मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

****ati lagu


नवीन वर्षाच्या निमित्ताने एका जुन्या नेमाचीच उजळणी करुयात . जमेल तेवढ्यांच्या सुख -दुःखात संवेदनशील राहून सहभागी होवू या . फक्त सोशल मीडिया द्वारे आभासी नव्हे तर ,निःस्वार्थपणे  कधी एकमेकांना भेटून तर कधी फोनवर बोलून संपर्कात राहूया ,मदत करूयात . त्याच बरोबर कुणाला गृहित धरून गैरफायदा ही घ्यायचा नाही अन घेऊ द्यायचा नाही ही काळजी पण घ्यायला हवी . मदती वरून काही ओळी सुचल्या त्या मांडत आहे . 

***अटी लागू ,
हल्ली माणसे आपली दुःखे शेअर करीत नाहीत ,आणि मदत मागत नाहीत ,अशी असते तक्रार ,
एक कारण -पैसा झाला मुबलक ,तो फेकला की दिमतीला माणसे मिळतात हजार ,
मग मदतीची भीक घेऊ कशाला ?कशाला हवेत कुणाचे उपकार ?
पण मग पाषाणातील झरे अन बाटली बंद पाणी यात फरक काय तो उरणार ?
दुसरी बाजू मदत करणाऱ्यांची ,त्याचाही दुष्काळ भासू लागलाय फार ,
अनकंडिशनल लव्ह ,हेल्प ,जाऊन बसलय ,कुठे तरी तडीपार !!!
कुणी नावासाठी तर कुणी कर वाचवण्या साठी ,कर -सेवा करणार ,
कुणी *अटी लागू असे दिसणार नाही इतक्या बारिक अक्षरात लिहून ,साध्या -भोळ्यांना लुटणार ,
बेमालूम पणे ,आवळा देऊन कोहळा उकळणाऱ्यांचाही असतो एक प्रकार ,
कमी उरलेत ,दुसऱ्यांच्या अडचणीत ,धावून जाणारे दयाळू -दानशूर -उदार ,
तरी शेवटी जग चालले आहे ,चांगल्यांच्याच बळावर ,मग ते असोत दोन -चार ,
गोड लागले म्हणून मुळापासून खाल्ले तर ,पुन्हा ऊस कसा उगवणार ?
दान देताना एका हाताचे ,दुसऱ्या हाताला कळु नये ,हा केवढा मोठा विचार !
मदत मागावी गरजे पेक्षा कमी ,मदत करावी क्षमते पेक्षा जास्त ,असे असावेत  सुंदर संस्कार !!!
     
घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच व्हावे
दोन्ही हाताने घेताना व्याजाचे गणित पक्के असावे ,
दातृत्वाच्या कडीने वाढत -वाढत साखळी व्हावे ,
समाजात देणारे जास्त ,घेणारे नाममात्र उरावे .
                                                     Asawari joshi

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

संक्रांतीचे वाण

              संक्रांतीचे वाण 
आला सण संक्रांतीचा ,केली वाणाची तयारी ,
मुखशुद्धी ,पूजा ,औक्षण ,शुभ शकुन अन गणरायाचे प्रतीक म्हणून ,मान मिरवी सुपारी ,
सोबत एक  सदिच्छा सुख - शांती -समृद्धी साठी ,नववास्तूत प्रवेशाची ,घ्यावी आपण भरारी 
आपल्या मदतीस हजर मी अर्चना परांजपे ,पुरी होवो इच्छा सोनेरी ,
आमच्या सेवेचा लाभ घ्यावा निःसंकोच ,नमस्कार ,धन्यवाद  आमची टीम राहील आपली  आभारी .

रविवार, २ डिसेंबर, २०१८

. अक्षय योजना

        .                 अक्षय  योजना 
अक्षय बचत योजनेचा किती गावा गोडवा !!!!!
क्षमतेनुसार वेळ -विवेकबुद्धी -कष्ट -पैसा निरिच्छ पणे गुंतवावा ,
ना वयाचे ,ना अर्थाचे ,ना ओळखपत्राचे बंधन ,परमार्थ योजनेचा लाभ ,संस्कारानेच कळावा ,
ना बंद पडण्याची ,ना चोरीची भिती ,योग्यवेळी मिळणारच असतो परतावा ,
श्रद्धा -सबुरी -भक्ती -विश्वास मात्र मनापासून जपावा ,
असंख्य वही खात्यांचा हिशोब "तो "एकटा कसा बरे ठेवत असावा ?
याच्या शाखा त्रिलोकी  २४x ७सुरु  ,एकही सुट्टीचा वार नसावा ?
संकट समयी ,कधी ओळखीचा तर कधी अनोळखी चेहरा' दत्त 'म्हणून उभा ठाकावा !!!
याचा अनुभव ,ज्याने -त्याने अपापल्या परीनेच ,लागतो घ्यावा ,
योजना तशी खूप जुनीच ,पण उजाळया साठी ,अधून -मधून एखादा संत -सदगुरु लागतो जन्मावा ,
तव चरणी शतशः प्रणाम ,परमेश्वरा तुझा आशिर्वादाचा हात ,सदा आमच्या शिरी असावा !!! 

सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

तू तू -मै मै

     तू तू -मै मै 
कॉम्पुटर म्हणे मी महान ,चौफेर माहिती चा जणू मी खजिना ,
जसे लॉकर मधे ठेवता ,पैसा -अडका ,कागद -पत्रे ,दाग -दागिना ,
नेट प्रोव्हायडर म्हणे ,माहितीचे असुदे तुजपाशी भांडार ,
पण त्याची 'मास्टर की 'मजपाशी ,तुम्हास देतो होऊनि उदार ,माना माझे आभार!!
वीज म्हणे ,ऊर्जा देते ,दृष्टी देते ,वाट दाखवते ,भेदण्यासाठी अज्ञानाचा अंधार ,
मानव म्हणे मी सर्वात महान ,माझ्या बुद्धी शिवाय सबकुछ बेकार ,
यंत्र मानव पुटपुटला ,मी आहे ना !!अरे तुला पण केलाय मानवानेच तर तयार !!
गुरु वदला ,अरे लहान -मोठ्या पाची बोटांची मूठ वळली तरच ,ताकत होते कैक पटीने तयार ,
भांडू नका ,एकमेकासी सहाय करा ,तरच मिळेल मान ,अन होईल सर्वांचाच उद्धार .

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

बैल पोळा

                              बैल पोळा 
वसु बारस असो वा नागपंचमी ,श्रावण मास सरता सरता आला बैलपोळा ,
पशुधनाला ,मित्र प्राण्यांना आदर देण्या ,सण समर्पित ,एक -एक आगळा -वेगळा ,
पूर्वजांनी निर्मित केले कित्येक सण -वार ,त्यांना बैठक होती आणे सोळा ,
फूल ना फुलाची पाकळी अर्पून ,आपण प्रेम ,परोपकार ,मैत्रभाव ,अन नातेसंबंधांना देत राहू दरवर्षी उजाळा ,
गोड -धोड ,गाठी भेटी ,वस्त्रालंकार ,साज -सजावटीची देऊन जोड ,अविस्मरणीय होतो ,कृतज्ञेचा सोहळा ,
कोजागिरीला चंद्र चांदणी ,श्रावणीला सागर भरणी ,संक्रांतीला सूर्याची मनधरणी ,भाव खातो रंगही काळा ,
मनसोक्त काहीही खायचे प्यायचे म्हणून ,साजरी होते अमावस्या गटारी ,
पण चातुर्मासाची किंवा सणा मागची बंधने पाळायची ,नसते आपली तयारी ,
सोईस्करपणे कर्म -कांड ,बुरसटलेले विचार ,अंधश्रद्धा यांना ढाल बनवून ,उगारायच्या तलवारी ,
ग्रह -तारे ,मृत -जीवित ,पशु पक्षी प्राणी ,वृक्ष -वेली ,निसर्गादीला जपण्या साठी ,त्यांना दिले देवाचे स्थान ,
जड -चेतन ,सूक्ष्म -स्थूल ,दृश्य -अदृश्य ,गुरु -लघु ,लौकिक -अलौकिक यांचे ,पूर्वजांना होते अफाट ज्ञान ,
मानवता ,कुटुंब ,समाज ,राष्ट्र अन विश्वाच्या कल्याणा साठी झटणाऱ्या ,महामानवांना काही तिथी -जयंती समर्पित ,
आपल्या संस्कृतीचे करू किती गुणगान ?तेतर वाटे मज शब्दातीत ,आहेच तेतर शब्दातीत ...... 


रविवार, २ सप्टेंबर, २०१८

हात

                      हात 
नवजाताला कुशीत घेणारे आईचे हात ,
आईचा पदर आशेने घट्ट धरणारे बाळाचे हात ,
बाळाला भरवणारे ,हाताला धरून चालायला शिकवणारे ,
हातात पेन्सिल धरायला शिकवणारे ,दमल्या बाळाला कडे घेणारे ,
कौतुकाने गालगुच्य घेणारे ,शाबासकीची थापदेणारे  ,वेळ पडली तर गालावर चापटपोळी ही देणारे ,
दोनचे चार हात झाल्यावर ,जोडीदाराच्या हातात हात सोपविणारे मुलांच्या पालकांचे हातच ,
कर्तृत्व बजावणारे ,दातृत्वाचा वसा घेणारे ,मदतीला धावून जाणारे हातच ,
षडरिपूंच्या आहारी जाऊन ,हात ओले करणारे ,हात धुवून घेणारे ,हातघाईला येणारे ,कुकर्म करणाऱ्याचें व्यर्थ जाई जीवन ,
देशासाठी शीर हातात घेणाऱ्या ,वीरांना मात्र शतदा करूया नमन ,
देवाजींनी दिलेले एक कर्मेंद्रिय ,निरिच्छ सत्कर्मा साठी भाग्यवंतालाच लाभते मोठे मन ,
जगताच्या कल्याणासाठी ,फेर धरुया प्रेमाने ,घेऊन हातात हात ,
जन्मापासून पंचभूतात विलीन होईपर्यंत  ,लागतातच मदतीचे हात ,
देवा !!सन्मती -सदगती येण्यासाठी ,असुदे आमच्या शिरी ,सदैव तुझा आशिर्वादाचा हात . 


शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

मैत्र

                                मैत्र 
मैत्र असावे बर्फासम उबेने वितळणारे ,नितळ आणि पारदर्शी ,
वायुसम शीतल ,प्रवाही ,ना कुम्पण ना वेशी ,
एका हाकेला प्रतिध्वनी सारखे धावत येशी ,
धरणीसम क्षमाशील ,आश्वासक ,जणू विसावा देणारी हाताची उशी ,
चंद्र -सूर्य -ग्रह -तारे ,विभिन्न प्रकार -प्रकृती राहती ,जसे अनंत -आकाशी ,
सागरासम अथांग ,ओहटी असो वा भरती ,आधार देई किनाऱ्याची कुशी ,
मैत्र भावनेची दिली जोड ,तर प्रत्येक नाते होई सुगंधित -सोनेरी -बावनकशी !!!!!