सोमवार, १९ मार्च, २०१८

अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------



     .  अनिरुद्धच्या चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त -काही आठवणी आणि शुभाशिर्वादाची एक कविता -------
            २०जानेवारी १९८०या दिवशी कोणत्याही अडथळ्यांची चिंता न करता जन्माला आलेले आमच्या वंश -वृक्षाचे हे शेंडेफळ . दोन वर्षापेक्षाही कमी अंतर असलेला -आलोकचा जणू पाठिराखाच . आलोक -अनिरुद्धला जुळ्यांप्रमाणेच वाढवलेले आठवतंय मला . 
            तीक्ष्ण बुद्धी आणि इतरांवर छाप पडेल असे व्यक्तिमत्व असलेला . आमच्या कडे पूर्वी पाहुण्यांची बरीच वर्दळ असायची . पुण्याला कोणी शिक्षणासाठी ,कोणी नोकरीसाठी ,कुणी उपचारासाठी तर कुणी सहज पुणे बघण्यासाठी आमच्या घरी येत असत . सहा ते साठ वयाच्या सर्वांशी लाघवी पणाने बोलून आपलेसे करून त्यांना कम्फर्टेबल झोन मधे आणणारा हा माझा मनकवडा मुलगा ,म्हणून कदाचित याला लहानपणी लाडाने आम्ही' मोनू 'म्हणत असू . ताई -दादा चे मित्र -मैत्रिणीनशी याची खास मैत्री . त्यांच्या सर्व वस्तू कुठे असतात ?आई मीठ मोहरी ,डाळ -तांदूळ कुठे ठेवते याची त्याला बारिक माहिती असत . चौकस बुद्धी आणि तीक्ष्ण पंचेंद्रिय असल्याने आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी त्याला माहीत असत . अभ्यास मात्र उडत -उडत करायचा ,त्यामुळे त्याला बरेच वेळेला ,ओरडा बसायचा . पण परिक्षेत मार्क मात्र उत्तम असायचे . शाळेत आदर्श विद्यार्थी ,आणि पालकांनाही आदर्श पालकांचा मान मिळवून देणारा हा आमचा मुलगा !!!!
       अर्चनाताईने लहान भावाचे नाव अनिरुद्ध ठेवायचे असे सांगितले . आणि आम्ही तेच नांव ठेवले . नावाप्रमाणे कोणत्याही रोधकाची पर्वा न करता ,बारावी टेक्निकल ,सी . ओ . ई . पी . मधे प्रॉडक्शन इंजिनियरिंग ,आणि अमेरिकेतील सिनसिनाटीहून एम . एस . होऊन नोकरीत स्थिर -स्थावर झालेले गुणी बाळ ते !!!चारुताचायोग्य जोडीदार  शुभम -मुक्ताचा प्रेमळ बाबा ,मुलगा ,जावई ,भाऊ ,मामा -काका अशी सर्व नाती जवाबदारीने अन प्रेमाने सांभाळणारा . अमेरिकेतून आईला रोज फोन करून हाल -हवाल विचारणाऱ्या या माझ्या मुलाचे माझ्या बऱ्याच नातेवाईकांना आणि मैत्रिणींना कौतुक वाटते

      एक गोड आठवण शेअर कराविशी वाटते ,ती म्हणजे अनिरुद्ध साधारण १०-१२वर्षाचा असताना ,मी घरी नव्हते आणि माझी एक मैत्रिण सहज घरी अली . हा घरी एकटाच होता . त्याने माझ्या मैत्रिणीशी छान गप्पा मारल्या ,फ्रिज मधील एक वडी तिला दिली ,आमची बाग दाखवली ,आणि बागेतील एक सोनटक्याचे फूल ,मरवा -दवणा असे एकत्र करून त्याने माझ्या मैत्रिणीला दिले . मी घरी आल्यावर मैत्रीण भारावून जाऊन माझ्या जवळ त्याचे कौतुक करीत होती . इतरांनी आपल्या मुलांचे कौतुक करावे ,या पेक्षा मोठा आनंद तो काय असू शकेल पालकांना ???
                                                                                             आई 

