शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )


   दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )
एकवीस फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन . एखादा दिन विशेष आला की त्या विषयावर अनेक माध्यमातून लोक आपले विचार मांडत असतात ,मी एका त्रयस्थ या दृष्टिकोनातून मातृभाषे विषयी माझे विचार मांडत आहे ,अर्थात माझी मातृभाषा मराठी असल्याने मी तिला प्रतिनिधी केले आहे . 
 माझा जन्म महाराष्ट्रात झाला (आजोळी ),आई -वडील मराठी म्हणून माझी मातृभाषा मराठी .  वडिलांच्या शेती -बागायती व्यवसायामुळे बालपण ते लग्न होई पर्यंत चा काळ भवानीमंडी -भैंसोदामंडी अश्या राजस्थान -मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर असणाऱ्या हिंदी भाषिक जोडगावात गेला . त्यामुळे व्यवहार भाषा कोसा कोसावर बदलणारी हिंदी भाषा ,तर शिक्षणाचे माध्यम प्रमाण हिंदीभाषा होते . गावात दोन -चार घरे मराठी होती ,त्यापैकी कुणी इंदुरी मराठी ,कुणी देशावरील तर कुणी कोकणी मराठी बोलत . आमच्या घरात आजी -आजोबा ,आई -वडील ,आत्या हे सर्व मात्र पुणे मुंबईचे प्रमाण मराठी बोलत . आम्ही पाच भावंडे ,शाळा व इतर कारणाने दहा बारा तास घराबाहेर असल्याने बरेचवेळा घरात ही आपापसात हिंदी बोलायला लागायचो . पण आई -वडील त्या बाबतीत कडक शिस्तीचे होते . घरात सर्वांनी एकमेकांशी मराठीतच बोलायचे अशी सक्तीच होतीम्हणा  ना !याचा आम्हाला कधी कधी रागही यायचा . पण आज आम्ही मान्य करतो कि आई वडिलांच्या या आग्रही धोरणाचा पुढील आयुष्यात खूप फायदाच झाला . पुढे मुले मोठी झाल्यावर शेती व्यवसायात रमणार नसून ,नोकरी -व्यवसाय किंवा विवाहोत्तर आयुष्य महाराष्ट्रात घालवणार असल्याचे ,त्यांच्या दूरदृष्टीने हेरले होते . बोलीभाषे व्यतिरिक्त मातृभाषेचे ज्ञान वाढावे म्हणून वडिलांनी पुणे मुंबई निघणारे मराठी वर्तमानपत्र ही लावले होते . पोस्टाने ते दोन तीन दिवस उशीरा येत असे . पण इथे ताज्या बातम्यांपेक्षा दैनिकातील भाषा डोळ्याखालून जाणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते . मराठी—हिंदी लिपी सारखीच असल्याने फावल्या वेळेत थोडे  मराठी चाळले जायचे . किंवा मोठी माणसे त्यातील कथा आणि मनोरंजनात्मक सदरे वाचून दाखवत . त्यामुळे आम्ही भावंडे कोणत्याही क्लास किंवा परिक्षे शिवाय ,आज ओघवती मराठी बोलू ,वाचू ,लिहू शकतो महाराष्ट्रा पासून दूर राहून सुद्धा ,मराठी साहित्य ,सिनेमा ,नाटक ,लेखक ,कवि यांची निदान तोंडओळख तरी झाली . त्यामुळे पुण्यात बी . एड . करताना ,मराठी माध्यम असून चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले . 
सांगायचा मुद्दा असा की जेंव्हा मातृभाषा आणि शिक्षणाची माध्यम भाषा किंवा व्यवहार भाषा वेगळी असते तेंव्हा पालकांनी तसेच कुटुंबातील मोठ्यांनी ,थोडे सक्तीने, थोडे गोडीगुलाबीने आणि थोडे वातावरण निर्मितीने मुलांना मातृभाषेची गोडी लावायला       
हवी .

   भारतात हल्ली बहुतेकांना तीन -चार भाषा अवगत असतात . मातृभाषा ,राज्यभाषा (१-२),राष्ट्रभाषा आणि अंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी . इंग्लिश आल्याशिवाय बाल्याची प्रगती होणार नाही अशी ठाम समजुत असल्याने किंवा मातृभाषेच्या चांगल्या शाळा उपलब्ध नसल्याने ,इंग्रजी माध्यम शाळेत घालण्याचे प्रमाण हल्ली  खूपच वाढले आहे . दुसऱ्या बाजुला पुरेशी विध्यार्थी संख्या नसल्याने मातृभाषेतील काही शाळा बंद कराव्या लागल्या असे समजते . 
