शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

शतकपूर्ती एकच्या नोटेची

                 शतकपूर्ती एकच्या नोटेची 
२०१७च्या नोव्हेंबर तीस ला ,एक रूपयाच्या नोटेने ओलांडली वयाची शंभरी ,
त्याच्या लहानपणी ,दूध -किराणा -भाजी ,असे खर्च भागवी 'तो 'दरमहाचे कितीतरी ,
चाऊ -म्याऊ -खाऊ देई ,सिनेमा -जत्रा -मौज -मज्जा ,लाड पुरवी उदार अंतरी ,
असो राखी -बीज ,वाढदिवस ,मुंज ,लग्न ,सण -समारंभ ,तोरा मिरवी एक नंबरी ,
दोन अधेल्या ,चार पावल्या ,सोळा आणे ,शंभर पैसे, नावे सुंदर सगळी अर्थभरी ,
कमवायलाही तितुकेच कष्ट ,मूर्ति लहान कीर्ति महान ,कहाणी त्याची सफळ संपूर्ण साठाउत्तरी . 

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

'एक 'नंबर आठवणी

                  'एक 'नंबर आठवणी 
   शंभर पैसे किंमत असलेल्या एक रुपयाने शंभरी गाठली ,तरी त्याला आजही मानाचे स्थान आहे . १९६०च्या आसपासचा काळ ,आम्ही राजस्थान /मध्यप्रदेश च्या सीमारेषे वरील भवानीमंडी -भैसोदामंडी या जुळ्या खेड्यात रहात होतो . 
      घरून मिळालेल्या एक रुपयात ,गावच्या मेळ्यामध्ये आम्ही मैत्रिणींनी मिळून खूप मज्जा केलेली आहे . बोरे ,ओले शिंगाडे ,लिमलेट आणि एक्सट्रास्ट्रॉंग च्या गोळ्या दहा -दहा पैश्यात मिळत ,तसेच जत्रा म्हंटलेकी रहाटपाळणा ,चक्र यात बसणे ,मौत का कुआ नामक भारी प्रकार बघणे ,आनंदप्रद असे . पैसे उरले तर बांगड्या ,रिबन घेतली जाई . 
            मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडे आणि आमचे मित्र -मैत्रिणी स्वखुशीने शेंगा सोलायचे काम करीत असू . वडिलांचा शेती -बागायतीचा व्यवसाय असल्याने ,त्यांना शेंगांच्या पेरणी साठी बियाणे म्हणून हाती सोललेले दाणे लागत . वडील आम्हाला एक किलो दाणे सोलले की दहा पैसे मोबदला देत ,शिवाय दाणे खायला बंधन नव्हते . दोन -तीन दिवसात एक रुपया जमत असे प्रत्येका कडे  . त्यातून बर्फाचा रंगी -बेरंगी -गोड गोळा ,कुल्फी ,गाभुळलेली चिंच इ . विकत घेऊन खात असू . चाळीस पैश्याचे मागचे तिकीट काढून एखादा सामाजिक /धार्मिक सिनेमा बघण्याची चैन पण त्यात भागत असे . सर्वांचे उरलेले पैसे एकत्र करून एखाद रुपयाची छोटी गोष्टीची पुस्तके विकत आणून रोटेशन मधे पुस्तके वाचण्याचा आनंद ही काही औरच होता . 
                    आसावरी जोशी ,कर्वेनगर पुणे ४११०५२
                    मोबाईल नंबर -९६८९३९०८०२

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली . 

   दत्तजयंती च्या निमित्ताने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण नऊ -दहा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली

उतरणाऱ्या लोकांची वर्दळ हळू हळू कमी व्हायला लागली होती . डोलीवाले सरावा मुळे भराभर उतरत होते . आम्हीपण उतरताना जलद गतीने उतरत होतो . पण पाय थकले होते आणि उतारावर तोल सांभाळणे अवघड जात होते . अश्या वेळेस काठीचा चांगला उपयोग झाला . तरी जाताना लागला त्यापेक्षा निम्म्या वेळेत नऊ हजाराच्या वर पायऱ्या उतरून आलो होतो . दिवस लहान असल्याने लवकर अंधार झाला . पायऱ्या दिसेनाश्या झाल्या . आजूबाजूच्या झाडातून सरसर आवाज ऐकू येऊ लागले . पायऱ्यांचे दगड गुळगुळीत झालेले ,पायताणे पण झिजलेली ,दोन-तीन वेळा पडता पडता राहिलो . आमची गती खूपच मंदावली होती . आम्ही ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ वयोगटातील होतो . मनात एक अनामिक भिती होती . आमच्या तिघांशिवाय आता कोणीच यात्रेकरू दिसत नव्हते . प्रवासाच्या तयारीत घेतलेली बॅटरी हॉटेल वर राहिली होती . सहकाऱ्यांना फोन करावा तर फोनला रेंज मिळत नव्हती . तेवढ्यात महाविद्यालयीन मुला -मुलींचा एक ग्रुप आम्हाला वर चढताना दिसला . काय करावे कळेना ,या मुलांकडे मदत मागावी का ?ते मदत करतील का ?अश्या अनेक शंका मनात आल्या ,पण दुसरा    काहीच पर्याय नसल्याने त्यांना भैया म्हणून हाकमारले आणि आमची अडचण त्यांना सांगितली . ते म्हणाले आम्ही खाली हॉटेलमध्ये  उतरलोय ,जेवायला थोडा वेळ होता म्हणून विचार केला थोडे  फिरून यावे कारण सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत . आम्ही त्यांना विनंती केली कि पायथ्या पर्यंत उतरायला आमच्या सोबत येता का ?ती मुले क्षणाचाही वेळ न लावता लगेच तयार झाली . जणू त्या साठीच ते सगळे तिकडे आले होते . एकेकाने आमच्या पैकी प्रत्येकाचा हात धरला बाकीच्यांनी सेलफोन ची बॅटरी सुरु केली आणि म्हणाले ,आम्ही तुम्हाला तुमच्या हॉटेल पर्यंत सोडल्या शिवाय जाणार नाही . बोलता बोलता पायथा केव्हा आला ते कळलेच नाही . आमचा ग्रुप आमची वाट पहात पायथ्याशी थांबला होता . 
        गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .

Asawari Joshi
1 Chintamani, Karvenagar, Pune 411052
Cellphone: 9689390802

Sent from my iPad

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

साठी -एक महत्वाचा टप्पा

                            साठी -एक महत्वाचा टप्पा 
काय कमवले ,काय गमवले ,काय राहिले !चा टप्पा असतो 'साठी ',
नैसर्गिक विस्मरणाला नको देऊ या नांव -"साठी बुद्धी नाठी "
चूक -भूल देऊ -घेऊ ,नाजुक नाती जपण्या साठी ,
विस्मरणाचा घेऊ लाभ ,मागू क्षमा -करु क्षमा ,अलगद उकलू गुंतागुंती ,
उगवती अन मावळती मधले क्षण हे जीवन ,साक्षीला असते ,माता आणिक माती ,
एक हात देऊया पुढील पिढीच्या हाती ,अन दुसरा मागील पिढीच्या हाती ,
चढ असो वा असो उतार ,देते आधार निस्वार्थी काठी ,
देऊ आनंद ,घेऊ आनंद ,आनंदाची चावी जपून ठेवूया आप कनवठी ,
उरले -सुरले गुंतवू परमार्थी ,संचित वाढे परलोका साठी ,
छिद्र -पोकळी विसरुनि सारे ,सूर मुक्तीचा ,वेणुस गवसे ,श्रीहरीच्या अधरी -ओठी . 

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

आजोळ -------भाग ३

         आजोळ -------भाग ३
        अजून एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ,ती म्हणजे मामा मंडळी कडून आईला भाऊबीज म्हणून' ,स्त्री मासिक आणि केसरी वर्तमानपत्राची वार्षिक वर्गणी प्रेमाची भेट असायची . त्यामुळे दूरवर अमराठी प्रांतात राहून सुद्धा ,आमची मातृभाषा मराठीशी ,नाळ जुळून राहिली . 
          त्याच प्रमाणे  एक विस्मयकारक गोष्ट म्हणजे ,आजही माझ्या सुंदर स्वप्नात ,जेंव्हा एखादे घर येते ,तेंव्हा त्याचे चित्र आजोळच्या घराशी मिळते जुळते असते . याची उकल अशी असू शकेल कि हे माझे जन्मस्थान आहे आणि त्याच बरोबर येथे मी क्वालिटी टाईम स्पेंड केला आहे . 
             असे म्हणतात ,आज बदलापुर खूप बदलले आहे ,पण देवधर वाडीतील भावंडे ,त्याच बरोबर त्यांचे बेटर हाफ ,आणि पुढील जनरेशन ,यांचा आधार पूर्वी सारखाच आश्वासक आहे . 
         अजोळीच्या वटवृक्षाचा अनेक शाखा ,उपशाखा ,पारंब्या ,उपपारंब्या युक्त पसारा आहे . उंची आणि विस्तारा बरोबर पाळेमूळे ही खोलवर रुजल्याने ,याच्या सावलीत मने खरोखरच विसावतात . 
                    आसावरी जोशी /शकू 

सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

आजोळच्या ----भाग २

        आजोळच्या ----भाग २
बदलापुरला सर्व बहिणी आणि भाचरं जमली की श्रीधर मामा ,विसु मामा ,मन्या मामा यांना काय करू अन काय नाही असे व्हायचे . लाडा सोबत गप्पा -गोष्टी ,थट्टा मस्करीही असायची . शकुंतला मामी ,वसुधा मामी अन माधवी मामी ,हसतमुखाने एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कश्या करत याचे आश्चर्यच वाटते आता . तीन ही माम्या' सुग्रण ',म्हणजे रोज रोज केळ्याची 'शिक्रण 'वाल्या नाहीत हं !!त्यांच्या प्रत्येक पदार्थाला तृप्ती देणारी चव असायची . प्रेम आणि आपुलकी या सामुग्रीचा सढळ हाताने वापर करीत ,म्हणून असेल कदाचित . 
                      आंबा ,जांभुळ ,तुती यांचा फलाहार ,माम्यांनी लोणच्या साठी चिरलेल्या कैरीच्या मीठ -हळद -तिखट लावून ठेवलेल्या फोडी ,अचानक कमी झालेल्या असायच्या . 
     तळघरात आंब्यांची लावलेली अढी ,तयार झाली की नाही ती सारखी चेक करणे ,कारण प्रत्येकाला रोज एक आक्खा आंबा खायला मिळत असे . शिवाय अधून -मधून जेवणात अंबरस असायचाच . कागदाच्या चौकोनावर मिळालेल्या फोडणी च्या भाकरीची चव ही आंब्याच्या तोडीसतोड . 
        बाकी खेळ म्हणाल तर डबा ऐसपैस ,पत्यातील नाटेठोंम ,ज्याचे खरे नाव उशीरा उमगले ,झब्बू बदामसात ,जांभळे गोळा करुन आणणे ,अंगणातील मोरी चा तरण तलाव बनवणे इ . नाना आणि मामा लोकांची हौस आणि कष्ट या मुळे बहरलेल्या ,परसबागे मुळे ,आम्हाला ,अनेक प्रकारची फुलझाडे आणि फळझाडे पाहायला मिळाली . पांढरी मिरची ,अक्कलकाढा ,लाजाळु ,याचेतर अप्रूपच वाटे . 
           रोज संध्याकाळी सर्व मुलांनी झोपाळ्यावर बसून' शुभं करोती ' म्हणणे ,कधीतरी गुलाबाची बाग ,नदी ,मारुति मंदिर येथे फिरायला जाणे व्हायचे .आम्ही मावस ,आत्ते ,मामे भावंडे असायचोच ,त्यात भर म्हणून  वाड्यातील भाडेकरू कुटुंबीयांची मुले ही  असायची . 

आजोळ च्या आठवणींची चित्रफीत -part-1

      आजोळ च्या आठवणींची चित्रफीत 
आमचे नाना (चिं . पु . देवधर )आणि माई यांना अर्पण ----
नाना -माईच्या अष्टपैलू संसाराला फुलवण्या साठी जणू देवाने त्यांना पाच कन्यारत्न आणि तीन पुत्ररत्नांची देणगी दिली असावी . माझी आई जिला आम्ही मुले मामी म्हणायचो तिला नाना -माई कधी गोदू म्हणत तर कधी आक्का म्हणत . या  लेकीची पाठवणी थोडी लांब झाली होती . राजस्थान -मध्यप्रदेश च्या हद्दीवर स्थित भैंसोदामंडीहून बदलापुरला पोहोचायला जवळ -जवळ चोवीस तास लागत . हल्ली अमेरिकेला जायलाही एवढा वेळ लागत नाही ती गोष्ट वेगळी . आई जमेल तेव्हा आम्हा भावंडांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत बदलापूरला यायची . कधी इकडची मंडळी आमच्या घरी येत असत . वडिलांना शेतीचा व्यवसाय आणि संयुक्त कुटुम्ब असल्याने ,फार दिवस घर सोडून बाहेर पडता येत नसे . ते आले तरी त्यांना थोडेच दिवस राहायला जमत असे . 
             मग आमच्या गावाहून मामाच्या गावाला येता जाताना ,पहिला हक्काचा ब्रेक मुम्बईला -अर्थातच ताई मावशी /लीला मावशी कडे . या ब्रेक मधे मुंबई दर्शन ,चौपाटी एखादा मराठी सिनेमा /कार्यक्रम ठरलेला . मग मुंबईला एक तरी मामा आम्हाला घ्यायला यायचा . बदलापुरला माहेरवाष्णी जमायला सुरुवात झालेली असायची . आणि घर माणसांनी फुलुनजायचे .उषा मावशी तर मला मावशी पेक्षा बहीण किंवा मैत्रिणी प्रमाणे जवळची वाटायची . माझ्या लग्ना नंतर ,पुण्यात 
गेल्यावर इंदूमावशी चे घर म्हणजे ,पुण्यातील माझे जिव्हाळ्याचे माहेर घर . मावश्यांप्रमाणे सर्व काका लोकांनी पण आमच्यावर खूप माया केली .