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

निष्काम कर्म

                                           निष्काम कर्म 
एकदा नदीकाठी निवांत बसले असता निसर्गाच्या निष्काम कर्मा संबंधित अनेक विचार डोक्यात येऊन गेले . नदीचा जन्मदाता पर्वत . त्याला अचल ,नग ,पाषाणाचा बनलेला असे काय काय आपण म्हणतो . मंदबुद्धी माणसाला म्हणतो ,डोक्यात काय दगड -धोंडे भरलेत ?निर्दयी माणसाला पाषाण हृदयी संबोधतो . 
      पर्वत निष्काम कर्म करतो म्हणून काय त्याच्या हृदयातील ओलावा दिसूच नये माणसाला ?घनदाट वनराई अन अनेक जीवांचा पालनकर्ता तो . पर्वताच्या पोटातूनच जीवनदायिनी नदीचा जन्म होतो . कधीही एकत्र येऊ न शकणाऱ्या दोन किनाऱ्यांना कायम सोबत घेऊन ,अविरत प्रवाहित राहणे ,हेच तिचे 'जीवन '  . नदीकाठीच अनेक महान संस्कृती जन्माला आल्या ,सुखावल्या . पाणी म्हणजे नदीचा आत्मा . त्याला 'जीवन '  ऐसे नांव . जीवाच्या जन्म -मृत्यु च्या मधील काळ म्हणजेच 'जीवन '. तसेच डोंगरातून जन्मून ,सागरात विलीन होई पर्यंतच्या प्रवासात पाण्या मुळेच नदीचे अस्तित्व असते ,म्हणून त्याला जीवन ऐसे नांव . 
         समस्त जीवांना जीवनदान देणारी नदी स्वतः कधीच पाणी पीत नाही . पण दुष्काळ समयी बिचाऱ्या नदीलाच निंदायचे !
       नदी -नाले -ओहोळ आपल्या बरोबर जेकाही वाहून आणतील -काष्ठ ,पाषाण ,पंजर ,प्लास्टिक ,त्या सर्वांना सामावुन घेणारा अथांग सागर . ओहोटी -भरती आणि इतर अनेक आंदोलने सागराच्या खाऱ्या जीवनात ,सतत सुरु असूनही ,तो आपली सीमा कधी ओलांडत नाही .  
          अथांग पाण्याचा साठा असून ,ना तहान भागवायला सागराच्या पाण्याचा उपयोग ,ना वापरण्यासाठी उपयोग ,लोकांचे असे कटु बोल पचवून सुद्धा ,इतरांसाठी सर्व खारटपणा स्वतः जवळ ठेवून ,शुद्ध गोड पाणी वाष्प रूपाने ढगांकडे पाठवणार महासागर किती महान आहेना ?
           निष्काम कर्माचा संदेश देणाऱ्या निसर्गातील सर्व गुरूंचा आपण आदर करू या ,मान राखूया . थोडेतरी त्यांचे गुण आत्मसाद करूया . निसर्गाचे संरक्षण -संवर्धनच त्यांची खरी गुरुदक्षिणा होय .

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा .

            आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा . 
                      गुरुवार दिनांक २३फेब्रुवारी १९७८हा दिवस ,माझ्या आयुष्यातील कॅलेंडर मधील ,एक सोनियाचा दिन . म्हणून कदाचित आम्ही आलोकल  लहानपणी सोनू म्हणायचो . आलोक लहानपणापासूनच शांत ,स्वावलंबी ,मोठ्यांचा मान राखणारा ,लहानांना प्रेमाने मदत करणारा ,निश्चयी ,मितभाषी पण मिष्किल ,मोजके पण जिवलग मित्र असलेला . व्यवस्थित जेऊन सुद्धा शरीरयष्टी मात्र फारच किरकोळ . अर्चना -आलोक -अनिरुद्ध ही भावंडे फारशी भांडलेली मला आठवत नाही . एक गम्मत सांगाविशी वाटते ,लहानपणी तो अंक आणि अक्षरे उलटी लिहायचा ,मिरर इमेज सारखी . तीन ला सहा आणि सहाला तीन तर हमखास . तोच प्रकार कुलुप -किल्ली च्या बाबतीत . पण प्राथमिक शाळेत पहिला -दुसरा क्रमांक सोडला नाही . कधी चारू पहिला तर कधी आलोक पहिला . 
            चिकाटी आणि हार्डवर्क च्या जोरावर बारावी बोर्डात नंबर आला आणि इंजिनिअरिंग ,एम . एस . ,पीएच . डी . असे टप्पे पूर्ण केले . पर्ड्यूला कोराफासच्या अवॉर्ड साठी नॉमिनेशन झाले तेव्हा आणि पीएच . डी . ग्रॅज्युएशन सेरेमनी चा वॉक पाहताना अभिमानाने ऊर भरून आले . पुढे नोकरी ,लग्न ,बाबा म्हणून ही प्रमोशन मिळाले . 
            आता आलोक -अनन्या -अर्चित पुण्यात आल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झालाय . 
 चाळीशी म्हणजे काय ?जणु अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
  आमच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या ,पाठीशी असावे . 
                                                                                                           Aai