    बहुभाषिक असणे चांगलेच ,त्यातील एक मातृभाषा असावी . किमान एका भाषेवर प्रभुत्व असावे ,बाकी भाषा किमान लिहिता -वाचता—बोलता आल्या तरी चालते . मनातील भावनांचे ,विचारांचे आदान -प्रदान महत्वाचे. समोरच्याच्या भाषेत आपण संवाद साधला तर आत्मीयता वाढीस लागण्यास मदतच होते . 
    पहिली वीस -बावीस वर्षे सोडली तर ,पुढील चाळीस -पंचेचाळीस वर्षे पुण्यातच गेली . त्यामुळे तीनही मुलांना आवर्जून मराठी शाळेतच घातले . कारण मराठी मातृ-राज्य—व्यवहार भाषा होती आणि त्या वेळेस चांगल्या मराठी शाळाही उपलब्ध होत्या . पुढे मुले हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत ही शिकली . मराठी माध्यमामुळे मुलांना इंजिनियरिंग च्या शिक्षणात किंवा अमेरिकेतील उच्चशिक्षण ,नोकरी ,व्यवसायात कोणतीही अडचण अली नाही . 
   आता नातवंडांच्या वेळेस त्यांना मराठी शाळेतच घालावे असा अट्टहास करणे योग्य नव्हे . स्थळ -काळ—वेळ -परिस्थिती प्रमाणे प्रत्येक प्रश्नांची उकल वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते . दूरसंचार व वाहतुकीच्या साधनांमध्ये क्रांतिकारक बदला सारख्या कारणांमुळे जगातील अंतरे कमी झाली आहेत . एका राज्यातून दुसऱ्या राज्यातच काय पण एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणेही सोपे झाले आहे ,त्यामुळे आंतराष्ट्रीय प्रमाण भाषेला खूप महत्व आले आहे . घरात आई -बाबा दोघांची मातृभाषा वेगवेगळी असली तर बरेच वेळा घरात इंग्लिश बोलले जाते ,तर काही वेळा फॅशन म्हणून इंग्लिश बोलले जाते . आई -बाबा दोघे नोकरी करणारे असल्याने काही मुले घरापेक्षा जास्तवेळ शाळा—पाळणाघर येथे असतात ,मग मुले जी भाषा ऐकतात तीच बोलणार नां !एक गमतीशीर किस्सा सांगावासा वाटतो -एका नोकरी करणाऱ्या मराठी कुटुंबात मुलीला सांभाळायला एक पंजाबी आया होती ,तर ती मुलगी आयांच्या सहवासामुळे आधी पंजाबी ,शाळेत जाऊ लागल्यावर इंग्रजी आणि काही वर्षानंतर थोडे मराठी बोलायला शिकली . मुलीच्या दृष्टीने विचारांची देवाण -घेवाण महत्वाची आणि नैसर्गिक ही होती .
 एकदा शिकलेली भाषा माणूस कधी पूर्ण विसरत नाही असे म्हणतात . तरी बोली भाषेत सरावाला खूप महत्व आहे . लहानपणी मी हिंदी भाषिक राज्यात राहायल्याने आधी हिंदीत विचार करून मग मराठी बोलले जायचे ,आता चार -पाच दशके महाराष्ट्रात ,तेही पुण्यनगरीत राहिल्याने ,हिंदी लिटरेचर मध्ये एम . ए . असूनही थोडे आठवून आठवून हिंदी बोलले जाते . 
   आपली संस्कृती जाणून घ्यायला मातृभाषेची खूप मदत होते . घरातील लोकांशी सुसंवाद साधणे सोपे जाते ,सुसंवादाने अनेक छोटे -मोठे प्रश्न सुटतात . त्याचा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला उपयोग होतो . एखाद्या भाषे बद्दल प्रेम अवश्य असावे पण अहं किंवा न्यूनगंड नसावा . त्याचप्रमाणे इतरांच्या भाषेला कमी न लेखता तिचा आदर करणे ही आपले कर्तव्य आहे . आदर्श पिढी घडवायची असेल तर मोठ्यांनी आदर्श वर्तन करणे अपरिहार्य आहे . 
  परदेशात राहणाऱ्या माझ्या मुलांची मुले म्हणजे माझी नातवंडे मातृभाषा मराठीत संवाद साधु लागली की माझे ऊर अभिमानाने-आनंदाने भरुन येते . हे मी प्रामाणिक पणे मान्य करून ,एक पाल्य -पालक आणि आजी म्हणून आलेले अनुभव सर्व वाचकांना समर्पित करते . 
                                     आसावरी जोशी 
                               १चिंतामणी अपार्टमेंट ,मधुबन कॉलनी कर्वेनगर ,पुणे -४११०५२
                              सेल -९६८९३९०८०२
                             ई-मेल -asawari51 @gmail . com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा