रकारे शरीर -मन-आत्म्याचा सुंदर योग जुळून आला की निरामय जीवन जगण्यास मदत होते . योगशास्त्राकडे उपचार पद्धती म्हणून न पहाता ,जीवनशैली म्हणून बघणे उचित ठरेल .
प्रत्येक व्यक्तीने या जीवनशैलीचे अनुकरण केले तर कुटुंब ,समाज ,राष्ट्र आणि ओघाने समस्त सृष्टी निरोगी ठेवण्यास मदत होईल .
संपूर्ण आरोग्यासाठी सामान्यतः योग्य आहार ,व्यायाम ,विश्रान्ती सोबत एका आध्यात्मिक बैठकीची गरज असते . आपण नशीबवान आहोत कि आपल्या संस्कृतीला ही बैठक वेद ,पुराण ,आयुर्वेद ,योगशास्त्र ,रामायण ,महाभारत ,गीता अश्या अनेक अमूल्य ग्रंथातून ,ऋषीमुनी ,संतमहंतांच्या विचारधारेतून वारसाहक्काने मिळाली आहे . त्यावरील धूळ झटकून गाभ्याचा अंगीकार ,संवर्धन ,जतन ,प्रसार करायला हवा . तर्कशास्त्राच्या मदतीने एका पिढीने पुढच्या पिढी पर्यंत या संपत्तीचे हस्तांतरण करीत राहिले पाहिजे . आपली प्राचीन शास्त्रे स्थल -काल अबाधित आहेत . जीवनशैली म्हंटले कि वैयक्तिक पातळीवर दैनिक ,नैमित्तिक ,प्रासंगिक लवचिकतेचे भान ही असायला हवे .
महामुनि पतंजलींना नमन करून मी योगशास्त्रातील जलनेती या शुध्दीक्रियेचे छोटे प्रात्यक्षिक प्रस्तुत करीत आहे .अनेक तज्ज्ञांनी याची महती सांगितलीच आहे . पण सध्या महामारी जन्य परिस्थितीत ,किमान रोज सकाळी एकदा जलनेती केल्याने मला आणि अनेकांना फायदा होत आहे . मी २००ml पिण्याच्या कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालुन एका नाकपुडी साठी वापर करते . पुन्हा तशीच क्रिया दुसऱ्या नाकपुडी साठी करते . जलनेती करण्यापूर्वी आधी ५-१०वेळा कपालभाती करून नासिका मार्ग स्वच्छ करून घेणे जी नाकपुडी (नाडी )चांगली चालत असेल त्या बाजुने सुरुवात करावी . पुन्हा २००ml पाणी घेऊन दुसऱ्या बाजुने ही क्रिया करावी . किंवा कम्फरटेबल वाटेल त्या बाजूने आधी केली तरी हरकत नाही . जलनेती करताना नाकाने श्वास घेऊ नये . तोंड उघडे ठेऊन सहज श्वास घेत रहावे . नेती पूर्ण झाल्यावर पुन्हा ५-१०वेळा कपालभाती करावी . नाकासमोर पाणी टिपण्या साठी एक स्वच्छ रुमाल धरावा . घश्यात पाणी गेले तरी काळजी नसावी . खाकरून टाकावे . डोक्याच्या बाजूला थोडे पाणी गेले असे वाटल्यास ,कपाळावर पुढे ,डावीकडे ,उजवीकडे थपकी मारावी . धन्यवाद !!!
आसावरी जोशी
परिस्तिथी जन्य गुरु कोविड १९/ कोरोना
परिस्तिथी जन्य गुरु कोविड १९/ कोरोना
एका परावलंबी शूद्र व्हायरस ने संपूर्ण मानव जातीची चांगलीच आवळली मान ,
त्याच्या लेखी सर्व देश -जाती-धर्म -रंग-श्रीमंत-गरीब-शिक्षित-अशिक्षित ,समानच ,ना कोणी मोठा ना कोणी लहान ,
स्वावलंबन ,स्वच्छता ,स्वयंशिस्त ,काटकसर, कष्ट याचे कोरोना नामक गुरूने उजळणी रूपात शिकवले ज्ञान ,
वर्ष भरात आले काय नि गेले काय ,कित्येक कार्ये ,उत्सव ,समारंभ ,सण ,वार ,
सनई ,ढोल ,ताशे ,घंटा ,टाळ अश्या ऊर्जा देणाऱ्या नादाऐवजी ,ऍम्ब्युलन्स च्या आवाजाने केले बेजार ,
उलटी गंगा वाहू लागली ,काय म्हणावे या कलियुगाला !!!