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

व्हॅलेंटाईन डे

                         फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात . प्रेमाच्या अनेक रंगछटा आपल्याला पहायला मिळतात . गडद -फिक्या ,प्रकट -सुप्त ,एकांगी -द्विअंगी ,त्रिकोनी ,स्वार्थी -निस्वार्थी ,सफल -असफल इत्यादि . सामान्यांपेक्षा प्रेमात दुःखांताला सामोरी जाणारी अनेक प्रेमी -युगले ,अजरामर झालेली आपल्याला माहित आहेत . त्यातीलच एक म्हणजे शमा -परवाना ही जोडी . प्रेयसीचे प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःला संपवून अमर झालेला परवाना चांगलाच भाव खाऊन जातो . सोशिक -कर्तव्यनिष्ठ वृत्ती मुळे ,शमा जरा दुर्लक्षित -उपेक्षितच राहिलीशी वाटते . मला अश्यांबद्दल विशेष आस्था आहे ,कदाचित म्हणून शमाने एकदा आपली व्यथा ,माझ्या जवळ व्यक्त केली आणि तीच मी आपल्या समोर पेश करीत आहे . 
             मराठी माझी मातृभाषा ,हिंदी मैत्रभाषा -राष्ट्रभाषा आणि अध्ययनाचे माध्यम ,त्यामुळे कधी मराठीतून विचारांशी संवाद होतो तर कधी हिंदीतून . सहज सुसंवाद महत्वाचा !!!!
               व्हॅलेंटाईनडे ला शमा -परवाना या युगलाला निवांत हवा असल्याने ,ते उद्याच आपल्या भेटीला येत आहेत . 

                                                                                       आसावरी जोशी 

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

शतकपूर्ती एकच्या नोटेची

                 शतकपूर्ती एकच्या नोटेची 
२०१७च्या नोव्हेंबर तीस ला ,एक रूपयाच्या नोटेने ओलांडली वयाची शंभरी ,
त्याच्या लहानपणी ,दूध -किराणा -भाजी ,असे खर्च भागवी 'तो 'दरमहाचे कितीतरी ,
चाऊ -म्याऊ -खाऊ देई ,सिनेमा -जत्रा -मौज -मज्जा ,लाड पुरवी उदार अंतरी ,
असो राखी -बीज ,वाढदिवस ,मुंज ,लग्न ,सण -समारंभ ,तोरा मिरवी एक नंबरी ,
दोन अधेल्या ,चार पावल्या ,सोळा आणे ,शंभर पैसे, नावे सुंदर सगळी अर्थभरी ,
कमवायलाही तितुकेच कष्ट ,मूर्ति लहान कीर्ति महान ,कहाणी त्याची सफळ संपूर्ण साठाउत्तरी . 