पूर्वी पालक म्हणत बालकाला “ठेव तो मोबाईल अन बस अभ्यासाला ”
आता -“घे तो मोबाईल अन बस अभ्यासाला ”असे आईच सांगे मुलाला ,
आप्त मित्रांपासून दोन हात दूरच राहणे म्हणजे होते तुसडे पणाचे लक्षण ,
सध्या तेच वागणे म्हणजे झालाय सभ्य शहाण्या माणसाचा एक गुण ,
सुख दुःखात माणसाने माणुसकी जपत कायम माणसा सोबत असावे ,
महामारीने शिकवले आजारी माणसा पासून दोन मीटर दूरच रहावे ,
बुद्धीच्या जोरावर मानवाने निसर्गावर केली मात , नियमांपेक्षा वरचढ झाले नियमांना पुष्टी देणारे अपवाद
स्वरक्षणा साठी पंचतत्व युक्त पुरूष -प्रकृतीला नाईलाजाने उचलावा लागत आहे हात ,
मानव -निसर्ग ,मन -शरीर ,नवे -जुने ,बुद्धी -भावना मानवता -भौतिकवाद ,सर्वातच साधुया समतोल ,
“अति तेथे माती “शेवटी सुवर्ण मध्यच ठरत असतो अनमोल
आपल्याकडे बाहेरून आल्यावर अन जेवणा पुर्वी हातपाय धुणे हा रक्तातच रुजला होता संस्कार ,
“बिग हग पेक्षा प्रेमाने सुहास्य बघ “ची होती शिकवण ,शेकहॅंड पेक्षा करतच होतो ना नम्रतेने नमस्कार ,
जन्म मृत्यू समयी सोयर सुतक म्हणजे आजच्या क्वारंटाईन चाच होता एक प्रकार ,
रूढी परंपरांचा बडगा नको ,पण समजून घ्यायला हवा त्या मागचा शास्त्रीय आधार ,
“वाचाल तर वाचाल “खरे असले तरी सध्या अनलिमिटेड कॉलिंग वाट्सअँप ,ट्विट वाचन ,कळेना शाप कि वरदान !!!
शेवटी साधन होऊ नये साध्य याचे आपणच ठेवायचे असते भान ,
दो गजकी दूरी ठेवताना ,जमेची बाजू म्हणजे सोशल मीडिया मुळे भावनांचा निचरा करता आल्याने पेलता आले अवघड आव्हान
सर्वोच बुद्धिमान सामाजिक प्राणी ,पैसे -सत्ता -शक्ती असूनही झाला असहाय ,ताका ने भागवावी लागली दुधाची तहान ,
जुनं ते सर्वच सोनं नसेलही ,पण पाश्चात्यांचे अंधानुकरण हा एकमेव नसावा सर्वोत्तम उपचार ,
संकटे येतात तशी जातातही ,त्यांना संधी समजू या अन डॉक्टर ,पोलिस स्वच्छता कर्मचारी ,सर्व समाज सेवकांचे मानूया आभार
काळजी करूया नकोत ,काळजी घेऊ या आपली अन इतरांची , करुयात बंदिवासाचा सदुपयोग अन सकारात्मक विचार ,
शुद्ध निरिच्छ सेवाभाव ,हीच तर खरी विरक्ती -श्रद्धा-भक्ती अन ईश्वरीय साक्षातकार ,
देवा महामारीच्या विळख्यातून लवकर सोडव मानवास ,दे विश्व् बंधुत्व भाव जपण्याची सदबुद्धी , तव चरणी शतशः नमस्कार !!!
आसावरी जोशी