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

'एक 'नंबर आठवणी

                  'एक 'नंबर आठवणी 
   शंभर पैसे किंमत असलेल्या एक रुपयाने शंभरी गाठली ,तरी त्याला आजही मानाचे स्थान आहे . १९६०च्या आसपासचा काळ ,आम्ही राजस्थान /मध्यप्रदेश च्या सीमारेषे वरील भवानीमंडी -भैसोदामंडी या जुळ्या खेड्यात रहात होतो . 
      घरून मिळालेल्या एक रुपयात ,गावच्या मेळ्यामध्ये आम्ही मैत्रिणींनी मिळून खूप मज्जा केलेली आहे . बोरे ,ओले शिंगाडे ,लिमलेट आणि एक्सट्रास्ट्रॉंग च्या गोळ्या दहा -दहा पैश्यात मिळत ,तसेच जत्रा म्हंटलेकी रहाटपाळणा ,चक्र यात बसणे ,मौत का कुआ नामक भारी प्रकार बघणे ,आनंदप्रद असे . पैसे उरले तर बांगड्या ,रिबन घेतली जाई . 
            मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडे आणि आमचे मित्र -मैत्रिणी स्वखुशीने शेंगा सोलायचे काम करीत असू . वडिलांचा शेती -बागायतीचा व्यवसाय असल्याने ,त्यांना शेंगांच्या पेरणी साठी बियाणे म्हणून हाती सोललेले दाणे लागत . वडील आम्हाला एक किलो दाणे सोलले की दहा पैसे मोबदला देत ,शिवाय दाणे खायला बंधन नव्हते . दोन -तीन दिवसात एक रुपया जमत असे प्रत्येका कडे  . त्यातून बर्फाचा रंगी -बेरंगी -गोड गोळा ,कुल्फी ,गाभुळलेली चिंच इ . विकत घेऊन खात असू . चाळीस पैश्याचे मागचे तिकीट काढून एखादा सामाजिक /धार्मिक सिनेमा बघण्याची चैन पण त्यात भागत असे . सर्वांचे उरलेले पैसे एकत्र करून एखाद रुपयाची छोटी गोष्टीची पुस्तके विकत आणून रोटेशन मधे पुस्तके वाचण्याचा आनंद ही काही औरच होता . 
                    आसावरी जोशी ,कर्वेनगर पुणे ४११०५२
                    मोबाईल नंबर -९६८९३९०८०२

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली . 

   दत्तजयंती च्या निमित्ताने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण नऊ -दहा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली

उतरणाऱ्या लोकांची वर्दळ हळू हळू कमी व्हायला लागली होती . डोलीवाले सरावा मुळे भराभर उतरत होते . आम्हीपण उतरताना जलद गतीने उतरत होतो . पण पाय थकले होते आणि उतारावर तोल सांभाळणे अवघड जात होते . अश्या वेळेस काठीचा चांगला उपयोग झाला . तरी जाताना लागला त्यापेक्षा निम्म्या वेळेत नऊ हजाराच्या वर पायऱ्या उतरून आलो होतो . दिवस लहान असल्याने लवकर अंधार झाला . पायऱ्या दिसेनाश्या झाल्या . आजूबाजूच्या झाडातून सरसर आवाज ऐकू येऊ लागले . पायऱ्यांचे दगड गुळगुळीत झालेले ,पायताणे पण झिजलेली ,दोन-तीन वेळा पडता पडता राहिलो . आमची गती खूपच मंदावली होती . आम्ही ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ वयोगटातील होतो . मनात एक अनामिक भिती होती . आमच्या तिघांशिवाय आता कोणीच यात्रेकरू दिसत नव्हते . प्रवासाच्या तयारीत घेतलेली बॅटरी हॉटेल वर राहिली होती . सहकाऱ्यांना फोन करावा तर फोनला रेंज मिळत नव्हती . तेवढ्यात महाविद्यालयीन मुला -मुलींचा एक ग्रुप आम्हाला वर चढताना दिसला . काय करावे कळेना ,या मुलांकडे मदत मागावी का ?ते मदत करतील का ?अश्या अनेक शंका मनात आल्या ,पण दुसरा    काहीच पर्याय नसल्याने त्यांना भैया म्हणून हाकमारले आणि आमची अडचण त्यांना सांगितली . ते म्हणाले आम्ही खाली हॉटेलमध्ये  उतरलोय ,जेवायला थोडा वेळ होता म्हणून विचार केला थोडे  फिरून यावे कारण सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत . आम्ही त्यांना विनंती केली कि पायथ्या पर्यंत उतरायला आमच्या सोबत येता का ?ती मुले क्षणाचाही वेळ न लावता लगेच तयार झाली . जणू त्या साठीच ते सगळे तिकडे आले होते . एकेकाने आमच्या पैकी प्रत्येकाचा हात धरला बाकीच्यांनी सेलफोन ची बॅटरी सुरु केली आणि म्हणाले ,आम्ही तुम्हाला तुमच्या हॉटेल पर्यंत सोडल्या शिवाय जाणार नाही . बोलता बोलता पायथा केव्हा आला ते कळलेच नाही . आमचा ग्रुप आमची वाट पहात पायथ्याशी थांबला होता . 
        गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .

Asawari Joshi
1 Chintamani, Karvenagar, Pune 411052
Cellphone: 9689390802

Sent from my iPad